पंतप्रधान कार्यालय

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 10 MAR 2023 11:19AM by PIB Mumbai

नमस्कार!

यंदाच्या अर्थसंकल्पाला भारताने 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा शुभारंभ म्हणून पाहिले आहे ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे. या अर्थसंकल्पाकडे भावी अमृतकाळाच्या दृष्टीकोनातून पाहण्यात आले आणि त्याची पडताळणी करण्यात आली आहे. देशातील नागरिक देखील आगामी 25 वर्षांचा संबंध याच उद्दिष्टांशी जोडून पाहत आहेत हा देशासाठी शुभसंकेत आहे.

मित्रहो,

गेल्या 9 वर्षात देशाने महिला प्रणीत विकासाचा दृष्टीकोन सोबत घेऊन आगेकूच केली आहे. भूतकाळातील वर्षांच्या अनुभवाला विचारात घेऊन भारताने महिलांच्या विकासापासून महिला प्रणीत विकासाच्या प्रयत्नांना जागतिक मंचावर नेण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी20 च्या बैठकांमध्येही प्रामुख्याने याच विषयाचा प्रभाव आहे.

या वर्षाचा अर्थसंकल्प देखील महिला प्रणीत विकासाच्या या प्रयत्नांना नवी गती देईल आणि यामध्ये तुम्हा सर्वांची खूप मोठी भूमिका आहे. मी या अर्थसंकल्पीय वेबिनार मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो नारी शक्तीची संकल्प शक्ती, इच्छाशक्ती, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची निर्णय शक्ती, तातडीने निर्णय घेण्याचे त्यांचे सामर्थ्य, निर्धारित लक्ष्यांना प्राप्त करण्यासाठी त्यांची तपश्चर्या, त्यांची पराक्रमांची पराकाष्ठा ही आपल्या मातृशक्तीची ओळख आहे. हे एक प्रतिबिंब आहे. जेव्हा आपण महिला प्रणीत विकास असं म्हणतो तेव्हा त्याचा पाया याच शक्ती आहेत. भारत मातेचे उज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी नारी शक्तीचे हे सामर्थ्य भारताची अनमोल शक्ती आहे. हाच शक्ती समूह या शतकात भारताच्या अतिशय मोठ्या प्रमाणात आणि वेगानं होणाऱ्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका बजावत आहे. मित्रांनो आज आपण भारताच्या सामाजिक जीवनात खूप मोठ्या क्रांतिकारक परिवर्तनाचा अनुभव घेत आहोत. गेल्या काही वर्षात भारताने ज्या प्रकारे महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे आज त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आज आपण पाहत आहोत की भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांमध्ये उच्च माध्यमिक शालेय किंवा त्यापुढे शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या तीन पटींनी वाढली आहे. भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये मुलींच्या नोंदणीचे प्रमाण 43 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे आणि हे प्रमाण समृद्ध असलेले देश, विकसित असलेले देश मग ती अमेरिका असेल, युके असेल जर्मनी असेल या सर्वांपेक्षा देखील जास्त आहे. याच प्रकारे वैद्यकीय क्षेत्र असो किंवा खेळाचे मैदान असो, व्यवसाय असो किंवा राजकीय घडामोडी असो भारतामध्ये महिलांची केवळ भागीदारीच वाढलेली नाही तर त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन नेतृत्व करू लागल्या आहेत. आज भारतामध्ये अशी अनेक क्षेत्रं आहेत ज्यामध्ये महिला शक्तीचे सामर्थ्य दिसून येत आहे. ज्या कोट्यवधी लोकांना मुद्रा कर्जे देण्यात आली आहेत त्यापैकी सुमारे 70 टक्के लाभार्थी देशातील महिला आहेत. या कोट्यवधी महिला आपल्या कुटुंबाचे केवळ उत्पन्नच वाढवत नाही आहेत तर अर्थव्यवस्थेसाठी नवे आयाम देखील खुले करत आहेत. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून विनातारण आर्थिक सहाय्य देणे असो, पशुपालनाला प्रोत्साहन देणे असो, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणे असो, ग्रामोद्योगाला चालना देणे असो, एफपीओ असो, क्रीडाक्षेत्र असो या सर्वांमध्ये जे प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्याचा सर्वाधिक लाभ आणि चांगल्यात चांगले परिणाम महिलांकडून मिळत आहेत. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामर्थ्याच्या मदतीने आपण देशाला कशा प्रकारे पुढे घेऊन जाऊ, आपण नारीशक्तीच्या सामर्थ्यामध्ये कशाप्रकारे वाढ करू याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात देखील दिसत आहे. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट स्कीम या योजने अंतर्गत महिलांना साडेसात टक्के व्याज देण्यात येणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पीएम आवास योजनेसाठी सुमारे 80 हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. भारतात ही रक्कम देशातील लाखो महिलांना आपली घरे बांधण्यासाठी सहाय्यकारक ठरणार आहे.  भारतात गेल्या काही वर्षांमध्ये पीएम आवास योजने अंतर्गत तीन कोटी पेक्षा जास्त घरे तयार झाली आहेत. त्यामध्ये बहुतेक प्रमाणात महिलांचीच नावे आहेत. तुम्हाला या गोष्टीची कल्पना येऊ शकते की एक काळ असा होता ज्यावेळी महिलांसाठी ना कधी त्यांच्या नावावर  शेतं व्हायची ना कधी धान्याची कोठारं त्यांच्या मालकीची असायची, ना दुकानांची मालकी असायची किंवा घरांची मालकी असायची. आज या व्यवस्थेने त्यांना किती मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले आहे, पीएम आवास ने महिलांना घराविषयीच्या आर्थिक निर्णयांमध्ये एक नवा आवाज दिला आहे.

