आयुष मंत्रालय
"मन की बात" मधील संवाद आयुषला आश्वासक विश्वास देण्यासाठी महत्त्वपूर्ण: सर्बानंद सोनोवाल
"आयुष क्षेत्रावर मन की बातचा प्रभाव" या विषयावर केंद्रित जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस या आयुर्वेदिक संशोधन नियतकालिकाची विशेष आवृत्ती प्रकाशित
Posted On:
28 APR 2023 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2023
आयुष मंत्रालयाने केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेच्या, आयुर्विज्ञानावर आधारित संशोधन नियतकालिकाची विशेष आवृत्ती प्रकाशित केली आहे.ज्यात "मन की बातचा आयुष क्षेत्रावरील प्रभाव" यावर लक्ष केंद्रित केले आहे. आयुष आणि बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज आयुषचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पत्रिकेची विशेष आवृत्ती प्रकाशित केली.
आपल्या भाषणात, सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “पंतप्रधानांच्या "मन की बात" या कार्यक्रमामधील संवाद आयुषला सकारात्मक विश्वास देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. सादरीकरणाच्या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या संवादात्मक शैलीमुळे या रेडिओ कार्यक्रमाने स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे आणि हा कार्यक्रम सर्व समुदायांमध्ये लोकप्रिय झाला आहे. पत्रिकेच्या या विशेष आवृत्तीची सामग्री आयुष क्षेत्राविषयी पंतप्रधानांच्या विविध विचारांपासून प्रेरणा घेऊन प्रकाशित केली आहे.”
"मन की बात" च्या जवळपास 37 भागांमध्ये आयुषचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे, योगाभ्यास करण्याचे आणि पुराव्यावर आधारित आयुर्वेदाचा अवलंब करण्याचे तसेच आयुर्वेदाची जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन केले होते. आयुष क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही पारंपारिक भारतीय औषध पद्धतींच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढली आहे.
पत्रिकेच्या विशेष आवृत्तीची सामग्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष प्रणालीसंदर्भातल्या गेल्या 9 वर्षांतील विविध संभाषणांवरून प्रेरित आहे.ती आयुष क्षेत्रावर "मन की बात" चा प्रभाव अधोरेखित करते.आयुष हा देशाच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा आणि आरोग्य उपक्रमांचा आधार स्तंभ कसा बनत आहे हे सुद्धा यामुळे स्पष्ट होते. धोरण आणि सार्वजनिक आरोग्य, विज्ञान आणि पुरावे, आरोग्य शिक्षण आणि जागरूकता, योग आणि स्वस्थवृत्ती (जीवनशैली, व्यायाम, अन्न, पोषण), कोरोनाविरुद्ध लढा , उद्योग आणि शैक्षणिक सहयोग आणि जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या 7 क्षेत्रांवर नामवंत तज्ञांचे एकूण 24 लेख या पत्रिकेत समाविष्ट आहेत.
जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस हे तज्ज्ञांनी अवलोकन केलेले, सर्वांना उपलब्ध प्रकाशन आहे. या नियतकालिकाचे प्रकाशन त्रैमासिक केले जाते आणि ते मुद्रित आणि ऑनलाइन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920596)
Visitor Counter : 148