पंतप्रधान कार्यालय

पर्यटनाचा मिशन मोडवर विकास साधणे या विषयावर आयोजित केलेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेलं संबोधन

Posted On: 03 MAR 2023 1:37PM by PIB Mumbai

 

नमस्कार।

या वेबिनार मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आजचा नवा भारत नव्या कार्यसंस्कृतीसह पुढे वाटचाल करत आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचीही खूप प्रशंसा झाली आहे, देशातील लोकांनी या अर्थसंकल्पाला खूप सकारात्मकपणे घेतलं आहे. देशात जुनी कार्य संस्कृती असती तर अर्थसंकल्पाबाबत अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा कुणी विचारही केला नसता. मात्र आज आमचं सरकार अर्थसंकल्पाच्या आधी आणि अर्थसंकल्पानंतरही अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाशी विस्तृत चर्चा करत असते, या सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असते. अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त फलनिष्पत्ती कशी करता येईल, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेच्या आत कशी पूर्ण होईल याबाबत, तसच अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अशा प्रकारचे वेबिनार उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपण हे जाणताच की सरकारचा प्रमुख म्हणून(गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून)  काम करण्याचा मला वीस वर्षाहून जास्त अनुभव आहे. या अनुभवाचं सार हे आहे की जेव्हा कुठल्याही धोरणात्मक निर्णयाशी त्या निर्णयाशी संबंधित भागधारक सुद्धा जोडले जातात, सहभागी होतात तेव्हा त्या धोरणाचे परिणाम सुद्धा मनासारखे आणि वेळेत मिळतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वेबिनार मध्ये आमच्या सोबत हजारो लोक सहभागी झाले, संपूर्ण दिवसभरात सर्वांनी मिळून खूप विचार मंथन केलं आणि मी हे सांगू शकतो की खूपच महत्त्वपूर्ण सूचना या वेबिनार मधून मांडल्या गेल्या आणि विशेष करुन आगामी काळाच्या अनुषंगाने पुढे आल्या. या वेबिनार मधून, जो अर्थसंकल्प आहे त्यावरच फक्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यातूनच प्राप्त परिस्थितीत कसं पुढे जाता येईल याबद्दल खूप उत्तम सूचना आल्या. आज आता आपण देशाच्या पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी हा वेबिनार करत आहोत.

 

मित्रहो,

भारतात पर्यटन क्षेत्राला नवी उंची गाठून देण्यासाठी, आपल्याला चाकोरीबाहेर जाऊन विचार करावा लागेल आणि दीर्घकालीन नियोजनासह मार्गक्रमणा करावी लागेल. जेव्हा एखादं ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा मुद्दा पुढे येतो, तेव्हा पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाची क्षमता किती आहे, या ठिकाणी पर्यटन सुलभ आणि सुखकारक होण्यासाठी कुठल्या पायाभूत सुविधांची गरज आहे, त्या कशा पूर्ण करता येतील, या पर्यटनस्थळाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय करता येईल अशाप्रकारच्या काही बाबी खूप महत्वपूर्ण ठरतात.या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी भविष्यकालीन कृती आराखडा आखताना, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची आपल्याला खूप मदत होईल. आता तसं बघितलं तर देशात पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराला खूप वाव आहे. समुद्र पर्यटन(समुद्रात आणि समुद्र किनारी),कांदळवन पर्यटन, हिमालय पर्यटन, साहस पर्यटन,वन्यजीव थोडक्यात वनपर्यटन, पर्यावरण-परिसंस्थात्मक पर्यटन, वारसास्थळ पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन, क्रीडा पर्यटन,   विवाह निमित्ताने पर्यटन, विविध परिषदांच्या माध्यमातून पर्यटन, असे पर्यटनस्थळांसाठीचे बहुविध पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता हेच पहा ना, रामायण  सर्किट, बुद्ध सर्किट, कृष्ण सर्किट, ईशान्य सर्किट, गांधी सर्किट, ही सर्व पर्यटन क्षेत्रांची जाळी, तीर्थक्षेत्रांची मांदियाळी आहेत, या सर्वांना आपल्या महान गुरुपरंपरेची पार्श्वभूमी आहे. संपूर्ण पंजाब तर या अशा तीर्थक्षेत्रांनी भरलेलं आहे.आपल्याला हे सर्व लक्षात घेऊन सर्वांना मिळून काम करायचच आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात, देशातील काही ठिकाणांची पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी, स्पर्धात्मक भावनेतून, एक आव्हान अशा  रुपात निवड करण्याबाबत विचार करण्यात आला आहे. हे आव्हान, प्रत्येक भागधारकाला, सर्वांनी मिळून प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देईल. पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासावरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.  त्यासाठी विविध भागधारकांना कसं सहभागी करून घेता येईल यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी.

