गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत संसद, राज्य विधिमंडळे, विविध मंत्रालये, वैधानिक मंडळे आणि इतर सरकारी विभागांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कायद्याच्या मसुद्याच्या निर्मितीसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे केले उद्घाटन


कायद्याच्या मसुद्याची निर्मिती हा आपल्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे, याच्या अभावामुळे केवळ कायदे आणि संपूर्ण लोकशाही प्रणालीच कमकुवत होत नाही तर त्याचा न्यायव्यवस्थेवरही परिणाम होतो

Posted On: 15 MAY 2023 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मे 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत कायदेविषयक मसुद्याच्या निर्मितीसंदर्भातील घटनात्मक आणि संसदीय अभ्यास संस्था (ICPS) आणि लोकशाही संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था(PRIDE) यांनी संसद, राज्य विधिमंडळे, विविध मंत्रालये, वैधानिक मंडळे आणि इतर सरकारी विभागांच्या पदाधिकाऱ्यांसाठी तयार केलेल्या  प्रशिक्षण कार्यक्रमाचे  उद्घाटन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, अर्जुन राम मेघवाल आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की कायद्याच्या मसुद्याची निर्मिती हा आपल्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे, याच्या अभावामुळे केवळ कायदे आणि संपूर्ण लोकशाही प्रणालीच कमकुवत होत नाही तर त्याचा न्यायव्यवस्थेवरही परिणाम होतो. आपल्या कायद्यांच्या मसुद्यांच्या निर्मितीचे कौशल्य अद्ययावत होत राहणे आणि काळानुसार ते अधिक प्रभावी बनणे कोणत्याही लोकशाही देशासाठी अतिशय महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी सुखदेव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आणि उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीची ओळख आहे आणि लोकशाही या संकल्पनेचा उदय भारतात झाला असल्याने एका प्रकारे लोकशाहीचा जन्म भारतात झाला होता, असे त्यांनी सांगितले. भारतामध्ये सर्वत्र आपण लोकशाही परंपरा निर्माण केल्या आहेत असे त्यांनी सांगितले. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात परिपूर्ण लोकशाही मानली जाते, असे अमित शहा यांनी नमूद केले.

विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ आहेत आणि आपल्या संविधानकर्त्यांनी या तीन स्तंभांवरच आपली संपूर्ण लोकशाही शासन व्यवस्था उभारली आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. या तिन्ही यंत्रणांच्या कामांची योग्य तऱ्हेने  विभागणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. विधीमंडळाचे कार्य लोककल्याण आणि लोकांच्या समस्यांचा विचार करणे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून त्यावर उपाय शोधणे आहे, असेही ते म्हणाले.

विधी विभागाचे कार्य संसद आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय इच्छाशक्तीचे कायद्यात रूपांतर करणे हे असल्याचे अमित शहा म्हणाले. कायद्याचा मसुदा अधिक चांगला असेल तर कार्यकारिणीकडून कमीत कमी चुका होण्याची शक्यता असते तसेच या कायद्याबद्दल सर्वांना शिक्षित करणे सोपे होईल, असेही ते म्हणाले.

संसद हे सरकारचे सर्वात शक्तिशाली अंग असून कायदा ही त्याची ताकद आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. कोणत्याही देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी कायदे तयार करणे ही सर्वात महत्त्वाची पद्धत आहे, असे त्यांनी सांगितले.

कायद्याचा मसुदा शक्य तितक्या सोप्या आणि स्पष्ट शब्दांमध्ये तयार केला पाहिजे. कारण, क्लिष्ट शब्दांमध्ये तयार केलेला कायदा नेहमीच वाद निर्माण करतो, असे शहा म्हणाले. कायदा जितका सोपा आणि स्पष्ट शब्दात असेल तितका तो निर्विवाद राहतो, असेही त्यांनी सांगितले. 

 

* * *

S.Kane/S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924220) Visitor Counter : 222