युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशात हमीरपूर येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात केले बॅडमिंटन कोर्ट मॅट्स, ज्युडो हॉल आणि मुष्टीयुद्ध हॉलचे उद्घाटन

Posted On: 14 APR 2023 6:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा, माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज हिमाचल प्रदेशात हमीरपूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(SAI) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात(एनसीओई) विविध क्रीडा सुविधांचे उद्घाटन केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या हमीरपूर एनसीओईने या केंद्रात फ्लोअरिंगसह बॅडमिंटन कोर्ट मॅट्स आणि मुष्टीयुद्ध हॉल आणि ज्युडो हॉल सुरू केले आहेत.

मार्च 2022 मध्ये हिमाचल प्रदेश सरकारच्या सहकार्याने हमीरपूर एनसीओईची स्थापना करण्यात आली आहे. सध्या पहिल्या वर्षात या केंद्रात 91 खेळाडू बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, ज्युडो, हॉकी आणि कुस्ती या सहा क्रीडाप्रकारांचे अनिवासी तत्वावर प्रशिक्षण घेत आहेत. या केंद्राचा भविष्यात आणखी विस्तार करण्यासाठी काम सुरू असून याचे रुपांतर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात करण्यात येईल आणि त्यामध्ये 300 खेळाडूंच्या निवासाच्या सुविधांसह ऑलिंपिक आकारमानाचा जलतरण तलाव बांधण्यात येईल.

अतिशय कमी कालावधीत या केंद्रात बॅडमिंटन कोर्टची सुविधा उभारण्यात यश मिळवल्याबद्दल अनुराग सिंह ठाकूर यांनी साईच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. केवळ 10 महिन्यांमध्ये या साई एनसीओईचे काम पूर्ण झाले आणि आज आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण नवीन बॅडमिंटन कोर्ट, नवी प्रकाश व्यवस्था, कुस्ती आणि ज्युडो मॅट्स आणि इतर विविध सुविधा सुरू करत आहोत, याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. विक्रमी वेळेत हे काम झाले आहे. एनसीओईमध्ये आणखी सुविधा निर्माण होतील. आपण सर्वांनी डॉ. आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे आणि आपली स्वप्ने साकारण्यासाठी कष्ट केले पाहिजेत.” अनुराग सिंह ठाकूर म्हणाले,

एनसीओईमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू तयार होतील आणि या केंद्रात मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या बळावर हे खेळाडू त्यांचे कौशल्य आणि विकास उंचावून त्यांची कारकीर्द घडवतील. यामुळे हिमाचल प्रदेशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे आणि आणखी जास्त चालना मिळेल. भावी काळात या भागाला भारतातील सर्वात मोठे क्रीडा केंद्र बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे”, असे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सांगितले. 

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916621) Visitor Counter : 158