माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'मन की बात’ देशाला भारताशी जोडते
नवी दिल्ली येथील आयआयएमसी संस्थेने केलेल्या विशेष अभ्यासात 76% माध्यम प्रतिनिधींचे मत
63% लोकांना यूट्यूबवर ‘मन की बात’ ऐकायला आवडते
40% लोकांच्या मते, शिक्षण ही या कार्यक्रमाची सर्वात प्रभावशाली संकल्पना आहे
पंतप्रधानांच्या या रेडिओ कार्यक्रमाने संपूर्ण देशाला ‘आधुनिक भारताच्या अनोळखी निर्मात्यांची’ची ओळख करून दिली
Posted On:
29 APR 2023 12:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) या संस्थेने केलेल्या एका विशेष अभ्यासात असे आढळून आले आहे की, 76% भारतीय प्रसारमाध्यमांचे असे मत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाने देशवासियांना खऱ्या भारताची ओळख करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाने एक नवा पायंडा पाडला आहे, ज्यामुळे लोक आता देशाच्या इतर भागातील गोष्टींबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यांनी त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. 75% प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की 'मन की बात' हे एक असे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, जे भारतातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण फरक सुनिश्चित करण्यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या तळागाळातील नवोदितांचा परिचय करून देते.
आयआयएमसीचे महासंचालक प्रा. संजय द्विवेदी यांच्या माहितीनुसार, हा अभ्यास संस्थेच्या आउटरीच विभागाने 12 ते 25 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित केला होता. यामध्ये एकूण 890 व्यक्ती विविध माध्यमांशी संबंधित आहेत- माध्यम प्रतिनिधी, माध्यमातले विविध विभाग, माध्यम संशोधक आणि माध्यमातले विद्यार्थी - देशभरातील 116 माध्यम संस्था, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी या अभ्यासात भाग घेतला. यामध्ये 326 महिला आणि 564 पुरुष होते. 66% प्रतिसादकर्ते हे 18 ते 25 वर्षे वयोगटातील होते.
या प्रतिसादकर्त्यांच्या मते, ‘देशाबद्दलचे ज्ञान’ आणि ‘देशाबद्दल पंतप्रधानांचा असलेला दृष्टीकोन’ ही दोन महत्त्वाची प्रमुख कारणे आहेत जी हा कार्यक्रम ऐकण्यास प्रवृत्त करतात. जेव्हा प्रतिसादकर्त्यांना विचारण्यात आले की, त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाचा एखादा भाग चुकला तर ते हा कार्यक्रम कसे ऐकतात, तेव्हा 63% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, ते इतर माध्यमांपेक्षा युट्युब (YouTube)ला प्राधान्य देतात. सहभागी 76% प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की ते ‘मन की बात’ मध्ये विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना ऐकून लोकशाही प्रक्रियेत सहभागी आहेत.
प्रा. द्विवेदी यांनी निदर्शनास आणून दिले की, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली आहे, त्यापैकी कोणत्या मुद्द्यांचा लोकांवर सर्वाधिक प्रभाव पडला आहे, हे समजून घेण्याचाही या अभ्यासातून प्रयत्न झाला. या संदर्भातल्या प्रतिसादात, 40% प्रतिसादकर्त्यांनी 'शिक्षण' विषयाच उल्लेख केला, तर 26% लोकांनी 'ग्रास रूट इनोव्हेटर्सची अर्थात तळागाळातल्या अनोळखी संशोधकांची माहिती' हा सर्वात प्रभावशाली विषय असल्याचे सांगितले.
‘मन की बात’ मध्ये चर्चा केलेल्या विषयांची माहिती लोक कोणाशी सामायिक करतात हे समजून घेण्याचाही या अभ्यासात प्रयत्न करण्यात आला. 32% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते कार्यक्रमात चर्चा केलेल्या मुद्द्यांवर त्यांचे विचार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर सामायिक करतात, तर 29% लोकांनी सांगितले की ते त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत या विषयांवर चर्चा करतात. या अभ्यासात आणखी एक आश्चर्यकारक तथ्य समोर आले की, 'मन की बात' कार्यक्रम ऐकण्यासाठी 12% लोक रेडिओ, 15% टेलिव्हिजन आणि 37% लोक इंटरनेट आधारित प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
****
Shilpa P/ Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920725)
Visitor Counter : 200