जलशक्ती मंत्रालय
चौथे राष्ट्रीय जल पुरस्कार 17 जून 2023 रोजी प्रदान केले जाणार
जलशक्ती मंत्रालयाद्वारे 11 श्रेणींमध्ये 41 विजेत्यांची निवड
Posted On:
23 MAY 2023 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2023
जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या वतीने, 17 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात,चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. ‘सर्वोत्कृष्ट राज्य’, ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’, ‘सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत’, ‘सर्वोत्कृष्ट शहर स्थानिक स्वराज्य संस्था’‘सर्वोत्कृष्ट विद्यालय', ‘सर्वोत्कृष्ट प्रसार माध्यम', 'आवारात जलव्यवस्थापन करणारी सर्वोत्कृष्ट संस्था', 'पाण्याचा सर्वोत्कृष्ट वापर करणारी संघटना', 'सर्वोत्कृष्ट उद्योग', 'सामाजिक दायित्व (CSR) जल उपक्रम राबवणारा सर्वोत्तम उद्योग', आणि 'सर्वोत्कृष्ट सामाजिक संस्था' यांसह विविध 11 श्रेणींचा समावेश असलेल्या चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार, 2022 साठी संयुक्त विजेत्यांसह 41 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. विविध श्रेणीतील या पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, स्मरणचिन्ह आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे दोन लाख, दीड लाख आणि 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
पुरस्कार वितरण समारंभाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी,जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी सांगितले की केले की हा समारंभ सर्व विजेते, सहभागी आणि विविध संस्थांना जलसंपदा संवर्धन आणि व्यवस्थापन उपक्रमांमधे जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अधिक दृढ करण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान करेल.तसेच या पुरस्कारांमुळे जनतेमध्ये पाण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल आणि त्यायोगे पाणी वापराच्या सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यास आणि प्रोत्साहन मिळण्यास प्रेरणा मिळेल,असेही त्यांनी अधोरेखित केले.
पुरस्कार विजेते आणि विविध मंत्रालये/विभाग/संस्था/राज्य सरकारांमधील मान्यवर/अधिकारी यांच्यासह सुमारे 1,500 पाहुणे या समारंभात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
पुरस्कारांच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा:
राष्ट्रीय जल पुरस्कार (NWA)
राष्ट्रीय जल पुरस्कारांचा प्रारंभ ‘जल समृद्ध भारत’ची संकल्पना साध्य करत देशभरातील राज्ये, जिल्हे, व्यक्ती, संस्था इत्यादींनी केलेले प्रशंसनीय कार्य आणि अनुकरणीय प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आला आहे.
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926662)
Visitor Counter : 199