नौवहन मंत्रालय

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हरित बंदरासाठी ‘हरित सागर’ मार्गदर्शक तत्त्वे 2023 जारी केली


‘हरित सागर मार्गदर्शक तत्त्वे 2023’ मध्ये बंदर विकास, परिचालन आणि देखभाल यामधील परिसंस्थेच्या गतिशीलतेची कल्पना मांडण्यात आली आहे

Posted On: 10 MAY 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मे 2023

शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने  हरित बंदरासाठी ‘हरित सागर’ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली . केंद्रीय बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत मार्गदर्शक तत्त्वे जारी  करण्यात आली . यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद वाय  नाईक आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

हरित सागर मार्गदर्शक तत्त्वे - 2023 मध्ये ‘निसर्गाशी समतोल  ’ राखण्याची संकल्पना संरेखित करताना आणि बंदर परिसंस्थेच्या जैविक घटकांवर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी बंदर विकास, परिचालन  आणि देखभाल संबंधी परिसंस्थेच्या गतिशीलतेची  कल्पना मांडली आहे . बंदरांच्या परिचालनात स्वच्छ/हरित ऊर्जेचा वापर, साठवण, हाताळणीसाठी बंदरांची क्षमता विकसित करणे  आणि हरित  हायड्रोजन, हरित अमोनिया,हरित मिथेनॉल / इथेनॉल सारख्या हरित इंधनाचा भरणा करण्यावर भर देण्यात आला आहे.लक्ष्यित अंमलबजावणी आणि हरित उपक्रमांचे बारकाईने निरीक्षण करून  शाश्वत विकासात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि निर्धारित  कालमर्यादेत कार्बन उत्सर्जनात संख्यात्मक घट करण्याच्या दृष्टीने लक्ष्यित परिणाम साध्य करण्यासाठी एक व्यापक कृती योजना तयार करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे प्रमुख बंदरांना  एक चौकट  प्रदान करतात .

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या "पंचामृत" वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी बंदरे हरित उपक्रम हाती घेत आहेत आणि आपले सक्रिय योगदान देत आहेत. "हरित सागर" मार्गदर्शक तत्त्वे -2023 आपल्या  प्रमुख बंदरांसाठी एक सर्वसमावेशक चौकट  प्रदान करतात. तसेच त्यांना निर्धारित कालमर्यादेत कार्बन उत्सर्जनात संख्यात्मक घट साध्य करण्याच्या उद्देशाने व्यापक कृती आराखडा  तयार करण्यास सक्षम बनवतात.

देशातील बंदरांच्या परिचालनाच्या ठिकाणी कपात, पुनर्वापर, पुनरुद्देश आणि पुनर्प्रक्रिया यांच्या माध्यमातून  शून्य कचरा उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठणे आणि पर्यावरणीय कामगिरीविषयक निर्देशांकांवर आधारित परीक्षणाला प्रोत्साहन देणे ही या मात्गादर्शक तत्वांची उद्दिष्ट्ये आहेत. यामध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानातील बंदरांशी संबंधित मुद्दे, हरित हायड्रोजन सुविधेचा विकास, एलएनजी बंकरिंग,किनाऱ्यावरील पवन ऊर्जा निर्मिती इत्यादींचा देखील समावेश असून जागतिक हरित अहवाल उपक्रमाची (जीआरआय) मानके स्वीकारण्यासाठीची तरतूद देखील यात केली आहे.  

हरित सागर हरित बंदरे मार्गदर्शक तत्वे जारी करणे हे आपल्या शाश्वतता विषयक ध्येयांची पूर्तता करण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल आहे. आपल्या देशातील सर्व बंदरांच्या परिचालनात पर्यावरण-स्नेही पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शक तत्वांची रचना केलेली आहे, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या कार्यक्रमात सांगितले.

निवडक परिचालनविषयक आणि आर्थिक मापदंडांवर आधारित आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सार्वकालिक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रमुख बंदरांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. ज्या बंदरांनी कामगिरीत सर्वोत्कृष्ट वाढीव सुधारणा नोंदवल्या आहेत त्यांना देखील गौरवण्यात आले तसेच वर्ष 2022-23 मधील एकंदर कामगिरीच्या आधारावर त्यांना मानांकने देण्यात आली. देशातील मुख्य बंदरांमध्ये न्याय्य आणि निरोगी स्पर्धा निर्माण करून त्यांना आगामी वर्षात अधिकाधिक उत्तम पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या पुरस्कार प्रदानामागील संकल्पना आहे.

सुमारे 137.56 दशलक्ष टनांची सर्वाधिक कार्गो हाताळणी केल्याबद्दल कांडला येथील दीनदयाळ बंदराने वर्ष 2022-23 साठी सर्वोत्कृष्ट परिपूर्ण कामगिरीचा पुरस्कार पटकावला. जवाहरलाल नेहरू बंदराने जहाजांच्या टर्न अराउंड काळाच्या बाबतीत महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दलचे पारितोषिक मिळवले तर पारादीप बंदराला शिप बर्थ डे आऊटपुटच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलची ढाल देण्यात आली. कामराजर बंदराला प्री-बर्थिंग डिटेंशन साठी लागणाऱ्या वेळाच्या संदर्भात पुरस्कार देण्यात आला तर कोचीन बंदराला टर्न अराउंड काळाच्या बाबतीत (बिगर-कंटेनर बंदर) म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ढाल देऊन गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट वाढीव सुधारणेच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार पारादीप बंदराला मिळाला, या बंदराने गेल्या वर्षी कार्गो हाताळणीमध्ये सर्वाधिक 16.56%ची वाढ नोंदवली. वृद्धीच्या विभागातील शिप बर्थ डे आऊटपुटच्या बाबतीत आणखी एक पुरस्कार मार्मागोवा बंदराला देण्यात आला तर प्री -बर्थिंग डिटेंशन साठी लागणाऱ्या वेळाच्या बाबतीत सर्वोत्कुष्ट ठरल्याबद्दल कामराजर बंदराला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कार्गोची हाताळणी, टर्न अराउंडला लागणारा  सरासरी वेळ, विभागातील शिप बर्थ डे आऊटपुट, आयडल टाईम ऍट बर्थ, कार्याचे गुणोत्तर, प्री -बर्थिंग डिटेंशन अशा सर्व घटकांच्या संदर्भातील समग्र वार्षिक कामगिरीच्या आधारावर परादीप बंदराला सर्वोत्कृष्ट  बंदराचा पुरस्कार देण्यात आला.

 

 

S.Patil/Sushama/Sanjana/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923186) Visitor Counter : 194