 

मित्रांनो,

जेव्हा आपण पर्यटनाबद्दल बोलतो तेव्हा काही लोकांना वाटतं की हा एक श्रीमंती थाटाचा शब्द आहे, तो समाजातील उच्च उत्पन्न गटातील लोकांचच प्रतिनिधित्व करतो, पर्यटन ही जणू या गटाचीच मक्तेदारी आहे. मात्र, भारताच्या संदर्भात पर्यटनाची व्याप्ती खूप विस्तृत आहे, तिला खूप प्राचीन परंपरा आहे.  शतकानुशतकं इथे यात्रा होत आल्या आहेत, त्या आपल्या सांस्कृतिक-सामाजिक जीवनाचा एक भाग बनल्या आहेत. विशेष म्हणजेजेव्हा साधनसामुग्री नव्हती, वाहतूक व्यवस्था नव्हती, खूप अडचणी होत्या, अशा प्रतिकूल परिस्थितीतही या यात्रा होत होत्या. लोक त्रास सहन करून यात्रेच्या प्रवासाला निघत असत.  चारधाम यात्रा असो, १२ ज्योतिर्लिंग असो किंवा ५१ शक्तीपीठं असो, अशा अनेक यात्रा आपल्या  श्रद्धास्थानांना एकत्र गुंफत होत्या.  आपल्या या यात्रांनी देशाची एकात्मता अधिक बळकट करण्याचं कामही केलं आहे.  देशातील अनेक मोठमोठ्या शहरांची संपूर्ण अर्थव्यवस्था, त्या संपूर्ण जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था यात्रांवर अवलंबून होती.  यात्रांना अशी ही प्राचीन परंपरा लाभलेली असूनही या यात्रास्थळी काळाशी सुसंगत काळाच्या गरजेनुसार सुविधा वाढवण्याकडे लक्ष दिलं गेलं नाही हे दुर्दैवी आहे.  आधी शेकडो वर्षांची गुलामगिरी आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळात दशकानुदशकं या स्थळांची झालेली राजकीय उपेक्षा यामुळे देशाचं खूप नुकसान झालं आहे.

