आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या 5 कोटी जणांसाठी 61,501 कोटी रुपयांचे मोफत उपचार

Posted On: 31 MAY 2023 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेने (एबी पीएम-जय) रुग्णालयात दाखल झालेल्यांचा  5 कोटीचा टप्पा गाठत आतापर्यंत त्यासाठी  61,501 कोटी रुपयांचे मोफत उपचार केले आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे (एनएचए) राबवल्या जात असलेल्या या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत 12 कोटी लाभार्थी कुटुंबांना द्वितीय आणि तृतीय स्तरावरील उपचारांसाठी  प्रत्येक कुटुंबाला रुग्णालय भर्तीसाठी  वर्षाला रु. 5 लाख रुपयांचं आरोग्य कवच प्रदान केलं जातं.   

या यशाबद्दल माहिती देताना, एनएचए चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “एबी पीएम-जय योजना सर्वांसाठी आरोग्य सेवेच्या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आले आहे. अंमलबजावणीच्या पाचव्या वर्षात ही योजना वैद्यकीय उपचारांसाठी होणारा खर्च कमी करून गरीब आणि असुरक्षित कुटुंबांमधील कोट्यवधी लाभार्थ्यांना उपयोगी ठरत आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पीएम-जय योजनेने चालू वर्षात यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत.

एबी पीएम-जय योजना दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगाल वगळता 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत 23.39 लाभार्थींची पडताळणी झाली असून, योजने अंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी त्यांना आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. एबी पीएम-जय अंतर्गत, लाभार्थ्यांना सह-ब्रँडेड पीव्हीसी (PVC) आयुष्मान कार्ड जारी करण्यात आली आहेत.

पीएम-जय अंतर्गत पॅनेल वरील (निर्धारित) रुग्णालय नेटवर्क मध्ये देशभरातील 28,351 (12,824 खासगी रुग्णालयांसह) रुग्णालयांचा समावेश आहे. 2022-23 या वर्षात, एकूण प्रवेशांपैकी अंदाजे 56% (रकमे नुसार) अधिकृत प्रवेश खाजगी रुग्णालयांमध्ये तर 44% प्रवेश सार्वजनिक रुग्णालयांमध्ये नोंदवले गेले.

एबी पीएम-जय लाभार्थी 27 वैशिष्ट्यपूर्ण उपचारांच्या एकूण 1,949 प्रक्रियांशी संबंधित उपचार घेऊ शकतात. योजनेच्या लाभार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणीच्या स्पेशॅलिटीज (वैशिष्ट्यपूर्ण उपचार) अंतर्गत आतापर्यंत मेडिकल ऑन्कोलॉजी (कर्करोग उपचार), आपत्कालीन उपचार, ऑर्थोपेडिक आणि यूरोलॉजी (मूत्रपिंडाशी संबंधित आजार) हे तृतीय स्तरावरील उपचार घेतले आहेत.

त्याशिवाय, या योजनेंतर्गत, दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्यामध्ये लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. अनुकूल धोरणांचा परिणाम म्हणून, आयुष्मान कार्ड धारकांपैकी अंदाजे 49% महिला आहेत, आणि एबी पीएम-जय अंतर्गत एकूण अधिकृत रुग्णालय प्रवेशांपैकी 48% पेक्षा जास्त लाभार्थी या महिला आहेत. तसेच पीएम-जय अंतर्गत 141 पेक्षा जास्त उपचार  प्रक्रिया प्रामुख्याने  महिलांसाठी निर्धारित आहेत.

एबी पीएम-जय (AB PM-JAY) योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे अधिक तपशील पुढील लिंक वर पाहता येतील: 

https://dashboard.pmjay.gov.in/

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928736) Visitor Counter : 151