वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका भागीदारी हा 21व्या शतकातील एक महत्त्वाचा क्षण आहे- पीयूष गोयल

Posted On: 04 MAY 2023 4:45PM by PIB Mumbai

 

भारत आणि अमेरिका भागीदारी हा 21 व्या शतकातील एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, असे केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. चले साथ साथः पुढे वाटचाल करतानाया घोषवाक्याचा त्यांनी या भागीदारीच्या दृढतेचे महत्त्व अधोरेखित करताना पुनरुच्चार केला. नवी दिल्ली येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया (AMCHAM) च्या 31व्या सर्वसाधारण सभेत भारत-अमेरिका भागीदारीः भविष्यातील बळकटीकरणया विषयावर आयोजित  सत्राच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते, यावेळी त्यांनी भारत-अमेरिका यांची वृद्धी आणि समृद्धीच्या दृष्टीकोनातून दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंधांमध्ये विविधता आणण्याचे आणि हे संबंध अधिक दृढ करण्याचे महत्त्व सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन या दोन्ही नेत्यांचा परस्परांशी चांगला परिचय आहे आणि जगभरातील गुंतागुंतीच्या भूराजकीय समस्यांवर तोडगे काढण्यासाठी दोघे एकमेकांसोबत खूप चांगल्या प्रकारे काम करतात यावर त्यांनी भर दिला. टॅलेन्ट(गुणवत्ता) टेक्नॉलॉजी(तंत्रज्ञान), ट्रेडीशन(परंपरा), ट्रेड(व्यापार) आणि ट्रस्टीशिप(विश्वस्त वृत्ती) हे पंतप्रधानांनी निर्धारित केलेले पाच टी भारत आणि अमेरिका नातेसंबंधाचा दृष्टीकोन आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे असे त्यांनी नमूद केले आणि आगामी काळात त्यामध्ये अनेक पटींनी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अमेरिकेतून काम करणाऱ्या आणि त्याच प्रकारे भारतातून काम करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांची गोयल यांनी उदाहरणे दिली आणि कशा प्रकारे या कंपन्या परस्परांच्या अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देत आहेत ते अधोरेखित केले.

भारतामधून जगभरात पुरवली जाणारी तांत्रिक आणि व्यवस्थापन कुशल गुणवत्ता संपूर्ण जगासोबत भारताचे संबंध बळकट करत आहे असे त्यांनी सांगितले. अनेक अमेरिकी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर भारतीय किंवा भारतीय वंशाचे अधिकारी(सीईओ) काम करत असल्याचे त्यांनी दाखले दिले.

भारतामध्ये अमृत काळ हा अतिशय महत्त्वाचा कालखंड असून त्यामध्ये लोकसंख्याविषयक लाभांश देशाच्या अर्थव्यवस्थेची भरभराट करण्यात आणि देशाचे भवितव्य घडवण्यात योगदान देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. व्यवसायांमध्ये सरकारचा किमान हस्तक्षेप असल्याने उच्च दर्जाच्या उत्पादनांची आणि सेवांची निर्मिती करून उद्योगांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे अतिशय महत्त्वाचे आहे यावर गोयल यांनी भर दिला.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922019)