युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 च्या प्रारंभाची करणार घोषणा
उत्तर प्रदेश मध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 च्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यासाठी लखनौ सज्ज
Posted On:
25 MAY 2023 10:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 च्या प्रारंभाची घोषणा करणार आहेत. या स्पर्धा उत्तर प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आल्या असून खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 च्या नेत्रदीपक उद्घाटन समारंभासाठी राज्याची राजधानी लखनौ सज्ज आहे.उच्च शिक्षण स्तरावरील भारतातील सर्वात मोठी बहु-क्रीडा स्पर्धा असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे.
उद्घाटन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारत सरकारचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
70 मिनिटांचा हा सोहळा अधिकृतपणे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.50 वाजता (आयएसटी )बी .बी .डी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर सुरू होईल. लष्कराच्या बँडद्वारे राष्ट्रगीताने या सोहळ्याला सुरुवात होईल. कार्यक्रमात मान्यवरांच्या भाषणांव्यतिरिक्त, गाणी आणि सादरीकरण , संकल्पनाधारित सादरीकरणे , टॉर्च अॅनिमेशन आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून क्रीडा स्पर्धांची मशाल प्रज्वलित करणे , फटाक्यांची आतषबाजी यासह पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठी असलेल्या लाईफ अभियानाची शपथ देण्यात येईल. उत्तरप्रदेशाचा राज्य प्राणी बारशिंगा याचं प्रतिनिधित्व करणारा जीतू हा या क्रीडा स्पर्धांचा शुभंकर या सोहळ्याचा एक अविभाज्य भाग असेल. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या विशेष सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल.
कार्यक्रमापूर्वी बोलताना उत्तर प्रदेशचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नवनीत सहगल म्हणाले, “उत्तर प्रदेशातील क्रीडा क्षेत्रासाठी हा संस्मरणीय दिवस आहे आणि आम्ही सर्वजण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीकोनातून मार्गदर्शन केले आहे आणि त्यानुसार काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. हा जागतिक दर्जाचा सोहळा असेल, यामधून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे आणि राज्याचा विकास आणि आधुनिकतेचेही दर्शन घडविण्यात येणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण राज्य यासाठी हातभार लावेल त्यामुळे राज्यातील क्रीडा आणि खेळाडूंसाठी क्रांती घडण्यास प्रारंभ होणार आहे.’’
ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंग पथिक (एसव्हीएसपी) स्टेडियमवर 23 मे 2023 रोजी पुरुष आणि महिला कबड्डीमधील गट साखळी सामने झाले तर प्राथमिक फेरी आणि इतर सात विभागांचे समूह खेळ- बास्केटबॉल, फुटबॉल, रग्बी, टेनिस, टेबल टेनिस , व्हॉलीबॉल आणि मल्लखांब, 24 मे 2023 रोजी लखनौमधील तीन ठिकाणी सुरू झाले. वाराणसी येथे 03 जून 2023 रोजी या स्पर्धांचा समारोप होईल.
‘केआययूजी’ च्या तिसर्या आवृत्तीत देशातील 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4000 हून अधिक खेळाडू, 21 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणार आहेत. राज्यातील लखनौ, वाराणसी, गोरखपूर आणि नोएडा ही चार शहरे विविध खेळांचे यजमानपद भूषवणार आहेत. तसेच दिल्लीच्या डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे नेमबाजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. गोरखपूरमधील रामगढ ताल येथे होणार्या नौकानयन स्पर्धेने ‘केआयसूजी’ च्या या आवृत्तीमध्ये राज्याचे जल-क्रीडा क्षेत्रात पदार्पण होईल.
‘केआययूजी’ च्या या आवृत्तीमध्ये काही प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही सहभागी होत आहेत. यामध्ये मनू भाकर, हृदय हजारिका, मेहुली घोष, अर्जुन बबुता आणि सिफ्ट कौर सामरा हे नेमबाज, टेबल टेनिसमधील दिया चितळे आणि अनन्या बसाक, फुटबॉलमध्ये एस के साहिल, जलतरणमध्ये अनिश गौडा, बॅडमिंटनमध्ये मालविका बनसोड, ज्युडोमध्ये यश घांगस आणि कुस्तीमध्ये प्रिया मलिक आणि सागर जगलान आदींचा समावेश आहे.
***
Nilima C /Suvarana B/Sonal /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927128)
Visitor Counter : 149