राष्ट्रपती कार्यालय

अरुणाचल प्रदेश विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे मार्गदर्शन


लोकप्रतिनिधींनी राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कायम झटावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 21 FEB 2023 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज इटानगर इथे अरुणाचल प्रदेश विधीमंडळाच्या विशेष सत्राला संबोधित केले.

यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, शिस्त आणि उत्तम व्यवहार ही संसदीय व्यवस्थेची ओळख आहे. त्यामुळे, अशा विधीमंडळात होणाऱ्या चर्चा, आणि मांडले जाणारे विषय उच्च दर्जाचे असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी, विकास आणि लोककल्याणाच्या मुद्यांवर सर्वसहमती व्हायला हवी, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. अरुणाचल प्रदेश विधिमंडळाने संसदीय लोकशाहीची उच्च प्रतीची प्रतिष्ठा जतन केली आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. निकोप लोकशाहीसाठी सध्याच्या आणि याआधीच्याही विधीमंडळ सदस्यांच्या मनात आणि वर्तणुकीत असलेल्या आदरभावाचेही त्यांनी कौतूक केले.

आजच्या काळात पर्यावरण प्रदूषण आणि हवामान बदल हे महत्वाचे विषय आहेत,असं राष्ट्रपती म्हणाल्या. या समस्यांवर आपल्याला लवकरात लवकर समाधान शोधण्याची गरज आहे. अरुणाचल प्रदेशासारख्या भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील राज्यात तर हे विषय अधिकच महत्वाचे आहेत, असं त्या म्हणाल्या. इथल्या धोरणकर्त्यांनी या विषय प्राधान्यक्रमावर घेतल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘पाक्के घोषणापत्रा'च्या द्वारे अरुणाचल प्रदेशने हवामान बदल विषयक समस्यांवर समाधान शोधण्याची कटिबद्धता व्यक्त केली आहे. हवामान बदलाचा प्रश्न सोडवण्यासाठी इतर राज्येही हा पायंडा गिरवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाअंतर्गत, अरुणाचल प्रदेश विधीमंडळाने, ‘ई-विधान’ या कागदविरहित डिजिटल उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. राज्य सरकारने 2022-23 हे वर्ष ‘ई-प्रशासन’ वर्ष म्हणून जाहीर केले असून ई-प्रशासनाशी संबंधित अनेक उपक्रम राबवले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांमुळे, अरुणाचल प्रदेशात प्रशासकीय सुधारणा तर होतीलच; शिवाय सर्वसामान्य लोकांचे आयुष्यही सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधीमंडळाच्या वाचनालयात, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश उपलब्ध आहे, याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. 'नो युवर असेंब्ली' उपक्रमांतर्गत ही विधानसभा विद्यार्थ्यांना वेळोवेळी विधीमंडळाच्या कामकाजाची ओळख करून देण्यासाठी आमंत्रित करते, असेही त्यांनी नमूद केले. युवा पिढी या सुविधांचा लाभ घेऊन देशाच्या व राज्याच्या प्रगतीला हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अरुणाचल प्रदेशच्या भूमीवर शतकानुशतके स्वयंशासन आणि तळागाळातील लोकशाहीची अत्यंत मजबूत अशी व्यवस्था अस्तित्वात आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.  या राज्यातील जनतेने आधुनिक लोकशाही प्रक्रियेतही सक्रिय सहभाग घेतला आहे, ज्यातून त्यांची प्रगल्भ राजकीय जाणीव आणि लोकशाहीवरील विश्वास दिसून येतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. लोकप्रतिनिधींनी राज्याच्या विकासासाठी आणि लोकहितासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते, असे सांगत, राज्याचे सर्वोच्च धोरणकर्ते या नात्याने विधानसभा सदस्यांचा राज्याच्या विकासात मोलाचा वाटा आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. 

आपल्या देशाच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात, महिलांचा अधिकाधिक सहभाग असायला हवा. अरुणाचल प्रदेश विधानसभेसह सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींच्या इतर संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

अरुणाचल प्रदेश देशातील एक महत्वाचे राज्य असून, भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणातही त्याचा महत्वाचा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्क साधनांच्या अभावामुळे ईशान्य प्रदेश आर्थिक विकासाच्या लाभांपासून वंचित राहिला आहे. मात्र आता केंद्र सरकार ईशान्येकडील दळणवळण आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अरुणाचल प्रदेशात विकासाचा सूर्य तळपत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. समृद्ध नैसर्गिक संसाधने उत्तम दर्जाचे मनुष्यबळ या बळावर, अरुणाचल प्रदेशमध्ये गुंतवणूकीचे आकर्षक ठिकाण आणि व्यापार आणि व्यवसायाचे केंद्र बनण्याची पूर्ण क्षमता आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

या भागातील लोक आपल्या मूळ सांस्कृतिक वारशापासून तुटून न जाता विकासाच्या मार्गावर पुढे जात राहावेत, यासाठी आपण या भागातील परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अरुणाचल प्रदेशचे लोकप्रतिनिधी या नात्याने, या विधानसभेच्या सदस्यांची राज्याच्या सांस्कृतिक मूल्ये आणि परंपरांची समृद्धता जपत सामाजिक बदलाला चालना देण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी अधोरेखित केले

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901030) Visitor Counter : 142