आता आजचा भारत ही परिस्थिती बदलत आहे.  सुविधा वाढल्या की प्रवाशांमध्ये प्रवासाविषयी आवड कशी वाढते,आकर्षण कसं वाढतं, प्रवास कसा आपलासा वाटायला लागतो, प्रवासी संख्येत कशी मोठी वाढ होते, हे सुद्धा आता आपण देशात पाहत आहोत.  वाराणसीमध्ये  काशी विश्वनाथ धामच्या नुतनीकरणाआधीएका वर्षात सुमारे 70-80 लाख लोक मंदिराला भेट द्यायचे.  काशी विश्वनाथ धामच्या नुतनीकरणानंतर वाराणसीला भेट देणाऱ्यांच्या संख्येनं गेल्या वर्षी 7 कोटींचा आकडा ओलांडला आहे. याच प्रकारे केदारनाथाच्या खोऱ्यातही, नुतनीकरणाआधी वर्षाला केवळ चार ते पाच लाख लोक दर्शनासाठी येत असत.  मात्र गेल्या वर्षी 15 लाखांहून जास्त भाविकांनी बाबा केदारनाथाचं दर्शन घेतलं.  माझा गुजरातचा एक जुना अनुभव मी तुम्हाला सांगतो.  गुजरातमध्ये बडोद्याजवळ पावागड नावाचं तीर्थक्षेत्र आहे.  जेव्हा तिथे नुतनीकरण झालेलं नव्हतं, सर्व जुनाट अवस्था आणि व्यवस्था होती, तेव्हा  जेमतेम 2 हजार, 3 हजार, 5 हजार, अशा संख्येनं लोक यायचे, मात्र तिथे जीर्णोद्धार होताच, काही पायाभूत सुविधा निर्माण करताच, सुखसोयी पुरवताच, पावागड मंदिराच्या नुतनीकरणानंतर, नवनिर्माणानंतर, इथे जवळपास सरासरी 80 हजार लोक येतात.  म्हणजेच सुविधा वाढल्या तर त्याचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर झाला, पर्यटन वाढवण्यासाठी आजूबाजूला पर्यटनपूरक गोष्टीही वाढू लागल्या आहेत.  आणि प्रवाशांची अधिकाधिक वाढणारी संख्या म्हणजे स्थानिक पातळीवर उत्पन्नाच्या अधिकाधिक संधी, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिक संधी! आता बघाजगातील सर्वात उंच पुतळ्याचच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उदाहरण देता येईल.  हा पुतळा उभारल्यानंतर वर्षभरात 27 लाख लोक तो पाहण्यासाठी येऊन थडकले.  भारतातील विविध ठिकाणी नागरी सुविधा वाढवल्या, चांगली डिजिटल संपर्क व्यवस्था उपलब्ध करुन दिली, उत्तम उपाहारगृह-निवासी व्यवस्था-रुग्णालयं उपलब्ध असतील, अस्वच्छतेचा मागमूसही नसेल, उत्कृष्ट पायाभूत सुविधा मिळाल्या, तर भारताचं पर्यटन क्षेत्र कैक पटींनी वाढू शकतं, हे यावरून दिसून येतं.

 

मित्रांनो,

तुमच्याशी बोलताना मला, अहमदाबाद शहरात एक कांकरिया नावाचा तलाव आहे, या कांकरिया lake Project’च्या विषयामध्ये काही सांगण्याची इच्छा होत आहे.  आता हा कांकरिया lake प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी तिथे सर्वसाधारणपणे फार कोणी फिरकत नव्हते, असंच कधीतरी तिकडून जावं लागलं तर जायचंनाहीतर तिथे कोणीही जात नव्हतं. आम्ही या ठिकाणी केवळ तलावाचा पुनर्विकासच केला नाही तर फूड स्टॉल्स मध्ये काम करणाऱ्यांचा कौशल्य विकास देखील केला. आधुनिक पायाभूत सुविधां बरोबरच आम्ही त्या ठिकाणी स्वच्छतेवर देखील खूप जास्त भर दिला. तुम्ही कल्पना करू शकता की आज तिथे प्रवेश फी असूनही दिवसाला दहा हजार लोक जातात. अशा पद्धतींचा वापर करून प्रत्येक पर्यटन स्थळ आपले एक महसूल संकलनाचे मॉडेल देखील विकसित करू शकते. मित्रांनो हा असा काळ आहे ज्यावेळी आपली गावे देखील पर्यटनाची केंद्रं बनत आहेत.  पूर्वीपेक्षा कितीतरी चांगल्या बनत चाललेल्या पायाभूत सुविधांमुळे दुर्गम भागातील गावे आता पर्यटनाच्या नकाशावर येऊ लागली आहेत. केंद्र सरकारने सीमावर्ती भागात वसलेली जी गावे आहेत तिथे वायब्रंट बॉर्डर व्हिलेज योजना सुरू केली आहे. अशा वेळी होम स्टे, लहान हॉटेल्स, लहान रेस्टॉरंट यांसारख्या अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी लोकांना जास्तीत जास्त पाठबळ देण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे.