मित्रांनो,
यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन युनिकॉर्न तयार करण्यासाठी… आता आपण स्टार्टअप्सच्या जगात युनिकॉर्न बद्दल ऐकतो, परंतु बचतगटांमध्येही हे शक्य आहे का?  ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला पाठबळ देण्याकरता हा अर्थसंकल्प आश्वासक घोषणा घेऊन आला आहे. देशाच्या या ध्येयदृष्टीचा आवाका तुम्हाला गेल्या काही वर्षांच्या विकासगाथेवरून लक्षात येईल. आज देशातील पाचपैकी एक बिगरशेती व्यवसाय महिला चालवत आहेत.  गेल्या 9 वर्षांत सात कोटींहून अधिक महिला, बचत गटांमध्ये सहभागी झाल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. या कोट्यवधी स्त्रिया किती मूल्य निर्मिती करत आहेत, याचा अंदाज तुम्ही त्यांच्या भांडवलाच्या गरजेवरूनही लावू शकता. 9 वर्षांत या बचत गटांनी 6 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या महिला केवळ लघुउद्योजक नाहीत, तर त्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर सक्षम संसाधन व्यक्ती म्हणूनही कार्यरत आहेत. बँक सखी, कृषी सखी, पशु सखी अशा रूपाने या महिला गावात विकासाचे नवे आयाम निर्माण करत आहेत.

मित्रांनो,

सहकार क्षेत्र, त्यातही महिलांची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे.  आज सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. येत्या काही वर्षांत 2 लाखाहून अधिक बहुउद्देशीय सहकारी, दुग्ध सहकारी आणि मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन होणार आहेत.  १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  यामध्ये महिला शेतकरी आणि उत्पादक गट मोठी भूमिका बजावू शकतात.  सध्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भरडधान्य अर्थात श्रीअन्न या बद्दल जनजागृती होत आहे. त्यांची मागणी वाढत आहे. भारतासाठी ही मोठी संधी आहे. यामध्ये महिला बचत गटांची भूमिका आणखी वाढवण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.आपल्या देशात १ कोटी आदिवासी महिला, बचत गटांमध्ये काम करतात.  त्यांना आदिवासी भागात लागवड होणाऱ्या श्रीअन्न याचा  पारंपरिक अनुभव आहे.  श्रीअन्नाच्या विपणनाशी संबंधित संधींचा वापर करावा लागेल. त्यापासून बनवलेल्या प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात संधी शोधावी लागेल. अनेक ठिकाणी सरकारी संस्था गौण वन उत्पादनांवर प्रक्रिया करून ते बाजारात आणण्यासाठी मदत करत आहेत.  आज दुर्गम भागात असे अनेक बचत गट तयार झाले आहेत, ते आपण व्यापक पातळीवर नेले पाहिजे.

मित्रांनो,

अशा सर्व प्रयत्नांमध्ये युवक-युवतींच्या कौशल्य विकासाचा मोठा वाटा असेल.  यामध्ये विश्वकर्मा योजना एक महत्वाचा सेतू म्हणून काम करेल. विश्वकर्मा योजनेतील महिलांसाठी असलेल्या विशेष संधी ओळखून त्यांना पुढे प्रोत्साहन द्यायला हवे. महिलांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जीईएम पोर्टल आणि ई-कॉमर्स हे एक प्रमुख माध्यम बनत आहेत. आज प्रत्येक क्षेत्र नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.

मित्रांनो,

देश आज 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या भावनेने पुढे जात आहे. जेव्हा आपल्या मुली सैन्यात जाऊन, राफेल उडवून देशाचे रक्षण करताना दिसतात, तेव्हा त्यांच्याबद्दलची विचारसरणीही बदलते.  स्त्रिया जेव्हा उद्योजक होतात, निर्णय घेतात, जोखीम घेतात, तेव्हा त्यांच्याबद्दलची विचारसरणीही बदलते. आता काही दिवसांपूर्वीच नागालँडमध्ये पहिल्यांदाच दोन महिला आमदार झाल्या आहेत. त्यापैकी एकाला मंत्रीही करण्यात आले आहे. महिलांचा सन्मान वाढवून, त्यांच्याप्रती समानतेची भावना वाढवूनच भारत वेगाने पुढे जाऊ शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करेन. तुम्ही सर्व महिला-भगिनी-मुलींनो, तुमच्या समोर येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा संकल्प घेऊन अग्रेसर व्हा.

मित्रांनो,

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी 8 मार्चला, महिला दिनी, महिला सक्षमीकरणावर एक अतिशय भावनोत्कट लेख लिहिला आहे.  राष्ट्रपती मुर्मूजींनी या लेखाची सांगता कोणत्या भावनेने केली आहे ती  प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. मी त्यांचेच शब्द इथे उद्धृत करतो - "या प्रगतीचा वेग वाढवणे ही आपल्या सर्वांची, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे."  म्हणून आज मी तुमच्यापैकी प्रत्येकाला विनंती करू इच्छिते की तुम्ही तुमच्या कुटुंबात, शेजारच्या किंवा कामाच्या ठिकाणी बदल घडवण्यासाठी स्वतःला समर्पित करा. कोणताही बदल जो मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, कोणताही बदल जो तिच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या संधींची शक्यता वाढवेल. माझे तुम्हाला हे सांगणे आहे. हे माझ्या अंतःकरणातून आले आहे. राष्ट्रपतींच्या या शब्दांनी मी माझे बोलणे संपवतो.  मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.  खूप खूप धन्यवाद!

***

JPS/SP/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905819) Visitor Counter : 152