पंतप्रधान कार्यालय

श्री रामकृष्ण मठाच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान झाले सहभागी


"स्वामी विवेकानंदांच्या घरात  ध्यान करणे ही विशेष अनुभूती, आता मला खूप प्रेरित  आणि उत्साही वाटत आहे"

रामकृष्ण मठ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ याच भावनेने कार्य करत आहे ”

"आपले प्रशासन  स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाने प्रेरित आहे"

"मला खात्री आहे की आपले स्वप्न साकार करण्यासाठी भारताकडून होत असलेले प्रयत्न स्वामी विवेकानंद अभिमानाने पाहत आहेत"

"प्रत्येक भारतीयाला वाटत आहे की आताचा काळ हा आपला आहे "

"अमृत काळाचा उपयोग पंचप्रण - पाच कल्पना आत्मसात करून महान गोष्टी साध्य करण्यासाठी केला जाऊ शकतो"

Posted On: 08 APR 2023 6:35PM by PIB Mumbai


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  तामिळनाडूतील  चेन्नई येथील विवेकानंद हाऊस येथे श्री रामकृष्ण मठाच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली  अर्पण केली , पूजा केली आणि ध्यान केले. यावेळी पंतप्रधानांनी होली ट्रिओ  पुस्तकाचे प्रकाशनही केले.

स्वामी रामकृष्णानंद यांनी चेन्नई येथे 1897 मध्ये  सुरू केलेला रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या विविध प्रकारच्या मानवतावादी आणि सामाजिक सेवा कार्य करणाऱ्या आध्यात्मिक संस्था आहेत.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी चेन्नईत रामकृष्ण मठाच्या सेवेच्या 125 व्या वर्धापन दिनाला  उपस्थित राहता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की त्यांच्या आयुष्यात रामकृष्ण मठाला खूप आदराचे स्थान  आहे. तमिळ लोक , तमिळ भाषा, तमिळ संस्कृती आणि चेन्नईच्या वातावरणाविषयी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करताना पंतप्रधानांनी चेन्नई येथील स्वामी विवेकानंद यांच्या घराला  भेट दिल्याचा उल्लेख केला, जिथे  ते पश्चिमेकडील देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर वास्तव्याला  होते. या घरात ध्यान करणे हा त्यांच्यासाठी अतिशय खास अनुभव होता आणि आता त्यांना प्रेरित  आणि उत्साही वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा  पिढीपर्यंत प्राचीन कल्पना पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

तिरुवल्लुवर यांचा एक श्लोक उद्धृत करत  पंतप्रधानांनी स्पष्ट केले की या जगात तसेच  देवांच्या जगात दयाळूपणासारखे दुसरे काहीही नाही. तामिळनाडूतील रामकृष्ण मठाच्या सेवेच्या क्षेत्रांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी शिक्षण, ग्रंथालये, कुष्ठरोगाबाबत जनजागृती आणि पुनर्वसन, आरोग्य सेवा, सुश्रुषा आणि ग्रामीण विकासाची उदाहरणे दिली.  रामकृष्ण मठाच्या सेवेपूर्वी स्वामी विवेकानंद यांच्यावर तामिळनाडूचा जो  प्रभाव होता, तो समोर आला याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत अधिक विस्तृतपणे बोलताना पंतप्रधान म्हणाले की  स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश कन्याकुमारी येथील प्रसिद्ध खडकावर सापडला ज्याने त्यांचे परिवर्तन घडवले आणि त्याचा प्रभाव शिकागोमध्ये पाहता येऊ  शकतो. ते पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी प्रथम तामिळनाडूच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवले. रामनादच्या राजाने त्यांचे  आदराने स्वागत केले आणि नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रोमेन रोलँड यांनी या प्रसंगाचे वर्णन एक उत्सव असे केले जिथे  सतरा विजय कमानी उभारल्या होत्या.

स्वामी विवेकानंद हे मूळचे  बंगालचे होते , मात्र भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधी तामिळनाडूमध्ये त्यांचे एखाद्या नायकाप्रमाणे स्वागत करण्यात आले होते, असे नमूद करत  हजारो वर्षांपासून देशातील लोकांची भारताबाबत एक राष्ट्र म्हणून अतिशय स्पष्ट संकल्पना होती जी 'एक भारत श्रेष्ठ भारत ' भावनेचे दर्शन घडवते यावर पंतप्रधानांनी  भर दिला.  पंतप्रधान पुढे म्हणाले की रामकृष्ण मठ त्याच भावनेने काम करत आहे आणि देशभरात मठाच्या अनेक संस्था जनतेची  निःस्वार्थ सेवा करत असल्याचे अधोरेखित केले.  काशी-तमिळ संगममच्या यशाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि सौराष्ट्र-तमिळ संगमही लवकरच होणार असल्याचे सांगितले.  भारताची एकता आणखी दृढ करणाऱ्या  अशा सर्व प्रयत्नांच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

