महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि  बाल विकास मंत्रालयाने आपल्या प्रशिक्षणार्थी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिला विद्यार्थी/प्रज्ञावंत/सामाजिक कार्यकर्ते/शिक्षकांकडून मागवले अर्ज

Posted On: 26 MAY 2023 2:31PM by PIB Mumbai

 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दोन महिन्यांच्या कालावधीसाठी [03.07.2023 -31.08.2023] आयोजित केलेल्या इंटर्नशिप (प्रशिक्षणार्थी) कार्यक्रमासाठी, नॉन-टियर I शहरांमधील आणि भारताच्या ग्रामीण भागातील महिला विद्यार्थी/प्रज्ञावंत/सामाजिक कार्यकर्ते/शिक्षकांकडून अर्ज मागवले आहेत. या इंटर्नशिप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित उमेदवारांनी कोणत्याही विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/ बिगर-शैक्षणिक संस्थेमध्ये नोंदणीकृत/संबंधित असणे आवश्यक आहे. 

महिला विद्यार्थी/प्रज्ञावंत/सामाजिक कार्यकर्ते/शिक्षक (यापुढे प्रशिक्षणार्थीअसा उल्लेख) यांना मंत्रालयाची धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये अल्प-मुदतीसाठी सहभागी करून, त्याची ओळख करून देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या उपक्रमांवर भर देणारे प्रायोगिक प्रकल्प/लघु-अभ्यास प्रकल्प हाती घ्यावे लागण्याची शक्यता आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, प्रशिक्षणार्थींना मंत्रालयाचे आदेश, विशिष्ट कार्यक्रम आणि धोरण विश्लेषण याची गुणात्मक माहिती मिळावी, हा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. जेणेकरून भविष्यात महिला आणि मुलांचे प्रश्न विविध व्यासपीठांवर मांडण्यासाठी त्यांना चालना मिळेल. 

21-40 वर्षे वयोगटातील उमेदवार त्यांचे अर्ज गुगल (Google) फॉर्मद्वारे पाठवू शकतात.

(https://docs.google.com/forms/d/1UWK5W_07pRxL8yekBy6DbjAg2-25Vd_WJwfnc4nReTU/viewform?edit_requested=true ).

फॉर्म (अर्ज) स्वीकारण्याची प्रक्रिया 20.05.2023, पासून सुरु झाली  आहे, आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29.05.2023, रोजी रात्री बारा  वाजेपर्यंत आहे. प्रशिक्षणार्थींची निवड यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे केली जाईल. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ‘What’s New’ अंतर्गत उपलब्ध असेल. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकदा निवड झालेला उमेदवार पुन्हा अर्ज करण्यासाठी पात्र नसेल.

निवडक प्रशिक्षणार्थींना रु. 20,000/- एकरकमी मासिक स्टायपेंड (विद्या वेतन) आणि मंत्रालयाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येण्याच्या आणि कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवास खर्चाची (डीलक्स / एसी बस / 3 टियर एसी रेल्वे गाडी) परतफेड दिली जाईल. इच्छुक प्रशिक्षणार्थींना नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या कालावधीसाठी  सामायिक तत्त्वावर वसतिगृह सुविधा प्रदान केली जाईल. वसतिगृह सुविधेमध्ये, संलग्न प्रसाधन गृहासह, तीन जणांमध्ये एक खोली (गादी समाविष्ट नाही), टेबल, खुर्ची आणि कपाट या प्राथमिक सुविधांचा समावेश असेल. निवासामध्ये खानावळ शुल्काचा समावेश नसून, वसतिगृहाच्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला तो खर्च उचलावा लागेल.

वसतिगृह सुविधा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दोन दिवस आणि कार्यक्रम संपल्यावर दोन दिवस (उदा. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणार्थी बॅचसाठी, वसतिगृहाची सुविधा 1 जुलै 2023 च्या दुपारपासून 2 सप्टेंबर 2023 च्या दुपारपर्यंत उपलब्ध असेल) या काळापुरती मर्यादित राहील. हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल.

इंटर्नशिप कार्यक्रमाबाबत तपशीलवार मार्गदर्शक सूचना मंत्रालयाच्या पुढील संकेतस्थळावर पाहता येतील:

https://wcd.nic.in/schemes/internship-scheme

पुढील कोणतेही तपशील/प्रश्नांसाठी, उमेदवार सांख्यिकी ब्युरोशी, <mwcd-research[at]gov[dot]in> या आयडीवर कामकाजाच्या सर्व दिवसांमध्ये  सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत संपर्क साधू शकतील.

फॉर्मसह तपशीलवार सूचना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या पुढील संकेतस्थळावर पाहता येतील:

(https://wcd.nic.in/sites/default/files/Internship%20Advertisment%20July-Aug.pdf )

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927631) Visitor Counter : 123