पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इटलीच्या पंतप्रधानांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

Posted On: 02 MAR 2023 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2023

सन्माननीय पंतप्रधान महोदय, मेलोनी, दोन्ही देशांचे प्रतिनिधी आणि माध्यम क्षेत्रातील सहकारी,

नमस्कार !

पंतप्रधान मेलोनी यांच्या या पहिल्याच भारत दौऱ्यात मी त्यांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळाचे हार्दिक स्वागत करतो. गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये, इटलीच्या नागरिकांनी त्यांना पहिल्या महिला आणि सर्वात युवा पंतप्रधान म्हणून निवडून दिले. या ऐतिहासिक यशाबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी आपला  कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच बाली इथल्या जी-20 शिखर परिषदेत आमची पहिली बैठक झाली होती.

मित्रांनो,

आजच्या बैठकीत झालेली चर्चा अत्यंत फलदायी आणि उपयुक्त ठरली. या वर्षात भारत आणि इटली आपल्या द्विपक्षीय संबंधांचे 75 वे वर्ष साजरे करत आहे.  आणि याचे औचित्य साधत, आम्ही भारत-इटली यांच्यातील भागीदारीला राजनैतिक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपले आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. आमच्या, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियांनामुळे, भारतात गुंतवणुकीच्या अपार संधी खुल्या झाल्या आहेत. आम्ही अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, माहिती तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर, टेलिकॉम, अवकाश अशा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबद्दल विशेष भर दिला आहे. भारत आणि इटली यांच्यात एक ‘ स्टार्ट अप पूल’  स्थापन करण्याची आज आम्ही घोषणा करत आहोत, ज्याचे आम्ही स्वागत करतो.

मित्रांनो,

आणखी एक क्षेत्र आहे, जिथे आम्ही द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय सुरू करतो आहोत, आणि ते क्षेत्र आहे संरक्षण विषयक सहकार्याचे क्षेत्र. भारतात संरक्षण उत्पादन क्षेत्रात, सह-उत्पादन आणि सह-विकास यांच्या संधी निर्माण झाल्या आहेत, ज्या दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरू शकतात. आम्ही दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये नियमित स्वरूपात संयुक्त सराव आणि प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्याचाही निर्णय घेतला आहे. दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात भारताच्या लढाईत इटली खांद्याला खांदा लावून साथ देत आहे. हे सहकार्य आणखी भक्कम करण्यासाठी देखील आम्ही सखोल चर्चा केली.

मित्रहो,

भारत आणि इटली दरम्यान  प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत, तसंच आणि इथल्या नागरिकांचेही एकमेकांशी दृढ संबंध आहेत. सध्याच्या काळाच्या गरजा ओळखून आम्ही संबंधांना  एक नवं रूप आणि नवीन बळ देण्यावर आमच्यात चर्चा झाली.  दोन्ही देशांदरम्यान   स्थलांतर आणि प्रवास भागीदारी करारावर सुरु असलेल्या चर्चेला विशेष महत्व आहे. या कराराची पूर्तता लवकर झाली, तर परस्पर देशांच्या जनते दरम्यानचे संबंध आणखी दृढ होतील. दोन्ही    देशांच्या उच्च शिक्षण संस्थांमधील सहकार्याला चालना देण्यावरही आम्ही भर दिला आहे. भारत   आणि इटली दरम्यानच्या संबंधांची 75 वी  वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील विविधता, इतिहास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, क्रीडा आणि अन्य क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी मिळवलेलं यश यावेळी जागतिक पटलावर  प्रदर्शित केलं जाईल.

मित्रहो,

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्न, इंधन आणि खते, याबाबतच्या   समस्येची झळ  सर्व देशांना बसली आहे. विकसनशील देशांवर याचा सर्वात जास्त नकारात्मक प्रभाव पडला आहे. आम्ही याबाबतही सामायिक चिंता व्यक्त केली आहे. या समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रित प्रयत्नांवर आम्ही भर दिला. भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 परिषदेत देखील या विषयाला आम्ही प्राध्यान्य देणार आहोत.युक्रेन संघर्ष केवळ संवाद आणि  मुत्साद्देगिरीनेच सोडवला जाऊ शकतो, अशी भूमिका भारताने सुरुवातीपासूनच घेतली आहे आणि कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्याची भारताची पूर्ण तयारी आहे. प्रशांत महासागर  क्षेत्रात इटलीच्या सक्रीय भागीदारीचं देखील आम्ही स्वागत करतो. इटलीने प्रशांत महासागर उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.  या द्वारे आम्ही प्रशांत महासागर क्षेत्रात आपलं सहकार्य आणखी वाढवण्यासाठीची क्षेत्र निश्चित करू शकतो. जागतिक वास्तविकता चांगल्या प्रकारे दर्शविण्यासाठी बहु-पक्षीय संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. या विषयावरही आम्ही चर्चा केली.

महोदया,

आज संध्याकाळी आपण रायसीना संवादामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहात. त्यावेळी आपण केलेलं संबोधन ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या या भारत भेटीसाठी  आणि आपल्यामध्‍ये झालेल्या फलदायी चर्चेसाठी आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे खूप खूप आभार!

 

 

S.Bedekar/Radhika/Rajashree/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1903704)