शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे येथे जी 20 चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाकडून देशभरात जनभागीदारी कार्यक्रमांचे आयोजन


जनभागीदारी उपक्रमाच्या 9 व्या दिवसांपर्यंत 5.01 लाख शाळांमधील 1.19 कोटी विद्यार्थी आणि 13.9 लाख शिक्षक तसेच 19.5 लाख लोकांसह एकूण 1.53 कोटी लोक सहभागी

जनभागीदारी उपक्रम जनजागृती निर्माण करेल आणि जी -20, राष्ट्रीय शिक्षण धोरण तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याबाबत विविध भागधारकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करतील

Posted On: 10 JUN 2023 5:45PM by PIB Mumbai

 

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला केंद्रबिंदू मानून लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आणि मार्गदर्शनानुसार, संमिश्र शिक्षण प्रणालीच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या संकल्पनेला प्रोत्साहन आणि समर्थन देण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालय अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करत आहे.

याच उद्दिष्टाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सोबतीने देशभरात जनजागृती करण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण समुदाय अशा विविध भागधारकांमध्ये जी-20, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याबाबत अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी जनभागीदारी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. याच संदर्भात 1 ते 15 जून 2023 या कालावधीत विविध कार्यशाळा, प्रदर्शने, चर्चासत्रे आणि परिषदांसह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी देशभरात राज्य, जिल्हा, गट, पंचायत आणि शालेय स्तरावर या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाणार आहे.

जनभागीदारी कार्यक्रम 19 ते 21 जून 2023 दरम्यान महाराष्ट्रातील पुणे येथे होणाऱ्या चौथ्या शिक्षण कार्यगट बैठकीच्या (चौथा EdWG) मुख्य कार्यक्रमापर्यंत सुरू राहील आणि 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्रिस्तरीय बैठकीने या उपक्रमाची सांगता होईल.

मंत्रालयाद्वारे आयोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सर्व शाळांमध्ये जी 20, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनभागीदारी कार्यक्रम - 1 ते 15 जून 2023.

महाराष्ट्रात पुणे येथे 17 ते 22 जून 2023 या कालावधीत शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शन.

17 आणि 18 जून 2023 रोजी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद.

जनभागीदारी हा संपूर्ण कार्यक्रम एक यशस्वी उपक्रम ठरला असून उपक्रमाच्या नवव्या दिवसापर्यंत 5.01 लाख शाळांमधील 1.19 कोटी विद्यार्थी आणि 13.9 लाख शिक्षक तसेच 19.5 लाख लोकांसह एकूण 1.53 कोटी लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे. लोकांचा हा सहभाग केवळ अभूतपूर्वच आहे, इतकेच नाही तर त्यातून जनतेमध्ये या उपक्रमाबाबतचे अत्युच्च स्वारस्य आणि प्रतिबद्धता दिसून येते.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931336)