इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सरकारने सुधारित सेमीकॉन इंडिया कार्यक्रमानुसार सेमीकंडक्टर तसेच डिस्प्ले फॅब्स यांच्या उभारणीसाठी 1 जून पासून अर्ज मागवले
इंडिया सेमीकंडक्टर अभियानाच्या (आयएसएम) माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2023 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
सरकारने सुधारित सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत भारतात सेमीकंडक्टर तसेच डिस्प्ले फॅब्स यांच्या उभारणीसाठी 1 जून पासून अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सेमीकंडक्टर तसेच डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी सुरु केलेल्या सुधारित सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या इंडिया सेमीकंडक्टर अभियान, या नोडल संस्थेकडे हे अर्ज सादर केले जातील.
सुधारित कार्यक्रमाअंतर्गत, भारतात मच्युअर नोडसह कोणत्याही नोडचे सेमीकंडक्टर फॅब्स उभारण्यासाठी विविध कंपन्या, उद्योग संघ, संयुक्त उपक्रम यांच्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% निधी वित्तीय मदत अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, देशात, विशिष्ट तंत्रज्ञानाचे डिस्प्ले फॅब्स उभारण्यासाठी देखील प्रकल्प खर्चाच्या 50% निधी वित्तीय मदत अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
“भारतात कंपाउंड सेमीकंडक्टर्स/ सिलिकॉन फोटॉनिक्स/ सेन्सर्स फॅब्स/ डीस्क्रीट सेमीकंडक्टर्स फॅब्स आणि सेमीकंडक्टर एटीएमपी/ओएसएटी या सुविधा उभारण्यासाठीच्या सुधारित योजने” अंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील. संरचनेशी संबंधित अनुदान योजनेत (डीएलआय) अर्ज करण्याची मुदत देखील डिसेंबर 2024 पर्यंत आहे. आतापर्यंत या डीएलआय योजनेअंतर्गत 26 अर्ज सादर करण्यात आले असून त्यापैकी 5 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.
भारतात सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2021 मध्ये 76,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात केली. सेमीकंडक्टर फॅब उभारणी योजना तसेच डिस्प्ले फॅब उभारणी योजना (आधी सुरु असलेल्या योजना) यांच्या अंतर्गत ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केले आहेत त्यांना त्यांच्या प्रस्तावांमध्ये योग्य सुधारणा समाविष्ट केल्यानंतर सुधारित सेमीकंडक्टर फॅब उभारणी योजना तसेच सुधारित डिस्प्ले फॅब उभारणी योजना यांच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928564)
आगंतुक पटल : 249