पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान 10 मे रोजी राजस्थानला भेट देणार


पंतप्रधानांच्या हस्ते 5500 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी

रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील अनेक पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांमुळे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळेल

पंतप्रधानांच्या हस्ते उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल

पंतप्रधान अबू रोड येथील ब्रह्माकुमारी यांच्या शांतीवन संकुलाला देणार भेट, बहुउद्देशीय धर्मादाय जागतिक रुग्णालयाची करणार पायाभरणी

Posted On: 09 MAY 2023 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता, पंतप्रधान नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतील. सकाळी 11:45 सुमारास, नाथद्वारा मधील विविध विकासप्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर 3:15 वाजता, पंतप्रधान अबू रोड येथील ब्रह्माकुमारी यांच्या शांतीवन संकुलाला भेट देतील.

नाथद्वारा मध्ये पंतप्रधान

पंतप्रधानांच्या हस्ते 5500 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे. या क्षेत्रात पायाभूत सेवा सुविधांचा विकास करणे आणि संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करणे हे या विकास प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांमुळे वस्तू आणि सेवांची वाहतूक अधिक सुलभ होऊन परिणामी व्यापारउदीम आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळते आणि त्या प्रदेशातील नागरिकांचा  सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य होतो.

पंतप्रधान, राजसमंद आणि उदयपूरमध्ये दुपदरीकरणासाठी रस्ते बांधकाम प्रकल्पांची पायाभरणी  देखील करणार आहेत.

पंतप्रधान उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील . या पुनर्विकासामुळे जनतेला अधिकाधिक सुविधा मिळतील. पंतप्रधान याशो गेज रूपांतरण प्रकल्प आणि राजसमंदमधील नाथद्वारा ते नाथद्वारा शहरापर्यंत नवीन मार्गिका तयार करण्याच्या कामाची देखील पायाभरणी करतील.

त्यानंतर, पंतप्रधान तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या उदयपूर ते शामलाजी विभागाच्या 114 किमी लांबीचा सहा पदरी रस्ता; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 25 च्या बार-बिलारा-जोधपूर विभागातील 110 किमी लांबीच्या 4 पदरी रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58E च्या 47 किमी लांबीच्या दोन पदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या करण्यासाठी जागा तयार करणे यांचा समावेश आहे.

ब्रह्मकुमारींच्या शांतीवन संकुलाला पंतप्रधानांची भेट

देशभरात आध्यात्मिक कायाकल्पाला चालना देण्यावर पंतप्रधानांचे विशेष लक्ष आहे. याच प्रयत्नांतर्गत पंतप्रधान ब्रह्मकुमारींच्या शांतीवन संकुलाला भेट देतील. यावेळी ते सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालय, शिवमणी वृद्धाश्रमाचा दुसरा टप्पा आणि नर्सिंग कॉलेजच्या विस्ताराची पायाभरणी करणार आहेत. सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालय अबू रोड येथे 50 एकर परिसरात उभारले जाणार आहे. हे रुग्णालय जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा प्रदान करेल आणि विशेषत: या भागातील गरीब आणि आदिवासी लोकांसाठी ते फायदेशीर ठरेल.

 

S.Patil/Bhakti/Shraddha/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1922771) Visitor Counter : 148