 

मित्रांनो,

आज एक गोष्ट मी भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संदर्भात देखील सांगेन. आज ज्या प्रकारे जगात भारताविषयीचे आकर्षण वाढत चालले आहे, भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढत आहे.  गेल्या वर्षी जानेवारीमध्ये केवळ दोन लाख परदेशी पर्यटकच आले होते. तर यावर्षी जानेवारी महिन्यात आठ लाखांपेक्षा जास्त परदेशी पर्यटक भारतात आले.  परदेशातून जे पर्यटक भारतात येत आहेत आपल्याला त्यांचे देखील प्रोफाइल तयार करून आपला टार्गेट ग्रुप ठरवावा लागेल. परदेशात राहणारे ते लोक ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च करण्याची क्षमता असते, आपल्याला त्यांना जास्तीत जास्त संख्येने भारतात आणण्यासाठी एक विशेष धोरण बनवण्याची गरज आहे. अशा प्रकारचे पर्यटक भारतात कमी दिवस का राहिनात, मात्र जास्त पैसे खर्च करून जातील. आज जे परदेशी पर्यटक भारतात येत आहेत ते सरासरी 1700 डॉलर खर्च करतात तर अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी सरासरी 2500 डॉलर आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे पाच हजार डॉलर खर्च करतात. भारतात देखील जास्त खर्च करणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बरेच काही आहे. प्रत्येक राज्याने याच विचाराने देखील आपल्या पर्यटन धोरणात बदल करण्याची गरज आहे. आता जसे मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देईन. सामान्यतः असे सांगितले जाते की सर्वात जास्त काळ एखाद्या  ठिकाणी थांबणारा जो पर्यटक असतो तो बर्ड वॉचर(पक्षी निरीक्षक) असतो. हे लोक महिनोन महिने एखाद्या देशात तळ ठोकून बसलेले असतात.  भारतामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. आपल्याला अशा पोटेन्शिअल टुरिस्टचा( पर्यटनक्षेत्राच्या विकासासाठी पूरक पर्यटक) देखील विचार करून त्यांच्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून आपली धोरणे बनवावी लागतील.

 

मित्रांनो,

या सर्व प्रयत्नांच्या दरम्यान तुम्हाला पर्यटन क्षेत्रामधील एका मूलभूत आव्हानावर देखील काम करायचे आहे  ते म्हणजे आपल्याकडे असलेली व्यावसायिक टुरिस्ट गाईडची कमतरता. गाईड्ससाठी स्थानिक महाविद्यालयांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम असला पाहिजे, स्पर्धा असली पाहिजेखूप चांगले तरुण या व्यवसायात पुढे येण्यासाठी मेहनत करतील आणि आपल्याला अतिशय आकर्षक पद्धतीने अनेक भाषा बोलणारे चांगले टुरिस्ट गाईड मिळतील. त्याच प्रकारे डिजिटल टुरिस्ट गाईड देखील आता उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून देखील आपण ते करू शकतो. कोणत्यातरी एका विशिष्ट पर्यटन स्थळावर जे गाईड्स काम करत आहेत, त्यांचा एक विशिष्ट असा पोशाख म्हणजेच गणवेश देखील असला पाहिजे. यामुळे लोकांची सर्वात आधी नजर त्यांच्यावर पडेल आणि त्यांना लक्षात येईल की समोर जी व्यक्ती आहे ती टुरिस्ट गाईड आहे आणि ती व्यक्ती आपल्याला या ठिकाणी मदत करेल. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्यावेळी कोणताही पर्यटक कोणत्याही ठिकाणी पोहोचतो त्यावेळी त्याच्या मनात अनेक प्रश्न साठलेले असतात. त्याला अनेक प्रश्नांची तात्काळ उत्तरे हवी असतात. अशावेळी गाईड या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यात त्यांची मदत करू शकतो.

