अर्थ मंत्रालय
भारताने व्यापक प्रमाणातील सुधारणा तसेच सशक्त धोरणे यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपत्तीच्या वेळी देशाला मजबुतता प्राप्त झाली
संकटकाळात सर्वांचे प्रयत्न आणि जन भागीदारी यांची मोठी मदत झाली
जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधा, अभूतपूर्व कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम, एलआयएफई अभियान आणि हायड्रोजन अभियान यांच्यासारख्या योजनांच्या यशामुळे जागतिक क्षितिजावर भारत वेगाने उदयाला येत आहे
Posted On:
01 FEB 2023 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2023
विविध संकटांच्या काळात भारताने दाखवलेल्या मजबुततेची प्रशंसा करत केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याचे श्रेय व्यापक प्रमाणातील सुधारणा तसेच सशक्त धोरणे यांच्यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याला दिले. “सर्वांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून अंमलबजावणी करून निर्माण झालेली जन भागीदारी तसेच गरजवंतांना लक्ष्यीत पद्धतीने दिलेला पाठींबा यांच्यामुळे संकटकाळात देखील आपल्याला उत्तम कामगिरी करण्यात मदत झाली,” त्यांनी स्पष्टीकरण दिले.
जागतिक क्षितिजावर भारताचा उदय:
संसदेत वर्ष 2023-24 चाअर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी भारताचा जागतिक क्षितिजावर उदय होण्यास कारणीभूत ठरलेल्या खालील विविध कामगिऱ्या अधोरेखित केल्या:
- जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदा. आधार, को-विन आणि युपीआय
- अभूतपूर्व प्रमाण आणि वेगाने राबवण्यात आलेली कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम
- हवामान विषयक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांबाबत सक्रीय भूमिका, एलआयएफई अभियान
- राष्ट्रीय हायड्रोजन अभियान
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय)
कोविड-19 महामारीच्या संकटकाळात सरकारने केलेले प्रयत्न ठळकपणे मांडत, केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या की, देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना 28 महिने मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी महामारीच्या काळात सरकारने सुरु केलेल्या या योजनेने देशातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची सुनिश्चिती केली. “अन्न आणि पोषणविषयक सुरक्षेची सुनिश्चिती करण्याची आमची वचनबद्धता यापुढेही सुरु ठेवत, आम्ही 1 जानेवारी 2023 पासून सर्व अंत्योदय आणि प्राधान्यक्रम दिलेल्या कुटुंबांना येत्या एक वर्षासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना राबवत आहोत,” त्या म्हणाल्या. या योजनेसाठी येणारा सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
* * *
U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895457)
Visitor Counter : 196