देशाचे शासन  स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  विशेषाधिकार तोडले जातात आणि समानता सुनिश्चित केली जाते तेव्हाच समाजाची प्रगती होते या स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टिकोनाशी साधर्म्य साधत  पंतप्रधानांनी नमूद केले की हाच दृष्टिकोन सरकारच्या सर्व महत्वाकांक्षी  कार्यक्रमांना लागू आहे. याआधी मूलभूत सुविधा देखील विशेषाधिकार मानल्या जात होत्या आणि केवळ काही मोजक्या लोकांपुरत्या किंवा लहान गटांपुरत्या त्या सीमित होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. पण आता विकासाचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत पंतप्रधान म्हणाले. आपल्या देशातील सर्वाधिक यशस्वी योजनांपैकी एक असलेली मुद्रा योजना आज आपला आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि यामध्ये आपल्या राज्याला आघाडीवर नेणाऱ्या तामिळनाडू मधील लहान उद्योजकांचे प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले. मोठ्या प्रमाणावर महिला आणि समाजातील उपेक्षित वर्गातील लोकांसह लहान उद्योजकांना आतापर्यंत सुमारे 38 कोटी तारण विरहित कर्जे देण्यात आली आहेत, पंतप्रधानांनी माहिती दिली.एकेकाळी बँकांकडून कर्ज मिळणे म्हणजे एक विशेषाधिकार  होता  मात्र आता कर्जाची  उपलब्धता अधिक जास्त वाढवण्यात आली आहे. त्याच प्रकारे पंतप्रधान म्हणाले की घर, वीज, एलपीजी कनेक्शन, शौचालय आणि इतर अनेक मूलभूत गोष्टी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत आहेत.

देशासाठी स्वामी विवेकानंद यांचा महान दृष्टिकोन होता. आज मला खात्री आहे की त्यांचा हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणाऱ्या भारताकडे ते अभिमानाने पाहात असतील, पंतप्रधानांनी सांगितले आणि  स्वतःवरील आणि देशावरील विश्वासाचा त्यांचा संदेश त्यांनी अधोरेखित केला.  प्रत्येक भारतीयाला आता असे वाटत आहे की हा काळ आपला आहे आणि अनेक तज्ञ असे सुचवत आहेत की हे भारताचे शतक असेल याकडे त्यांनी निर्देश केला. आपण जगासोबत अतिशय आत्मविश्वासाने आणि परस्पर आदर देत संवाद साधत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

स्वामीजींच्या शिकवणीची आठवण करून देत ते म्हणाले महिलांना मदत करणारे आपण कोणी नव्हे  ज्यावेळी योग्य मंच असेल त्यावेळी महिला समाजाचे नेतृत्व करतील आणि स्वतःहून आपल्या समस्या सोडवतील.  पंतप्रधानांनी यावर भर दिला की आज भारत महिला प्रणित विकासावर विश्वास दाखवत आहे.  मग ते स्टार्टअप्स असोत किंवा खेळ असोत, सशस्त्र दले असोत किंवा उच्च शिक्षण असोमहिला सर्व प्रकारच्या चौकटी भेदत आहेत आणि विक्रम करत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  ते पुढे म्हणाले की आपल्या चरित्र विकासासाठी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाचे आहेत अशी स्वामीजींची धारणा होती, असे ते म्हणाले आणि आता समाजाने खेळाकडे फावल्या वेळेतील एक कृती म्हणून न पाहता एक व्यावसायिक पर्याय म्हणून पहायला सुरुवात केली आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.  योग आणि फिट इंडिया या लोकचळवळी बनल्या आहेत याकडे त्यांनी निर्देश केला.  त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी देखील उहापोह केला. या धोरणामुळे जागतिक सर्वोत्तम पद्धती भारतात आणण्याच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात  येत आहे, असे त्यांनी सांगितले.सक्षमीकरणाबाबत स्वामीजींच्या धारणा शिक्षण आणि तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शिक्षणाच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकतील.  आज कौशल्य विकासाला अभूतपूर्व पाठबळ मिळत आहे. आपल्याकडे जगातील सर्वात जास्त सचेतन तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक परिसंस्था देखील आहेत, असे ते म्हणाले.

अगदी पाच कल्पना आत्मसात करणे आणि त्यांना पूर्णपणे बिंबवून त्यांच्यासह जीवन व्यतित करणे अतिशय सामर्थ्यशाली होते असे त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शब्दांची आठवण करून देत सांगितले. आपण नुकतीच स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली आणि पुढील 25 वर्षे अमृत काळ बनवण्यासाठी देशाने आपला दृष्टीकोन निश्चित केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पाच कल्पना- पंच प्रण आत्मसात करून अतिशय मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या अमृत काळाचा वापर करता येईल.  विकसित भारत, वसाहतवादी मानसिकतेच्या खुणांचे  उच्चाटन, आपल्या वारशाचा सन्मान, एकतेला मजबूत करणे आणि आपल्या कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करणे ही ती उद्दिष्टे आहेत, पंतप्रधानांनी सांगितले.आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी प्रत्येकाला एकजुटीने आणि वैयक्तिक पद्धतीने या पाच सिद्धांतांचा अंगिकार करण्याचे आवाहन केले. जर 140 कोटी जननतेने हा संकल्प केला  तर 2047 पर्यंत एका विकसित, आत्मनिर्भर  आणि समावेशक भारताची निर्मिती आपण करू शकतो, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी, रामकृष्ण मठाचे उपाध्यक्ष श्रीमंत स्वामी गौतमानंदजी आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि आणि दुग्धविकास आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914976) Visitor Counter : 179