गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील माता शारदा देवी मंदिराचे केले उद्घाटन
Posted On:
22 MAR 2023 5:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील माता शारदा देवी मंदिराचे उद्घाटन केले. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत, अमित शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, आज नववर्षानिमित्त माता शारदेचं नव्यानं उभारलेलं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून भारतभरातील भाविकांसाठी हा शुभ संकेत आहे. माता शारदा मंदिराचं आज झालेलं उद्घाटन ही एका नव्या युगाची सुरुवात आहे, असही ते म्हणाले.
मंदिराची स्थापत्यरचना आणि बांधकाम, पौराणिक शास्त्राच्या आधारावर, शारदा पीठाच्या अधिपत्याखाली करण्यात आलं आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली. शारदा-संस्कृतीचा शोध आणि शारदा-लिपी संवर्धनाच्या दृष्टीनं कुपवाडा इथे माता शारदा मंदिराचं पुनर्निर्माण हे एक आवश्यक आणि महत्त्वाचं पाऊल आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, शारदा लिपी ही आपल्या काश्मिरची मूळ लिपी असून माता शारदेच्या नावावरूनच या लिपीचं शारदा लिपी हे नाव पडलं आहे. हे शक्तीपीठ, महाशक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ असून माता सतीचा उजवा हात इथे पडला होता, असं पुराणात सांगितलं आहे.
शारदा पीठ हे भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक वारशाचं ऐतिहासिक केंद्र आहे आणि कर्तारपूर कॉरिडॉरप्रमाणेच शारदा पीठही भाविकांसाठी खुलं करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुढे कार्यवाही करेल, असा निर्वाळा अमित शहा यांनी दिला.
* * *
S.Kane/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909591)
Visitor Counter : 173