वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार आणि गुंतवणुकीबाबत 6 व्या भारत-कॅनडा मंत्रीस्तरीय संवादाचे संयुक्त निवेदन

Posted On: 10 MAY 2023 9:00AM by PIB Mumbai

भारत आणि कॅनडा दरम्यान 8 मे 2023 रोजी ओटावा येथे व्यापार आणि गुंतवणुकीबाबत  सहावा मंत्रीस्तरीय संवाद आयोजित करण्यात आला  होता. भारताकडून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार , निर्यात प्रोत्साहन, लघु उद्योग  आणि आर्थिक विकास मंत्री मेरी एनजी यांनी सह-अध्यक्षपद भूषवले.  उभय मंत्र्यांनी भारत आणि कॅनडा दरम्यान  व्यापार आणि आर्थिक संबंधांच्या भक्कम पायावर भर दिला आणि द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याची मंत्रीस्तरीय संवाद ही एक  महत्त्वपूर्ण संधी असल्याचे नमूद केले.

भारताच्या अध्यक्षतेखाली या वर्षी भारतात होत असलेल्या G-20 च्या विविध बैठकांमधील महत्त्वपूर्ण चर्चेचाही त्यांनी आढावा घेतला.  या संदर्भात, कॅनडाच्या मंत्री एनजी यांनी भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताच्या भूमिकेची दखल घेतली आणि भारतातील G-20 कार्यक्रमांना आतापर्यंत मिळालेल्या यशाबद्दल भारत सरकार आणि भारतीय उद्योग संघटनांचे अभिनंदन केले. भारताच्या G20 अध्यक्षतेला  आणि G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटांच्या बैठकांमध्ये भारताकडून पाठपुरावा करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा दर्शवला. ऑगस्ट 2023 मध्ये भारतात होणाऱ्या आगामी G-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे  एनजी यांनी नमूद  केले .

कॅनडाची समृद्धी, सुरक्षा आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्याची क्षमता या दृष्टीने हिंद-प्रशांत क्षेत्राचे महत्त्वपूर्ण महत्त्व ओळखून मंत्री एनजी यांनी कॅनडाचे हिंद-प्रशांत धोरण तसेच या क्षेत्रातील भारताचे महत्त्व अधोरेखित केले.

कोविड-19 महामारीची आव्हाने आणि युक्रेनमधील युद्धामुळे उद्भवलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये  द्विपक्षीय व्यापारातील लवचिकतेचा त्यांनी उल्लेख केला.  2022 मध्ये कॅनडा-भारत यांच्यातील  वस्तूंमधील द्विपक्षीय व्यापार जवळपास 12 अब्ज कॅनेडिअन डॉलर्सपर्यंत पोहोचला, यात गत वर्षाच्या तुलनेत 57% इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात सेवा क्षेत्राचे योगदान उभय मंत्र्यांनी अधोरेखित केले आणि द्विपक्षीय सेवा व्यापार जो 2022 मध्ये 8.9 अब्ज कॅनेडिअन डॉलर्स होता , तो आणखी वाढवण्याची लक्षणीय  क्षमता असल्याचे नमूद  केले. दोन्ही मंत्र्यांनी  उभय  देशांमधील  गुंतवणुकीतील  लक्षणीय वाढ तसेच आर्थिक विकास आणि व्यापार संबंध वृद्धिंगत करण्यातील परस्परांच्या  योगदानाची दखल घेतली आणि उद्योगांची वाढ तसेच  गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या सुधारणांची त्यांनी प्रशंसा केली.

भारत आणि कॅनडाची व्यापार-संबंधित ताकद परस्परांना पूरक आहे आणि  पारंपरिक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये लक्षणीय विस्तार करण्यासाठी वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रात पुरेपूर  क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून,  कृषी माल , रसायने, हरित तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऑटोमोटिव्ह, स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि खनिजे व धातू  यांसारख्या क्षेत्रांमधील  पूरक गोष्टींचा लाभ घेण्यासाठी सहकार्य आणि भागीदारी वृद्धिंगत करून दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना चालना देण्याचे आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केले. तसेच आपापल्या अधिकार्‍यांना द्विपक्षीय महत्त्वाच्या व्यापार उपायांवर नियमितपणे चर्चा करायला सांगितले.

द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्यासाठी आणि उभय  देशांमधील आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी व्यापार आणि गुंतवणुकीवरील मंत्रीस्तरीय संवाद (MDTI)  महत्त्वाची संस्थात्मक भूमिका बजावू शकतो यावर त्यांनी भर दिला. भारत आणि कॅनडा दरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीला  चालना देण्यासाठी व्यापक नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वसामावेशक व्यापार कराराची गरज लक्षात घेऊन  2022 मध्ये दोन्ही देशांकडून  भारत-कॅनडा व्यापक आर्थिक भागीदारी करार संबंधी औपचारिक वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यात आल्या. या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यासाठी, व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या दिशेने एक संक्रमणकालीन पाऊल म्हणून प्रारंभिक व्यापार करार  (EPTA) संदर्भात चर्चा  सुरू आहे आणि चर्चेच्या अनेक फेऱ्या याआधीच झाल्या आहेत. प्रारंभिक व्यापार करारमध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक, मूळ नियम, स्वच्छताविषयक तसेच  कृषी क्षेत्रात पिकांच्या विविध  रोगांवरील उपाय, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि तंटा निवारण याबाबत  उच्च स्तरीय वचनबद्धता तसेच परस्पर करार अंतर्गत  इतर क्षेत्रांचाही समावेश केला जाईल.

