पंतप्रधान कार्यालय

पापुआ न्यू गिनी येथे भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य अभ्यासक्रमाच्या प्रज्ञावंतांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

Posted On: 22 MAY 2023 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलंड्स कोऑपरेशन (FIPIC), अर्थात प्रशांत महासागर बेट राष्ट्र सहकार्य मंचाच्या तिसऱ्या परिषदेसाठी पोर्ट मोरेस्बी इथल्या आपल्या भेटी दरम्यान, 22 मे 2023 रोजी प्रशांत महासागर क्षेत्रातील बेट देशांमधल्या  भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी विद्यार्थ्यांमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, प्रमुख व्यावसायिक आणि ITEC अंतर्गत भारतात प्रशिक्षण घेतलेल्या समुदायांच्या नेत्यांचा समावेश होता. भारतात प्राप्त केलेल्या कौशल्यांचा वापर करून ते आपल्या समाजासाठी योगदान देत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी माजी विद्यार्थ्यांचे वैयक्तिक यश आणि कामगिरीबद्दल त्यांची प्रशंसा केली. प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना, विशेषतः सुशासन, हवामान बदल, डिजिटल सार्वजनिक वस्तू आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांची विकासाची उद्दिष्टे गाठायला मदत करण्यामध्ये भारताच्या क्षमता विकास उपक्रमाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. क्षमता विकासच्या अशा प्रयत्नांना भारताचा पाठींबा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2015 मध्ये झालेल्या मागील FIPIC परिषदेनंतर, भारताने या प्रदेशातील सर्व देशांमधल्या  सुमारे 1000 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. भारताने या देशांमधील संस्थांना कृषी आणि संबंधित क्षेत्रात मदत करण्यासाठी, दीर्घकालीन प्रतिनियुक्तीवर तज्ञ पाठवले आहेत.

 

* * *

S.Bedekar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926435) Visitor Counter : 122