 

मित्रांनो,

मला पूर्णपणे खात्री आहे की या वेबिनारच्या काळात तुम्ही पर्यटनाशी संबंधित प्रत्येक पैलूवर गांभीर्याने विचार कराल. तुम्ही अधिक चांगले तोडगे घेऊन समोर याल आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे जसे पर्यटनासाठी असे समजा की प्रत्येक राज्य एक किंवा दोन खूपच चांगल्या पर्यटन स्थळांवर भर देत आहे.  एक सुरुवात आपण कशी करू शकतो. आपल्याला हे ठरवता आले पाहिजे की शाळेतून जे विद्यार्थी पर्यटकांच्या स्वरूपात बाहेर पडतात.  प्रत्येक शाळा पर्यटन करतच असते. पर्यटनासाठी निघतानाच दोन दिवस तीन दिवसाचे कार्यक्रम आखले जातात. त्यावेळी तुम्ही ठरवू शकता की बरं मग या अमुक एखाद्या ठिकाणी सुरुवातीला शंभर विद्यार्थी येतील मग दर दिवशी 200 येतील मग दर दिवशी 300 येतील मग दर दिवशी 1000 येतील. वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी येतील आणि त्या खर्च करतच असतात. या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना वाटेल की इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत तर चला ही व्यवस्था उभारुया.  ही दुकाने आपण इथे बांधूया. पाण्याची व्यवस्था करूया. सर्व काही आपोआप सुरू होईल. आणि असं समजा जर सर्व राज्यांनी हे ठरवले की नॉर्थ ईस्ट च्या अष्टलक्ष्मी ही आपली आठ राज्यं आहेत. आपण दरवर्षी आठ विद्यापीठे प्रत्येक राज्यात निश्चित केली पाहिजेत आणि प्रत्येक विद्यापीठ ईशान्येकडील एका राज्यात पाच दिवस सात दिवस पर्यटनाचा कार्यक्रम करेल. दुसरी विद्यापीठे दुसऱ्या राज्यात पर्यटन करतील. तिसरे विद्यापीठ तिसऱ्या राज्यात.  तुम्ही बघा तुमच्या राज्यात आठ विद्यापीठे अशी असतील ज्यामध्ये शिकणाऱ्या आपल्या युवकांना ईशान्येकडील आठ राज्यांची सर्व प्रकारची माहिती असेल. त्याच प्रकारे सध्या वेडिंग डेस्टिनेशन हा एक खूप मोठा व्यवसाय झालेला आहे.  खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्ट डेस्टिनेशन बनली आहेत. लोक परदेशात जातात मग आपण आपल्या राज्यांमध्ये वेडिंग डेस्टिनेशनच्या रूपात विशेष पॅकेज जाहीर करू शकतो का आणि मी तर सांगेन की आपल्या देशात एक वातावरण बनवले पाहिजे की गुजरात मधील लोकांना वाटले पाहिजे की जर 2024 मध्ये जर आपल्या इकडच्या लग्नासाठी वेडिंग डेस्टिनेशन असेल तर ते तामिळनाडूमध्ये असेल आणि तामिळ पद्धतीने आपण लग्न करूया. घरात दोन मुले आहेत तर कोणाला असे वाटेल की एकाचे लग्न आपण आसामी पद्धतीने केले पाहिजे आणि दुसऱ्याचे लग्न पंजाबी पद्धतीने करण्याची आम्हाला इच्छा आहे.  वेडिंग डेस्टिनेशन आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. तुम्ही कल्पना करू शकता की वेडिंग डेस्टिनेशन इतक्या मोठ्या व्यवसायाची संधी आहे. आपल्या देशात अतिशय उच्च श्रेणीतले लोक परदेशात जात असतील. पण मध्यमवर्ग आणि उच्च मध्यम वर्गातील लोक आजकाल वेडिंग डेस्टिनेशन वर जातात आणि त्यातही जेव्हा नवेपणा असतो तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये तो काळ संस्मरणीय बनून जातो. आपण या दिशेचा अजून पर्यंत वापर केलेला नाही. काही निवडक ठिकाणं आपल्या पद्धतीने या गोष्टी करत आहेत. त्याच प्रकारे विविध प्रकारच्या कॉन्फरन्सेस, आज जगातील  लोक कॉन्फरन्ससाठी येतात. आपल्याला अशा पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत, सार्वजनिक खाजगी भागीदारीने आपण हे केलं पाहिजे. लोकांना सांगितले की  काही अशी मूलभूत व्यवस्था करा तर कॉन्फरन्सेस साठी लोक येतील. आलेले लोक हॉटेलात देखील थांबतील, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री देखील वाढेल. म्हणजेच एक संपूर्ण इकोसिस्टीम विकसित होऊ लागेल.  