पंतप्रधान कार्यालय
राजस्थानातील दौसा येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच शिलान्यास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
12 FEB 2023 11:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2023
बंधू आणि भगिनींनो,
जेव्हा असे आधुनिक रस्ते, आधुनिक रेल्वे स्थानके, रेल्वे मार्ग, मेट्रो, विमानतळ उभारले जातात तेव्हा देशाच्या प्रगतीला चालना मिळते. जगात झालेले असे अनेक अभ्यास सांगतात की, पायाभूत सुविधांवर केलेला खर्च प्रत्यक्षात अनेक पटींनी परिणाम घडवतो. पायाभूत सुविधांमध्ये केलेली एक गुंतवणूक, त्याहीपेक्षा अधिक गुंतवणुकीला आकर्षित करते. केंद्र सरकार गेली 9 वर्षे पायाभूत सुविधांमध्ये सतत मोठी गुंतवणूक करत आहे. राजस्थानातील महामार्गांच्या उभारणीसाठी गेल्या काही वर्षांत 50 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात तर आम्ही पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वर्ष 2014 मध्ये पायाभूत सुविधांसाठी केलेल्या तरतुदीच्या ही पाच पटींहून अधिक आहे. राजस्थानला या गुंतवणुकीचा फार मोठा लाभ होणार आहे. येथील गावागावातील गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा चांगला फायदा मिळणार आहे.
मित्रांनो,
जेव्हा सरकार महामार्ग, बंदरे, विमानतळ इत्यादीच्या उभारणीसाठी गुंतवणूक करते, देशात ऑप्टीकल फायबरचे जाळे निर्माण करते तेव्हा डिजिटल जोडणीच्या प्रमाणात वाढ होते. जेव्हा सरकार गरीब जनतेसाठी काही कोट्यवधी घरे उभारते, वैद्यकीय महाविद्यालये सुरु करते, सामान्य लोकांपासून व्यापार-उद्योग करणाऱ्यांपर्यंत, लहान दुकान चालवणाऱ्यांपासून मोठ-मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वांना बळकटी मिळत जाते. सिमेंट, लोखंडी सळया,वाळू,खडी अशा विविध सामानाच्या व्यापारापासून वाहतुकीपर्यंत विविध टप्प्यावर प्रत्येकाला लाभ मिळत जातो. या उद्योगांमुळे अनेक नवे रोजगार निर्माण होतात. दुकानांची उलाढाल वाढत गेली की त्यात काम करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होते. म्हणजेच, पायाभूत सुविधांमध्ये जितकी अधिक गुंतवणूक केली जाते तितकीच रोजगार निर्मिती देखील होत जाते.दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या उभारणीमध्ये देखील अशा प्रकारे अनेक लोकांना संधी मिळाली आहे.
मित्रांनो,
आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीचा आणखी एक आयाम देखील आहे. जेव्हा या पायाभूत सुविधा निर्माणाचे काम पूर्ण होते तेव्हा शेतकरी, महाविद्यालये किंवा कार्यालयात जाणारे लोक, ट्रक-टेंपो चालवणारे लोक, व्यापारी अशा सर्वांसाठी विविध प्रकारच्या सोयींमध्ये वाढ होते. त्यांचे आर्थिक व्यवहार देखील वाढतात. उदा. आता दिल्ली-दौसा-लालसोट या दरम्यान हा द्रुतगती महामार्ग तयार झाला आहे. जयपूरहून दिल्लीला पोहोचायला पूर्वी पाच सहा तास लागत असत आता हा वेळ निम्मा झाला आहे. तुम्हीच विचार करा, यातून वेळेची किती मोठी बचत होणार आहे. या संपूर्ण प्रदेशातील जे लोक दिल्लीत नोकरी अथवा व्यापार-उद्योग करतात किंवा इतर कामांसाठी त्यांचे दिल्लीला येणेजाणे असते ते आता अगदी सुलभतेने संध्याकाळी स्वतःच्या घरी पोहोचू शकणार आहेत.
