पंतप्रधान कार्यालय
पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन
सरकारी यंत्रणेवरील लोकांचा विश्वास वाढवणे ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी : पंतप्रधान
प्रशिक्षणाने अधिकार्यांच्या क्षमता वाढीसोबतच संपूर्ण सरकारी दृष्टीकोन आणि जन भागीदारीची भावना रुजवली पाहिजे :पंतप्रधान
प्रशिक्षण संस्थांमधील नियुक्तीकडे शिक्षा म्हणून पाहण्याचा जुना दृष्टिकोन बदलत आहेत :पंतप्रधान
उच्च ते निम्न स्तरापर्यंत मर्यादित कक्षेत काम होत असल्याबद्दल बोलताना, अनुभवी कर्मचाऱ्यांना शोधताना पदानुक्रमाच्या बेड्या तोडण्याचे पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना आवाहन
कर्मयोगी अभियान सरकारी कर्मचार्यांची अभिमुखता, मानसिकता आणि दृष्टीकोन सुधारण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्यांना समाधान मिळेल आणि आनंद वाटेल आणि या सुधारणेचे उप-फलित म्हणून प्रशासन प्रणाली स्वाभाविकपणे सुधारेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2023 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात आयोजित पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
यावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण त्यांच्या समृद्ध राजकीय आणि प्रशासकीय अनुभवातून गाठीशी असलेल्या अनेक किस्से आणि कथांनी परिपूर्ण होते. त्यांनी आपल्या भाषणात अशाप्रकारची अनेक उदाहरणे देत ,सरकारी कामाची सेवाभिमुखता, सर्वसामान्यांच्या आकांक्षा साकार करण्यासाठीचे अधिकार, पदानुक्रम मोडून काढण्याची गरज आणि संस्थेतील प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाचा वापर, जनभागीदारीचे महत्त्व, व्यवस्था सुधारण्याचा आणि नावीन्यपूर्ण करण्याचा उत्साह यांसह इतर गोष्टींच्या पैलूंच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. या बाबी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण मॉड्युल्स विकसित केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
त्याआधी मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून काम केल्याच्या अनुभवाची चर्चा करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सरकारमध्ये प्रतिभावान, समर्पित आणि वचनबद्ध अधिकाऱ्यांची कधीही कमतरता नव्हती. भारतीय लष्कराने ज्याप्रमाणे लोकांच्या नजरेत निर्दोष विश्वासार्हता निर्माण केली आहे, त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणेवरील लोकांचा विश्वास आणखी वृद्धिंगत करणे ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
प्रशिक्षणाद्वारे संपूर्ण सरकारी दृष्टिकोन देखील विकसित केला पाहिजे आणि अधिका-यांच्या क्षमता वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रशिक्षण संस्थांमध्ये नियुक्तीला ‘शिक्षा नियुक्ती’ म्हणून पाहण्याचा जो जुना दृष्टीकोन होता, तो बदलत आहे यावरही पंतप्रधानांनी भर दिला. अनेक दशके सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्यामुळे या प्रशिक्षण संस्था महत्वपूर्ण ठिकाणे असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.
प्रशिक्षण देऊन प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यामध्ये लोकसहभागाचे महत्त्व बिंबवले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. उपस्थितांना हे समजावून सांगताना त्यांनी स्वच्छ भारत मोहीम, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम, अमृत सरोवर आणि जगातील डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा भरीव वाटा याचे श्रेय लोकसहभागालाच दिले.
पंतप्रधान म्हणाले की प्रशिक्षण हे प्रत्येक स्तरासाठी आहे आणि प्रत्येकासाठी आहे. या अर्थाने, iGOT कर्मयोगी या अॅपमुळे उपलब्ध झालेल्या व्यासपीठाने सर्वांना प्रशिक्षणाची संधी देऊन समानतेचे क्षेत्र निर्माण केले आहे. ते म्हणाले की iGOT कर्मयोगी नोंदणी या अॅपची 10 लाख वापरकर्त्यांची संख्या ओलांडणे हे दर्शवते की व्यवस्थेमधील लोक शिकण्यास उत्सुक आहेत. ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी मोहीम सरकारी कर्मचार्यांची अभिमुखता, मानसिकता आणि दृष्टीकोन सुधारण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून त्यांना समाधानी आणि आनंदी वाटेल आणि या सुधारणेचे उप-उत्पादन म्हणून, प्रशासकीय यंत्रणा नैसर्गिक पद्धतीने सुधारते.
त्यांनी संमेलनामध्ये सहभागीं असलेल्या सर्वांना दिवसभराच्या चर्चेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांनी सर्वोत्कृष्ट आणि त्यांना कृती करण्यायोग्य मते देण्याची सूचना केली, ज्यामुळे देशातील प्रशिक्षण पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल. ठराविक अंतराने अशा परिषदांचे आयोजन करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी बोलतांना केली.
***
R.Aghor/S.Chavan/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931506)
आगंतुक पटल : 262
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam