पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 24 मार्च रोजी वाराणसी दौऱ्यावर


पंतप्रधान वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

अल्प कालावधीचे क्षयरोग प्रतिबंधक उपचार आणि क्षयरोग उपचारासाठी कुटुंब-केंद्रित मॉडेलची संपूर्ण देशभर अधिकृत अंमलबजावणी करणाऱ्या क्षयरोग -मुक्त पंचायत उपक्रमाचा पंतप्रधान करणार आरंभ

पंतप्रधान 1780 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण आणि पायाभरणी

हे प्रकल्प वाराणसीचा आणखी कायापालट घडवून आणतील आणि शहरातील लोकांची जीवन सुखकर करतील

वाराणसी छावणी स्थानक ते गोडोलिया या प्रवासी रोपवेची पंतप्रधान करणार पायाभरणी - हा प्रकल्प पर्यटक, यात्रेकरू आणि रहिवाशांचा प्रवास सुलभ करेल

Posted On: 22 MAR 2023 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मार्च रोजी वाराणसीच्या  दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष  कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या  विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पंतप्रधान  वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला  संबोधित करतील.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि स्टॉप टीबी पार्टनरशिप  यांच्याद्वारे या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 2001 मध्ये स्थापन झालेली, स्टॉप टीबी पार्टनरशिप  ही संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली संस्था आहे असून ही संस्था क्षयरोग  बाधित लोक, समुदाय आणि देशांसाठी काम करते.

अल्पकालावधीचे क्षयरोग प्रतिबंधक उपचार आणि क्षयरोग उपचारासाठी कुटुंब-केंद्रित मॉडेलची संपूर्ण देशभर अधिकृत अंमलबजावणी करणाऱ्या क्षयरोग -मुक्त पंचायत उपक्रमाचा पंतप्रधान  आरंभ करणार आहेत तसेच भारताचा वार्षिक क्षयरोग अहवाल 2023 प्रकाशित करतील. क्षयरोग निर्मूलनाच्या प्रगतीसाठी निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात येणार आहे.

मार्च 2018 मध्ये, नवी दिल्ली येथे झालेल्या क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधानांनी भारताला 2025 पर्यंत क्षयरोग -संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टांचे लक्ष्य निर्धारित वेळेच्या पाच वर्षे अगोदर साध्य करण्याचे आवाहन केले होते.क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देश वाटचाल करत  असताना, या उद्दिष्टांवर  अधिक विचारविनिमय  करण्याची संधी ही शिखर परिषद  देईल. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून मिळालेली माहिती  प्रदर्शित करण्याची ही संधी असेल.या परिषदेला 30  हून अधिक देशांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

वाराणसीमधील  विकास उपक्रम

गेल्या नऊ वर्षांत, पंतप्रधानांनी वाराणसीचा कायापालट करण्यावर तसेच  शहर आणि लगतच्या भागात राहणाऱ्या लोकांची  जीवन सुलभता   वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित  कार्यक्रमा दरम्यान 1780 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या  प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान वाराणसी कॅंट स्थानक आणि गोडोलिया दरम्यान प्रवासी रोपवेची पायाभरणी करतील. या प्रकल्पासाठी 645 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रोपवे प्रणालीची लांबी 3.75 किमी असून यावर पाच स्थानके असतील. यामुळे पर्यटक, यात्रेकरू आणि वाराणसी इथल्या  रहिवाशांचा प्रवास सुलभ होईल.

नमामि गंगा योजनेंतर्गत भगवानपूर इथल्या 55 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पंतप्रधान पायाभरणी करणार असून, यासाठी 300 कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

खेलो इंडिया योजने अंतर्गत, सिग्रा क्रीडा संकुलाच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या टप्पा 2 आणि 3 ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सेवापुरी मधील इसरवर गावात हिंदुस्तान पेट्रोलियम कोर्पोरेशन लिमिटेड द्वारे उभारल्या जाणाऱ्या एलपीजी बॉटलिंग प्लांटची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. भरथरा गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्र,  चेंजिंग रूमसह फ्लोटिंग जेट्टी, यासह इतर विविध प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत, पंतप्रधान 19 पेयजल योजनांचे लोकार्पण करतील, ज्याचा फायदा 63 ग्रामपंचायतींमधील 3 लाखां पेक्षा जास्त रहिवाशांना मिळेल. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान, या योजने अंतर्गत 59 पेयजल योजनांचीही पायाभरणी करतील.

वाराणसी आणि आसपासच्या भागातील शेतकरी, निर्यातदार आणि व्यापार्‍यांना, करखियाओन येथे बांधण्यात आलेल्या एकात्मिक पॅक हाऊसमध्ये, फळे आणि भाजीपाल्याची प्रतवारी, वर्गीकरण, आणि प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध होईल. या कार्यक्रमात, पंतप्रधान या प्रकल्पाचे लोकार्पण करतील. यामुळे वाराणसी आणि आसपासच्या भागातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल.

वाराणसी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत, पंतप्रधान राजघाट आणि महमूरगंज सरकारी शाळांच्या पुनर्विकासाचे काम, शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, शहरातील 6 उद्याने आणि तलावांचा पुनर्विकास, यासह विविध विविध प्रकल्पांचे लोकार्पण करतील.

पंतप्रधान विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचेही लोकार्पण करतील. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एटीसी टॉवर, भेलुपूर इथल्या वॉटर वर्क्स परिसरातील 2  मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प, कोनिया पंपिंग स्टेशन इथला 800 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प, सारनाथ इथले नवीन सामुदायिक आरोग्य केंद्र, चंदपूर इथल्या औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, केदारेश्वर, विश्वेश्वर आणि ओंकारेश्वर खंड परिक्रमा मंदिरांचा जीर्णोद्धार, यासह इतर प्रकल्पांचा यात समावेश आहे.  

 

* * *

S.Kane/Sonal C/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909597) Visitor Counter : 130