माल घेऊन दिल्लीला येणाऱ्या - जाणाऱ्या ट्रक-टेम्पोवाल्या मित्रांना त्यांचा संपूर्ण दिवस रस्त्यावर घालवावा लागणार नाही.जे छोटे शेतकरी आहेत, जे पशुपालक आहेत, ते आता आपला भाजीपाला आणि दूध दिल्लीला कमी खर्चात सहज पाठवू शकतात. उशीर झाल्यामुळे त्यांचा माल वाटेत खराब होण्याचा धोकाही आता कमी झाला आहे.
बंधु आणि भगिनींनो,
या द्रुतगती मार्गालगत ग्रामीण हाट बांधले जात आहेत. या माध्यमातून स्थानिक शेतकरी, विणकर, हस्तकला कारागीर यांना त्यांची उत्पादने सहज विकता येणार आहेत. राजस्थान सोबतच हरयाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. हरियाणातील मेवात जिल्हा आणि राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात कमाईची नवीन साधने निर्माण होणार आहेत.या आधुनिक कनेक्टिव्हिटीचा फायदा सरिस्का व्याघ्र प्रकल्प, केवलादेव आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जयपूर, अजमेर यांसारख्या अनेक पर्यटन स्थळांनाही होणार आहे. राजस्थान पूर्वीपासूनच देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण राहिले आहे, आता त्याचे आकर्षण आणखी वाढणार आहे.
मित्रांनो ,
याशिवाय आज आणखी तीन प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे . यापैकी एक प्रकल्प जयपूरला या द्रुतगती मार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. त्यामुळे जयपूर ते दिल्ली हा प्रवास केवळ अडीच ते तीन तासांवर येणार आहे. दुसरा प्रकल्प या द्रुतगती मार्गाला अलवरजवळील अंबाला-कोठपुतली मार्गिकेशी जोडेल. त्यामुळे हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधून येणारी वाहने पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने सहज जाऊ शकतील. दुसरा प्रकल्प लालसोट-करोली रस्त्याच्या विकासाचा आहे. हा रस्ता केवळ या क्षेत्राला द्रुतगती मार्गाशीच जोडणार नाही तर या परिसरातील लोकांचे जीवन सुसह्य करेल.
मित्रांनो ,
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका हे राजस्थान आणि देशाच्या प्रगतीचे दोन मजबूत स्तंभ बनणार आहेत.या प्रकल्पांमुळे आगामी काळात राजस्थानसह या संपूर्ण प्रदेशाचे चित्र बदलणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेला बळकटी मिळेल . हे रस्ते आणि मालवाहतूक मार्गिका हरयाणा आणि राजस्थानसह पश्चिम भारतातील अनेक राज्यांना बंदरांशी जोडतील.यासह, लॉजिस्टिक, वाहतूक आणि साठवणुकीशी संबंधित अनेक प्रकारच्या उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होऊ लागतील.
मित्रांनो ,
मला आनंद आहे की ,आज या द्रुतगती मार्गाला पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेमधूनही बळ मिळत आहे. गती शक्ती राष्ट्रीय बृहत योजने अंतर्गत, 5जी नेटवर्कसाठी आवश्यक ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी या द्रुतगती मार्गावर एक मार्गिका ठेवण्यात आली आहे. विजेच्या तारा आणि गॅस पाइपलाइनसाठीही जागा सोडण्यात आली आहे. जी अतिरिक्त जमिन आहे तिचा वापर सौरऊर्जेची निर्मिती आणि गोदामासाठी केला जाईल. या सर्व प्रयत्नांमुळे भविष्यात कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून देशाचा वेळही वाचणार आहे.
मित्रांनो,
सबका साथ, सबका विकास हा राजस्थान आणि देशाच्या विकासाचा आपला मंत्र आहे. या मंत्रानुसार वाटचाल करत आपण सक्षम, समर्थ आणि समृद्ध भारत घडवत आहोत. आता मला इथे जास्त वेळ घेणार नाही, कारण 15 मिनिटांनंतर आता मला जवळच सार्वजनिक कार्यक्रमात बोलायचे आहे, राजस्थानमधील लोक मोठ्या संख्येने तेथे वाट पाहत आहेत, त्यामुळे बाकीचे सगळे मुद्दे मी तिथल्या जनतेसमोर मांडणार आहे. आधुनिक द्रुतगती मार्गासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद.
S.Bedekar/Sanjana/Sonal C/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898816)
Visitor Counter : 142
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam