रेल्वे मंत्रालय
बैसाखी दरम्यान गुरु कृपा यात्रेत भारत गौरव पर्यटक रेल्वेने पवित्र शीख देवस्थानांना भेट देण्याची उत्तम संधी
11 दिवस / 10 रात्रींची ही सर्व समावेशक सहल लखनौ येथून 5 एप्रिल 2023 रोजी सुरू होईल आणि 15 एप्रिल 2023 रोजी संपेल
या टूर पॅकेजेची किमान किंमत प्रति व्यक्ती 19,999/- पासून सुरू
या विशेष रेल्वेमधून 678 भाविक प्रवास करू शकतात
Posted On:
21 FEB 2023 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2023
रेल्वे मंत्रालय आपल्या भारत गौरव पर्यटक गाड्यांच्या ताफ्याद्वारे भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा प्रचार करत आहे. या महान राष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी विविध प्रसिद्ध संकल्पनेवर आधारित परिक्रमा मार्गावर रेल्वेद्वारे सफरी आयोजित केल्या जात आहेत.
शीख धर्माच्या भाविकांच्या श्रद्धांचा आदर करत, भारतीय रेल्वे येत्या एप्रिल महिन्यात आपल्या विशेष भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे गुरु कृपा यात्रेचा प्रारंभ करत आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिना संपूर्ण उत्तर भारतात बैसाखी महिना म्हणूनही साजरा केला जातो. संबंधित भागधारकांशी विविध स्तरांवर सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर भारतीय रेल्वेने देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या पवित्र शीख देवस्थानांच्या या दौऱ्याचे खास आयोजन केले आहे.
भारतीय रेल्वेने 11 दिवस आणि 10 रात्रींचा सर्व समावेशक दौरा आखला आहे, जो 5 एप्रिल 2023 रोजी लखनौ येथून सुरू होईल आणि 15 एप्रिल 2023 रोजी संपेल. या पवित्र प्रवासादरम्यान, यात्रेकरू सर्वात प्रमुख पूजनीय स्थळांना भेट देतील. यामध्ये शीख धर्माच्या पाच पवित्र तख्तांचा समावेश आहे. या दौऱ्यात आनंदपूर साहिब येथील श्री केसगढ साहिब गुरुद्वारा आणि विरासत-ए-खालसा, किरतपूर साहिब येथील गुरुद्वारा श्री पातालपुरी साहिब, सरहिंद येथील गुरुद्वारा श्री फतेहगढ साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि श्री हरिमंदिर साहिब, भटिंडा येथील श्री दमदमा साहिब, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब, बीदर येथील गुरुद्वारा श्री गुरु नानक झिरा साहिब आणि पाटणा येथील गुरुद्वारा श्री हरिमंदरजी पाटणा साहिब या पवित्र स्थानांच्या भेटींचा समावेश करण्यात आला आहे.
आयआरसीटीसी द्वारे चालवण्यात येणाऱ्या या रेल्वेला 9 स्लीपर क्लास कोच, 1 AC-3 टियर आणि 1 AC- 2 टियर कोच जोडलेले असतील. आयआरसीटीसी, एकूण 678 प्रवाशांच्या क्षमतेसह ( परवडणाऱ्या दरातील दर्जा मानक श्रेणीमध्ये बहुसंख्य) स्टँडर्ड, सुपीरियर आणि कम्फर्ट अशा 3 श्रेणींमध्ये टूर पॅकेज ऑफर करत आहे. या सर्व समावेशक टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना एकमेकांशी सहज संवाद साधता यासाठी विशेष रचना असलेल्या खास डब्यांमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, संपूर्ण ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, दर्जेदार हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, प्रेक्षणीय स्थळांसह संपूर्ण रस्ता प्रवास खर्च यांचा समावेश असेल. टूर एस्कॉर्ट्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, ऑन-बोर्ड सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंग या सेवाही या दौऱ्यात उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या गुरुद्वारांमध्ये तसेच प्रवासादरम्यान लंगरमध्ये सहभाग होण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
जास्तीत जास्त भाविकांना या यात्रेचा लाभ घेता यावा यासाठी आयआरसीटीसी ने या सफरीचा खर्च आकर्षक ठेवला आहे. समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या मार्गावरून घडणाऱ्या या आध्यात्मिक प्रवासात शीख धर्माच्या अनुयायांचे स्वागत करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज आहे.
अधिक तपशीलांसाठी कृपया येथे क्लिक करा.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901180)
Visitor Counter : 220