पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान तमिळ नववर्ष समारंभामध्‍ये झाले सहभागी


"पुत्तांडू प्राचीन परंपरेतील आधुनिकतेचा उत्सव"

"तमिळ संस्कृती आणि लोक शाश्वत त्याचबरोबर वैश्विक"

"तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो”

"तमिळ चित्रपट उद्योगाने आपल्याला काही सर्वश्रेष्‍ठ कलाकृती दिल्या"

"तमिळ संस्कृतीमधील अनेक गोष्‍टींनी भारताला एक राष्ट्र म्हणून आकार दिला"

"तमिळ लोकांमध्‍ये असलेली निरंतर सेवेची भावना पाहून माझ्यातही नवी उर्जा मिळते’’

"काशी तमिळ संगमममध्ये आम्ही प्राचीनता, नवीनता आणि विविधता एकाचवेळी साजरी केली"


"काशीवासीयांचे जीवन तमिळ लोकांशिवाय अपूर्ण आहे, मी काशीवासी झालो आहे आणि काशीशिवाय तमिळ लोकांचे जीवन अपूर्ण आहे, असा माझा विश्वास आहे"

“ तमिळ वारशाबद्दल जाणून घेणे, तो देश आणि जगाला ते सांगणे ही आपली जबाबदारी आहे. हा वारसा आपल्या एकतेचे आणि 'राष्‍ट्र प्रथम' च्या भावनेचे प्रतीक आहे."

Posted On: 13 APR 2023 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली – दि. 13 एप्रिल, 2023

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज सहकारी  मंत्री, थिरू एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी तमिळ नववर्ष  उत्सवाच्या कार्यक्रमामध्‍ये सहभागी झाले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी पुत्तांडू साजरे करण्यासाठी आपले तमिळ बंधू  आणि भगिनी उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “पुत्तांडू हा प्राचीन परंपरेतील आधुनिकतेचा उत्सव आहे. तमिळ संस्कृती प्राचीन असली तरीही दरवर्षी नवीन ऊर्जा घेऊन पुढे जात आहे, ही गोष्‍ट उल्लेखनीय आहे,” असे पंतप्रधान यावेळी  म्हणाले. तमिळ लोकांच्या आणि संस्कृतीच्या वेगळेपणावर भर देत पंतप्रधानांनी तामिळ संस्कृतीबद्दल त्यांना  आकर्षण वाटते तसेच एक भावनिक ओढही असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये आपल्या  पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघात तमिळ लोकांची संख्‍या भरपूर होती आणि त्यांनी आपल्याला प्रचंड प्रेम दिले, याचे स्मरण करून   पंतप्रधानांनी तमिळ लोकांनी त्यांच्यावर केलेल्या  प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लाल किल्ल्याच्या बुरूजावरून पंतप्रधानांनी सांगितलेल्या पंचप्रणपैकी ‘एखाद्या वारसाचा अभिमान बाळगण्‍याच्या’ एका प्रणाची  आठवण  त्यांनी यावेळी करून दिली.  याविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले की, संस्कृती जितकी जुनी असते,  तितक्या प्रमाणात हे  लोक आणि संस्कृती काळाच्या  कसोटीवर उतरलेले असतात.  “तामिळ संस्कृती आणि लोक शाश्वत तसेच वैश्विक आहेत. चेन्नई ते कॅलिफोर्निया, मदुराई ते मेलबर्न, कोईम्बतूर ते केपटाऊन, सेलम ते सिंगापूर; तमिळ लोकांनी त्यांची संस्कृती आणि परंपरा सोबत नेल्याचे तुम्हाला पहायला मिळेल.’’ पंतप्रधान पुढे म्हणाले की,  “पोंगल असो की पुत्तांडू, त्यांनी  जगभरात आपला ठसा उमटवला  आहे. तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तमिळ साहित्याचाही मोठ्या प्रमाणात आदर केला जातो. तमिळ चित्रपट उद्योगाने आपल्याला  काही सर्वश्रेष्‍ठ कलाकृती दिल्या आहेत.”

स्वातंत्र्यलढ्यामध्‍ये  तमिळ लोकांनी दिलेल्या  अतुलनीय योगदानाचे स्मरण करून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासात तमिळ लोकांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी सी. राजगोपालाचारी, के कामराज आणि डॉ कलाम यांच्यासारख्या दिग्गजांचे स्मरण केले आणि सांगितले की वैद्यकीय , विधी-कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रात तमिळ लोकांचे योगदान अतुलनीय आहे.

