पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जागतिक बँकेच्या ‘मॅकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’’ यावरील कार्यक्रमाला केले संबोधित


“वसुंधरेसाठी योग्य निर्णय घेणार्‍या व्यक्ती आपल्या या लढाईत महत्त्वपूर्ण आहेत. मिशन लाइफचा हा गाभा आहे”

“केवळ कॉन्फरन्स टेबलवरून हवामान बदलाचा सामना करता येणार नाही. यासाठी प्रत्येक घरातील जेवणाच्या टेबलवरून लढावे लागेल”

"मिशन लाइफ हे हवामान बदलाविरोधातील लढाईला लोकशाहीकरणाचे स्वरूप देण्यासाठी आहे"

“भारतातील जनतेने गेल्या काही वर्षांत जनआंदोलन आणि वर्तन बदलाच्या बाबतीत अनेक प्रयत्न केले आहेत”

“वर्तणुक संबंधी उपक्रमांसाठीही पुरेशा वित्तपुरवठा पद्धती तयार करणे आवश्यक आहे. मिशन लाइफ सारख्या वर्तणुकीशी संबंधित उपक्रमांना जागतिक बँकेने दिलेल्या पाठबळाचा गुणात्मक परिणाम होईल”

Posted On: 15 APR 2023 9:41AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक बँकेच्या ‘मेकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या  कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या संकल्पनेशी आपला वैयक्तिक संबंध असल्याचे पंतप्रधानांनी नमूद  केले आणि ही एक जागतिक चळवळ बनत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

चाणक्य यांचा संदर्भ  देत, पंतप्रधानांनी लहान कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “ ग्रहासाठी स्वतंत्रपणे केलेली प्रत्येक चांगली कृती क्षुल्लक वाटू शकते. मात्र , जेव्हा जगभरातील अब्जावधी लोक सामूहिक कृती करतात, तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा असतो. आपल्या ग्रहासाठी योग्य निर्णय घेणार्‍या व्यक्ती आपल्या ग्रहाच्या लढाईत महत्त्वपूर्ण आहेत यावर आमचा विश्वास आहे, आणि हाच मिशन लाइफचा गाभा आहे.”

LiFE चळवळीच्या उत्पत्तीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी आठवण सांगितली की 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी वर्तणुकीत बदलाची गरज अधोरेखित केली होती आणि ऑक्टोबर 2022 मध्ये, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांबरोबर  मिशन LiFE चा प्रारंभ केला होता.

COP-27 च्या निष्कर्ष दस्तावेजाच्या प्रस्तावनेत देखील शाश्वत जीवनशैली आणि उपभोग याचा उल्लेख आहे असे त्यांनी नमूद केले. जर लोकांनी हे समजून घेतले की  केवळ सरकारच नाही तर ते देखील योगदान देऊ शकतात, तर त्यांची चिंता कृतीत बदलेल असे पंतप्रधान म्हणाले. “हवामान बदलाचा सामना केवळ कॉन्फरन्स टेबलवरून लढता येणार नाही. प्रत्येक घरातील जेवणाच्या टेबलवरून तो लढावा लागणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा एखादी कल्पना चर्चेच्या टेबलवरून जेवणाच्या टेबलवर जाते, तेव्हा ती एक लोकचळवळ बनते. आपल्या आवडी  निवडी ग्रहाला व्याप्ती आणि गती प्रदान करण्यास मदत करू शकतात याची प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीला जाणीव करून द्यायची आहे.  मिशन LiFE हे हवामान बदलाविरूद्धच्या लढाईचे लोकशाहीकरण करण्याविषयीचे अभियान  आहे. जेव्हा लोकांना जाणीव होईल की दैनंदिन जीवनातील साध्या कृतीमध्ये किती ताकद आहे, तेव्हा त्याचा पर्यावरणावर खूप सकारात्मक परिणाम होईल".

भारतातील उदाहरणे देऊन मोदी यांनी  आपले  विचार स्पष्ट केले. ते म्हणाले, "लोक  चळवळ आणि वर्तन बदलाच्या  बाबतीत, गेल्या काही वर्षांत भारतीय जनतेने  अनेक प्रयत्न  केले आहेत". यासंदर्भात त्यांनी सुधारित लिंग गुणोत्तर, भव्य  स्वच्छता मोहीम, एलईडी बल्बचा अवलंब ज्यामुळे दरवर्षी सुमारे 39 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टाळण्यास होत असलेली मदत, सुमारे सात लाख हेक्टर शेतजमीन क्षेत्रावर  सूक्ष्म सिंचनातून  पाण्याची बचत यांचा उल्लेख केला.

मिशन लाइफ अंतर्गत, स्थानिक संस्थांना पर्यावरण-स्नेही  बनवणे, पाण्याची बचत, ऊर्जा बचत, कचरा आणि ई-कचरा कमी करणे, निरोगी जीवनशैली अंगीकारणे, नैसर्गिक शेतीचा अवलंब, भरड धान्याला प्रोत्साहन अशा अनेक क्षेत्रांमध्ये सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मोदी यांनी दिली.

ते म्हणाले, या प्रयत्नांमुळे बावीस अब्ज युनिट्सपेक्षा जास्त ऊर्जेची बचत होईल, नऊ ट्रिलियन लिटर पाण्याची बचत होईल, कचरा तीनशे पंचाहत्तर दशलक्ष टनांनी कमी होईल, सुमारे दहा लाख टन ई-कचऱ्याचा पुनर्वापर होईल आणि 2030 पर्यंत सुमारे एकशे सत्तर दशलक्ष डॉलर्स इतकी अतिरिक्त खर्चात बचत  होईल.  “तसेच, पंधरा अब्ज टन अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होईल. हेप्रयत्न  किती मोठे आहेत  हे समजून  घेण्यासाठी मी तुम्हाला तुलनात्मक आकडेवारी देतो. अन्न आणि कृषी संघटनेनुसार 2020 मध्ये जागतिक मुख्य  पीक उत्पादन सुमारे नऊ अब्ज टन होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जगभरातील देशांना प्रोत्साहन देण्यात जागतिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. एकूण वित्तपुरवठ्यातील हिस्सा  म्हणून जागतिक बँक समूहाच्या हवामान विषयक वित्तपुरवठ्यात 26% वरून 35% पर्यंत वाढ प्रस्तावित असल्याचा  संदर्भ देत ते म्हणाले की या हवामान विषयक वित्तपुरवठ्याचा भर सामान्यतः पारंपारिक पैलूंवर असतो. “वर्तणुकसंबंधी उपक्रमांसाठी देखील पुरेशा वित्तपुरवठा पद्धती तयार करणे आवश्यक आहे. मिशन लाइफ सारख्या वर्तणुकीशी संबंधित उपक्रमांना जागतिक बँक देत असलेल्या पाठबळाचा व्यापक परिणाम होईल”, असे त्यांनी समारोप करताना सांगितले.

***

S.Thakur/S.Kane/CYadav

आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916792) Visitor Counter : 222