आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक उच्च रक्तदाब दिन

Posted On: 17 MAY 2023 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2023

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने "75/25" या  उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या साडेसात कोटी  लोकांना 2025 पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रमाणित सेवा प्रदान करण्याशी  संबंधित महत्त्वाकांक्षी उपक्रमाची केली घोषणा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त 2025 पर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या साडेसात कोटी लोकांची तपासणी करून त्यांना प्रमाणित  सेवा प्रदान करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला . केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या द्वारे आयोजित "अ‍ॅक्सिलरेटिंग द प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड डायबेटिस" या जी-20 को-ब्रँडेड कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव एस गोपालकृष्णन यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली . जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस, आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण - पूर्व आशिया विभागाच्या संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

प्राथमिक आरोग्य सेवा स्तरापासून सुरु होणाऱ्या  समुदाय आधारित दृष्टिकोनासह प्राथमिक आरोग्य सेवा कार्यक्रमातील असंसर्गजन्य रोगांविरोधात हा सर्वात मोठा उपक्रम असेल, असे डॉ पॉल यांनी या नाविन्यपूर्ण योजनेबाबत  सांगितले. संसाधनांचे वाटप, क्षमता वाढवणे, एकत्रीकरण आणि बहु-क्षेत्रीय सहयोगाद्वारे असंसर्गजन्य रोगांची समस्या  सोडवण्याचा सरकारचा स्पष्ट संकल्प या उपक्रमातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

असंसर्गजन्य रोगाविरुद्धची लढाई प्राथमिक आरोग्य सेवा स्तरावर लढली पाहिजे आणि त्यासाठी भारताने 1.5 लाखांहून अधिक 'आरोग्य आणि निरामयता केंद्रे ' निर्माण  करून तसेच टेलिमेडिसिन आणि डिजिटल आरोग्य सेवा कार्यान्वित करून या धोक्याशी लढण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे, असे डॉ पॉल यांनी सांगितले.

उच्च रक्तदाब प्रतिबंध आणि व्यवस्थापनाला गती देण्यासाठी सर्व राज्यांनी या संबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचना विशेषत: तपासणी संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे खालच्या स्तरापर्यंत तंतोतंत पालन करावे असे आवाहन डॉ व्ही के पॉल यांनी केले. कारण तपासणी हा कोणत्याही रोगाच्या यशस्वी व्यवस्थापनाचा पाया आहे, असे ते म्हणाले. मात्र, केवळ तपासणी पुरेशी नाही . निदानामुळे परिणाम मिळायला हवेत. त्यामुळे निदान झालेल्यांपैकी किमान 80% लोक उपचार घेतील याची खातरजमा करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना  केले.

2025 पर्यंत प्राथमिक आरोग्य सेवेद्वारे उच्च रक्तदाब असलेल्या 75 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचे भारत सरकारचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य हे असंसर्गजन्य रोगांविरोधातील प्राथमिक आरोग्य सेवेसाठी जगातील सर्वात मोठे अभियान आहे असे डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल भारताचे अभिनंदन करताना म्हणाले.

75/25 उपक्रमाव्यतिरिक्त, 40,000 प्राथमिक आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना असंसर्गजन्य रोगांविरोधात (NCDs) प्रमाणित उपचार प्रक्रियेचे  प्रशिक्षण देणाऱ्या सशक्त पोर्टलचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला.

 

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924821) Visitor Counter : 192