 

भारत ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि तामिळनाडूमधील काही महत्त्वाच्या दाखल्यांसह या गोष्टीचे अविवादित पुरावे असल्याचे सांगितले. उथिरामेरूर इथल्या 11 शे ते 12 शे वर्ष जुन्या शिलालेखाबद्दल सांगितले, जो  प्राचीन काळातील लोकशाहीचे आचरण आणि कार्यपद्धती यांचे वर्णन करतो. "तमिळ संस्कृतीमध्ये असे बरेच काही आहे, ज्याने भारताला एक देश म्हणून आकार दिला आहे", पंतप्रधान म्हणाले. कांचीपुरममधील वेंकटेश पेरुमल मंदिर आणि चतुरंग वल्लभनाथर मंदिर, याची विस्मयकारक आधुनिक काल-सुसंगतता आणि समृद्ध प्राचीन परंपरा, याचा त्यांनी उल्लेख केला. आपल्याला समृद्ध तमिळ संस्कृतीची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केले. संयुक्त राष्ट्रांमध्ये तमिळमध्ये केलेले निवेदन आणि जाफना मधील गृहप्रवेश सोहळ्याची उपस्थिती, याचा त्यांनी उल्लेख केला. जाफनाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भेटीदरम्यान आणि त्या नंतर तिथल्या तमिळ लोकांसाठी अनेक कल्याणकारी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. "तामिळ लोकांची सातत्त्याने सेवा करण्याची ही भावना मला नवीन ऊर्जा देत आहे", पंतप्रधान म्हणाले.

नुकत्याच झालेल्या काशी तमिळ संगममच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. “या कार्यक्रमात, आपण एकाच वेळी पुरातनता, नवोन्मेष आणि विविधतेचा उत्सव साजरा केला आहे”, पंतप्रधान म्हणाले.

संगम दरम्यान, तमिळ भाषा शिकवणाऱ्या पुस्तकांना मिळालेल्या लोकप्रियतेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “हिंदी भाषिक प्रदेशात, या डिजिटल युगात, तमिळ पुस्तकांना अशी पसंती मिळत आहे, यामधून आपले एकमेकांबरोबरचा सांस्कृतिक संबंध दिसून येत आहे. माझा विश्वास आहे, काशीवासीयांचे जीवन तामिळ लोकांशिवाय अपूर्ण आहे, मी काशीवासी झालो आहे आणि काशीशिवाय तमिळ लोकांचे जीवन अपूर्ण आहे.”  काशी विश्वनाथ मंदिर विश्वस्त मंडळामध्ये सुब्रमणिया भारती या नवीन अध्यक्षांच्या रुपात, तमिळ व्यक्तीला स्थान मिळाल्याचा पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केला.

पंतप्रधानांनी तमिळ साहित्याचे सामर्थ्य अधोरेखित केले, कारण ते भूतकाळातील शिकवणीबरोबर भविष्यातील ज्ञानाचाही स्रोत आहे. प्राचीन संगम साहित्यामधील श्री अन्न  भरड धान्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, “आज भारताच्या पुढाकाराने संपूर्ण जग आपल्या हजार वर्षांच्या भरड धान्यांच्या परंपरेशी जोडले जात आहे.” आपल्या जेवणाच्या ताटात भरड धान्याला पुन्हा एकदा स्थान मिळवून देण्याचा उपस्थितांनी संकल्प करावा, आणि यामधून इतरांनाही प्रेरणा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

पंतप्रधानांनी तरुणांमधील तमिळ कला प्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या आणि जागतिक स्तरावर त्याचे प्रदर्शन करण्याच्या गरजेवर भर दिला. “आजच्या तरुण पिढीमध्ये ते जेवढे लोकप्रिय होतील, तेवढे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील. त्यामुळे या कलेविषयी तरुणांचे प्रबोधन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. “स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये, आपल्या तामिळ वारशाबद्दल जाणून घेणे, आणि देशाला आणि जगाला ते सांगणे ही आपली जबाबदारी आहे. हा वारसा आपल्या एकतेचे आणि 'नेशन फर्स्ट' (देश सर्वप्रथम) या भावनेचे प्रतीक आहे. आपल्याला तमिळ संस्कृती, साहित्य, भाषा आणि तमिळ परंपरा सातत्त्याने पुढे न्यायची आहे,” असे सांगून, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

***

MaheshI/SuvarnaB/RajshreeA/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1916463) Visitor Counter : 149