माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अॅमेझॉन इंडिया बरोबर माध्यम, मनोरंजन आणि जनजागृती या क्षेत्रांमधील भागीदारीच्या करारावर केली स्वाक्षरी
या करारामुळे चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या प्रतिभावंतांच्या संघर्षाचा कालावधी कमी होईल असा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा विश्वास
भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, ओटीटी व्यासपीठाने सामुहिक सद्सदविवेक बुद्धी आणि सर्जनशील विविधता प्रतिबिंबित करायला हवी: अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
05 APR 2023 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अॅमेझॉन इंडिया यांच्यातील मीडिया, मनोरंजन आणि जनजागृती या क्षेत्रांमधील भागीदारीची घोषणा केली.
या भागीदारीचा शुभारंभ करताना अनुराग ठाकूर म्हणाले की, भारत ही एक प्राचीन संस्कृती असल्यामुळे, भारताकडे आजपर्यंत कधीही न सांगितल्या गेलेल्या लाखो कथा आहेत. या कथा कालातीत असून, अध्यात्मा पासून ते सॉफ्टवेअर पर्यंत, परंपरांपासून ते ट्रेंड पर्यंत, लोककथांपासून ते सणांपर्यंत, आणि ग्रामीण भारतापासून ते उगवत्या भारतापर्यंतचे विस्तृत क्षेत्र या कथांमध्ये सामावले आहे. ते पुढे म्हणाले की, अलीकडेच भारतीय आशयाने आंतरराष्ट्रीय मंचावर यश मिळवले आहे आणि भारतीय कलाकारांनी परदेशी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.
भारतामधील मनोरंजन उद्योगाला पोषक ठरेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी मंत्रालयाने उचललेल्या पावलांचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकारने भारतीय मनोरंजन उद्योगाचे, विशेषतः ओटीटी सारख्या नवीन व्यासपीठाचे सामर्थ्य आणि त्यापुढील संधी ओळखल्या आहेत. मंत्रालयाने दृकश्राव्य सेवांना चॅम्पियन सेवा क्षेत्र म्हणून मान्यता दिली असून, अलीकडेच ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वयं-नियामक चौकट निश्चित केली आहे. अॅमेझॉनबरोबरच्या भागीदारीबद्दल बोलताना ठाकूर म्हणाले की, अॅमेझॉन इंडिया बरोबरची भागीदारी अनेक बाबतीत वेगळी आहे, आणि प्रतिबद्धता पत्रामध्ये सर्जनशील उद्योगाच्या विविध पैलूंचा समावेश करण्यात आला आहे.
ही भागीदारी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि सत्यजित रे भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, मास्टरक्लास आणि इतर संधींच्या तरतुदींद्वारे औद्योगिक-शैक्षणिक संबंध मजबूत करायला मदत करेल. या उपक्रमामुळे भारतामधील प्रतिष्ठित चित्रपट संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या प्रतिभावान कलाकारांचा संघर्षाचा कालावधी कमी व्हायला मदत होईल, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओटीटी व्यासपीठावरून प्रसारित होणार्या कार्यक्रमांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या व्यासपीठावरून सर्जनशील अभिव्यक्तीच्या नावाखाली अश्लीलता आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नाही, हे सुनिश्चित करण्याची ओटीटी व्यासपीठाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. ओटीटी व्यासपीठाने देशाची सामुहिक सद्सदविवेक बुद्धी प्रतिबिंबित करायला हवी, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे,अभिनेता वरुण धवन यांनी तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या स्ट्रीमिंग सेवांबद्दल सांगितले आणि स्ट्रीमिंगच्या माध्यमातून भारतीय चित्रपट आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे असे ते म्हणाले . या स्ट्रीमिंग सेवांनी भारतात तयार झालेल्या आशयाला अकल्पनीय अशी पोहोच आणि उपलब्धता दिली आहे. ही स्ट्रीमिंग सेवा समानता निर्माण करण्याचं काम करत असल्याचे धवन यांनी अधोरेखित केले. "नवीन अभिनेते आणि निर्माते, नवीन प्रतिभा जे आतापर्यंत मुख्य प्रवाहापासून दूर होते ते आता जगभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकतात."असे ते म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि ॲमेझॉन यांच्यातील भागीदारीमुळे भारतीय प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल.
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष गौरव गांधी म्हणाले की, “ माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबतचे आमचे सहकार्य उद्योगाच्या वाढीला चालना देईल .तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि एकत्रीकरणाच्या प्रत्येक बाजूकडे लक्ष देईल आणि आम्ही या सहकार्याच्या नवीन मार्गाबद्दल खूप आशावादी आहोत."
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विविध संस्था आणि ॲमेझॉनच्या विविध व्यावसायिक बाजूंमध्ये या लेटर ऑफ एंगेजमेंट (LoE) मार्फत बहुआयामी भागीदारी निश्चित केली आहे. यामध्ये सरकारच्यावतीने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ(NFDC), प्रसार भारती, प्रकाशन विभाग, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) आणि सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (SRFTI) या माध्यम प्रशिक्षण संस्था सहभागी आहेत तर ॲमेझॉनच्यावतीने ,या LoE मध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, एलेक्सा, ॲमेझॉन म्युझिक, ॲमेझॉन ई-मार्केटप्लेस आणि IMDb यांचा सहभाग आहे.
* * *
Jaydevi PS/R.Agashe/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914012)
Visitor Counter : 259