आगामी काळात दोन्ही देशांचे एकमेकांना समर्थन आणि माहितीचे आदानप्रदानसमन्वित गुंतवणूक प्रोत्साहनयासारख्या उपायांद्वारे सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या संधी शोधण्यासाठी दोन्ही देशांनी  सहमती दर्शविली. भारत आणि कॅनडामधील या बाबींवरील सहकार्याला शक्यतो 2023 च्या शरद ऋतूमध्ये सामंजस्य कराराद्वारे अंतिम स्वरूप दिले जाईल.

जागतिक पुरवठा साखळी कोविड-19 महामारीचा प्रभाव तसेच युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांमुळे विस्कळीत राहण्याचा धोका दोन्ही मंत्र्यांनी नमूद केला. या पार्श्वभूमीवरमहत्त्वाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित सुव्यवस्था आणि पुरवठा साखळीतील लवचिकता वाढवण्यासाठी सतत एकत्र काम करणे महत्त्वाचे आहेत्यावर त्यांनी चर्चा केली. त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वच्छ तंत्रज्ञानक्रिटिकल मिनरल्स (चणचणी खनिजे -स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील महत्त्वाचा घटक असलेली तांबेलिथिअमनिकेलसारखी खनिजे)इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीअक्षय ऊर्जा/हायड्रोजन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर दिला.

भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी आणि हरित अर्थव्यवस्थेसाठी चणचणी खनिजे महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करून दोन्ही मंत्र्यांनी चणचणी खनिज पुरवठा साखळी लवचिकतेला चालना देण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकार पातळीवरील समन्वयाच्या महत्त्वावर सहमती दर्शविली. चणचणी खनिजांबाबत  दोन्ही देशांमधील व्यवसाय पातळीवर सहकार्यासाठी पर्याय शोधण्यास दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शविली आणि परस्पर हिताच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी टोरंटोमधील प्रॉस्पेक्टर्स आणि डेव्हलपर्स असोसिएशन परिषदेच्या दरम्यान अधिकारी स्तरावरील संपर्काच्या योग्य मुद्द्यांमधील वार्षिक संवादासाठी कटिबद्धता दर्शवली. 

संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य समिती (जेएसटीसीसी) मध्ये सुरू असलेल्या कामांच्या धर्तीवर   स्टार्ट-अप आणि नवकल्पना भागीदारी क्षेत्रात अधिक समन्वयासाठी आणि प्राधान्य क्षेत्रामध्ये विज्ञानतंत्रज्ञान व  नवकल्पना या क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी असलेला वावयावर दोन्ही देशांनी  चर्चा केली. नाविन्यपूर्ण भागीदारी, शाश्वत आर्थिक पुनरुत्थान आणि नागरिकांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी असे सहकार्य मजबूत करण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील संशोधन आणि व्यावसायिक समुदायांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबतभरपूर वाव असल्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. 

एसएमई आणि महिला उद्योजकांसाठी संघटित मंचासारख्या उपक्रमांद्वारे भारत-कॅनडा व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याचे महत्त्व दोन्ही मंत्र्यांनी अधोरेखित केले.

6 व्या MDTI- व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवादादरम्यान भारतीय व्यावसायिक प्रतिनिधिमंडळाच्या भेटीबद्दल कॅनडाच्या मंत्री मेरी एनजी यांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देशांमधील  B2B आदानप्रदानाला गती देण्यासाठीकॅनडा-भारत सीईओ मंच नूतन लक्ष्यासह आणि प्राधान्यक्रमांच्या नवीन संचासह पुन्हा सुरू होण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांनी उत्सुकता व्यक्त केली. सीईओ मंचाची घोषणा परस्पर-संमत तारखेला लवकर केली जाऊ शकते. मेरी एनजी यांनी कॅनडाच्या व्यापार प्रतिनिधिमंडळासह ऑक्टोबर 2023 मध्ये भारतात येण्याची उत्सुकता व्यक्त केली. गोयल यांनी त्याचे स्वागत केले.

दोन्ही मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि कुशल कामगारविद्यार्थी आणि व्यावसायिक प्रवासी यांच्यातील आदानप्रदान आणि द्विपक्षीय आर्थिक भागीदारी वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आणि या संदर्भातस्थलांतर आणि गमनशीलता या क्षेत्रामध्ये अधिक चर्चा होण्याची आवश्यकता व्यक्त केली. दोन्ही बाजूंनी निर्धारित केल्या जाणाऱ्या योग्य यंत्रणेद्वारे द्विपक्षीय नवकल्पना परिसंस्था अधिक विस्तृत आणि बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा करणे सुरू ठेवण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. याशिवायकॅनडाच्या हिंद- प्रशांत रणनीतीनुसारऔद्योगिक संशोधन आणि विकास भागीदारीला पाठिंबा देण्यासाठी आणखी गुंतवणूक केली जाईल.

परदेशी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना सुविधा देण्यासाठी भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगानेभारताने कॅनडाच्या विद्यापीठांना त्यांचे कॅम्पस भारतात स्थापन करण्यासाठीही आमंत्रित केले.

भारत आणि कॅनडाने 2022 मध्ये विस्तारित हवाई सेवा करारावर सहमती दर्शविली असून यामुळे  दोन्ही देशांच्या हवाई कंपन्यांनी वाढीव व्यावसायिक उड्डाणाद्वारे नागरिकांमधील परस्पर संबंध वृद्धिंगत होत असल्याची नोंद दोन्ही मंत्र्यांनी घेतली.

दोन्ही मंत्र्यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांवर आधारितपारदर्शकभेदभावरहितखुल्या आणि सर्वसमावेशक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेसाठी वचनबद्धतेची पुष्टी केली आणि ती अधिक  मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शवली.

भारत आणि कॅनडा यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंधांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये संबंध निर्माण करण्यासाठी आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी वार्षिक कार्य आराखड्यासह  सातत्याने गती प्रदान करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

***

JaydeviPS/SonalTSushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923065) Visitor Counter : 300