पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

क्वाड राष्ट्रसमुह प्रमुखांच्या परिषदेत पंतप्रधानांनी घेतला सहभाग

Posted On: 20 MAY 2023 10:16PM by PIB Mumbai

जपानमधील हिरोशिमा इथे 20 मे 2023 रोजी झालेल्या तिसऱ्या क्वाड लीडर्स समिटमध्ये (क्वाड राष्ट्रसमूह प्रमुखांची परिषद), पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बिडेन यांच्यासमवेत प्रत्यक्ष सहभागी झाले.

यावेळी, इंडो-पॅसिफिक अर्थात हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील घडामोडींबद्दल, या नेत्यांमध्ये फलदायी संवाद झाला. या संवादातून, क्वाड या चार देशांच्या समूहातील राष्ट्रांमधील समान असणारी लोकशाही मूल्ये आणि धोरणात्मक हितसंबंधांची पुष्टी झाली. हिंद-प्रशांत क्षेत्र, खुले, मुक्त आणि सर्वसमावेशक असावे या आपल्या  दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, या क्षेत्रातील सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व आणि वादविवादांचे शांततापूर्ण निराकरण ही तत्त्व अबाधित राखणे का महत्वाचे आहे या बाबींचा, राष्ट्र प्रमुखांनी पुनरुच्चार केला. या संदर्भात त्यांनी, "हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी शाश्वत भागीदारी”, हे क्वाड लीडर्स व्हिजन स्टेटमेंट म्हणजे क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या संकल्पांचे निवेदन जारी केले. हे निवेदन, त्यांचा तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन अधोरेखित  करते.

हिंद-प्रशांत क्षेत्राची समृद्धी आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता बळकट करण्यासाठी, या क्षेत्राच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना पूरक ठरणाऱ्या पुढील उपक्रमांची, नेत्यांनी घोषणा केली:

A. क्लीन एनर्जी सप्लाय चेन्स इनिशिएटिव्ह म्हणजेच स्वच्छ ऊर्जापुरवठ्याची साखळी निर्माण करणारा उपक्रम. या उपक्रमामुळे, संशोधन आणि विकास सोपे होतील आणि हिंद प्रशांत क्षेत्रामधील ऊर्जा संक्रमणाला (पारंपरिक ऊर्जेचा वापर टाळून किंवा कमी करून अपारंपरीक ऊर्जास्रोतांकडे वळणे) बळ मिळेल.  याशिवाय, या प्रदेशातील स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळीच्या विकासासाठी, स्वच्छ ऊर्जापुरवठा साखळीच्या क्वाड तत्त्वांना मान्यता देण्यात आली.

B. या क्षेत्रातील धोरणकर्ते आणि व्यावसायिकांना, आपापल्या देशांत टिकाऊ आणि व्यवहार्य पायाभूत सुविधांची रचना, निर्मिती आणि व्यवस्थापन याकरता पाठबळ पुरवण्यासाठी,‘क्वाड इन्फ्रास्ट्रक्चर फेलोशिप्स प्रोग्राम’ हा पायाभूत सुविधा छात्रवृत्ती कार्यक्रम.

C. रचनात्मकता, उत्पादन, समुद्राखालून केबल जोडण्या टाकणे आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, यामधील क्वाडच्या सामूहिक कौशल्याचा फायदा घेण्यासाठी, या जोडण्यांचे जाळे सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, केबल जोडण्यांची कामे आणि त्यातील कुठल्याही परिस्थितीला सामावून घेणाऱ्या लवचिकतेसाठी भागीदारी निर्माण करणे

D. प्रशांत क्षेत्रात पहिल्यांदाच, पलाऊ या ठिकाणी, थोड्या प्रमाणात ORAN (ओपन रेडिओ अॅक्सेस नेटवर्क) हे रेडिओ लहरी प्राप्त करण्याचे जाळे तैनात करण्यासाठी क्वाडचे पाठबळ. खुल्या, आंतरपरिचालन करणाऱ्या आणि सुरक्षित दूरसंचार उपक्रमांमधील उद्योग गुंतवणुकीला समर्थन देण्यासाठी त्यांनी ORAN सुरक्षा अहवालही जारी केला.

E. क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क हे क्वाड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे जाळे, धोरणात्मक तंत्रज्ञानातील गुंतवणूक सुलभ करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील व्यासपीठ म्हणून सुरू करण्यात आले आहे.

F.  गेल्या वर्षी टोकियोत झालेल्या क्वाड शिखर परिषदेत घोषित केलेल्या, सागरी क्षेत्रातील जागरूकतेसाठी हिंद-प्रशांत क्षेत्रातील भागीदारीच्या प्रगतीचे, सर्व क्वाड राष्ट्रप्रमुखांनी स्वागत केले. त्यांनी नमूद केले की या कार्यक्रमां अंतर्गत आग्नेय आणि प्रशांत क्षेत्रातील भागीदारांमध्ये माहितीची देवाणघेवाण सुरू आहे आणि त्यात लवकरच हिंद महासागर क्षेत्रातील भागीदारांचा समावेश केला जाईल. या क्षेत्रात मागणीनुसार विकासातील सहकार्यासाठी भारताचा असलेला दृष्टिकोन, या सर्व प्रयत्नांना कसा हातभार लावत आहे यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला.
संयुक्त राष्ट्र, त्यांची सनद आणि संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संस्था यांच्यातील एकजिनसीपणा  जपण्याच्या गरजेवर, क्वाड राष्ट्रप्रमुखांनी  सहमती दर्शवली. UNSC म्हणजेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वाच्या, कायमस्वरूपी आणि हंगामी (स्थाई आणि अस्थाई) अशा दोन्ही श्रेणींमध्ये विस्तारासह बहुपक्षीय प्रणाली मजबूत करणे आणि तिच्यात सुधारणा घडवून आणणे, यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, क्वाडचा विधायक कार्यक्रम अधिक कार्यक्षम करण्याच्या आणि त्यातून या प्रदेशासाठी ठोस व्यवहार्य परिणाम मिळवण्याच्या महत्त्वावर भर दिला. आपापसातील नियमित संवाद कायम सुरू ठेवून, क्वाडमधील चार देशांचा सक्रिय सहभागसुद्धा वाढवण्यावर, सर्व राष्ट्रप्रमुखांनी सहमती दर्शविली. याच अनुषंगाने पंतप्रधानांनी, 2024 मध्ये होणाऱ्या क्वाड परिषदेसाठी भारतात येण्याचे निमंत्रण, क्वाड राष्ट्रसमुहाच्या राष्ट्रप्रमुखांना दिले. 

Sonal T/ASave/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1926050) Visitor Counter : 192