अशाच प्रकारे स्पोर्ट्स टुरिझम देखील खूप मोठे क्षेत्र आहे. आपण आमंत्रित केले पाहिजे. आता बघा अलीकडे कतारमध्ये फुटबॉल सामने झाले. संपूर्ण जगाचा कतारच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा प्रभाव पडला.  जगभरातून लोक आले, लाखो लोक आले. आपण लहान गोष्टींपासून सुरुवात करुया. त्या खूप मोठ्या होऊ शकतात. आपल्याला या पद्धती शोधल्या पाहिजेत. त्यासाठी पुन्हा एकदा पायाभूत सुविधा, सुरुवातीला लोक येतील न येतील आपण आपल्या शाळेतील विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थी, आपल्या सरकारच्या बैठकांसाठी त्या ठिकाणी येणे जाणे. जर आपण एका स्थळाला(डेस्टिनेशनला) महत्त्व देण्यास सुरू केलं तर आपोआप इतर लोक देखील तिथे ये-जा सुरू करतील आणि मग त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण होईल. मला असे वाटते की भारतात कमीत कमी अशी 50 पर्यटनस्थळं आपण विकसित केली पाहिजेत की जगातील प्रत्येक कोपऱ्याला त्याची माहिती असेल की जर आपण भारतात जात आहोत तर या ठिकाणी गेलं पाहिजे. प्रत्येक राज्याला हा अभिमान वाटला पाहिजे की जगातील इतक्या देशातील लोक आमच्याकडे येतात. जगातील इतक्या देशांना आपण टार्गेट करणार आहोत. आपण त्या देशातील दुतावासाला माहितीपुस्तिका पाठवू, त्यांना सांगू की तुम्हाला तुमच्या पर्यटकांसाठी मदत हवी असेल तर आम्ही या-या प्रकारची मदत करू शकतो. आपल्याला संपूर्ण व्यवस्था, आपले जे टूर ऑपरेटर आहेत त्यांना देखील मी आग्रहाने सांगेन की तुम्ही नव्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आपल्याला आपली ॲप्स, आपली डिजिटल कनेक्टिव्हिटी या सर्वांना आधुनिक बनवावे लागेल आणि आपलं कोणतंही पर्यटनस्थळ असं असता कामा नये ज्याची ॲप्स यूएनच्या सर्व भाषांमध्ये नसतील आणि भारतातील सर्व भाषांमध्ये नसतील.  जर आपण केवळ इंग्रजी आणि हिंदीमध्ये आपली वेबसाईट तयार केली तर ते शक्य होणार नाही.  इतकेच नाही तर आपल्या पर्यटनस्थळांवर मार्गदर्शक सूचना देखील सर्व भाषांमधून असल्या पाहिजेत. जर तामिळ भाषिक एखादे सामान्य कुटुंब आले असेल आणि बस मधून जायचे असेल तर त्या वेळेला त्याला तामिळमध्ये जर मार्गदर्शक संकेत दिसले तर तो अगदी सहजतेने तिथे पोहोचू शकेल. या लहान लहान गोष्टी आहेत ज्यांचे महत्त्व एकदा आपल्या लक्षात आले तर नक्कीच आपण वैज्ञानिक पद्धतीने पर्यटनाचा विकास करू शकतो. 

मला तुमच्याकडून अशी आशा आहे की आज या वेबिनार मध्ये तुम्ही आणखी सविस्तर चर्चा कराल आणि रोजगाराच्या अनेक संधी ज्या कृषी क्षेत्रात आहेत, जशा रियल इस्टेट डेव्हलपमेंट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात आहेत, टेक्स्टाईल मध्ये आहेत, तितकेच सामर्थ्य पर्यटन क्षेत्रातील रोजगारांच्या संधींमध्ये आहे. मी सर्वांना निमंत्रण देतो आणि तुम्हाला आज या वेबिनारसाठी अनेक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.

***

U.Ujgare/A.Save/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904130) Visitor Counter : 172