पंतप्रधान कार्यालय
दिल्लीमध्ये करिअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
28 JAN 2023 9:48PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत राजनाथ सिंह जी, श्री अजय भट्ट जी, सीडीएस अनिल चौहान जी, तिन्ही सेना दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव, डीजी एनसीसी आणि आज विशाल संख्येमध्ये उपस्थित झालेले सर्व अतिथिगण आणि माझे प्रिय युवा सहकारी!
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या या टप्प्यावर एनसीसी देखील आपला 75 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या वर्षांमध्ये ज्या ज्या लोकांनी एनसीसीचे प्रतिनिधित्व केले आहे, जे याचा भाग राहिले आहेत, मी राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांच्या योगदानाची प्रशंसा करतो. आज यावेळी माझ्या समोर जे कॅडेट्स आहेत जे यावेळी एनसीसी मध्ये आहेत ते तर आणखी जास्त विशेष आहेत, स्पेशल आहेत. आज ज्या प्रकारे कार्यक्रमाची रचना झाली आहे, केवळ वेळच बदललेली नाही, स्वरुप देखील बदलले आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि कार्यक्रमाची रचना देखील विविधतेने भरलेली मात्र, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा मूलमंत्र जपणारा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा हा समारंभ कायमचा लक्षात राहील. आणि म्हणूनच मी एनसीसीच्या संपूर्ण टीमचे, त्यांचे सर्व अधिकारी आणि व्यवस्थापक या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही एनसीसी कॅडेट्सच्या रुपात देखील आणि देशाच्या युवा पिढीच्या रुपात देखील एका अमृत पिढीचे नेतृत्व करत आहात. ही अमृत पिढी येणाऱ्या 25 वर्षात देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, भारताला आत्मनिर्भर बनवेल, विकसित बनवेल.
मित्रहो,
देशाच्या विकासा NCC ची कोणती भूमिका आहे, तुम्ही सर्व किती प्रशंसनीय काम करत आहात, हे आम्ही काही वेळापूर्वीच या ठिकाणी पाहिले आहे. तुमच्यापैकी एका सहकाऱ्याने माझ्याकडे एकता ज्योत सोपवली. तुम्ही रोज 50 किलोमीटर धावून 60 दिवसात कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंतचा हा प्रवास पूर्ण केला आहे. एकतेच्या या ज्योतीमुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना सशक्त व्हावी, यासाठी अनेक सहकारी या दौडमध्ये सहभागी झाले. तुम्ही खरोखरच प्रशंसनीय काम केले आहे. प्रेरक काम केले आहे. या ठिकाणी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.
भारताची सांस्कृतिक विविधता, तुमचे कौशल्य आणि चिकाटीमुळे या प्रदर्शनात आणखी आणि यासाठी मी तुमचे जितके अभिनंदन करेन तितके कमी आहे.
मित्रहो,
तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देखील सहभागी झालात. यावेळी हे संचलन यासाठी विशेष होते कारण ते पहिल्यांदाच कर्तव्य पथावर झाले होते. आणि दिल्लीचे वातावरण तर सध्या जरा जास्तच थंड राहात असते. तुमच्यापैकी अनेक सहकाऱ्यांना कदाचित या हवामानाची सवय देखील नसेल. तरीही मी तुम्हाला दिल्लीमधील काही जागांवर फिरायला जाण्याचा आग्रह करेन. वेळ काढाल ना. बघा, जर तुम्ही राष्ट्रीय युद्ध स्मारक, पोलिस स्मारकाला भेट दिली नसेल तर तुम्हाला नक्कीच गेले पाहिजे.
त्याच प्रकारे लाल किल्ल्यात नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालयामध्ये तुम्ही नक्की जा. स्वतंत्र भारताच्या सर्व पंतप्रधानांचा परिचय करून देणारे एक आधुनिक पीएम- संग्रहालय देखील बनले आहे. तिथे तुम्हाला गेल्या 75 वर्षातील देशाच्या विकास यात्रेविषयी माहिती मिळवता येईल. तुम्हाला येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे चांगले संग्रहालय पाहायला मिळेल. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय चांगले संग्रहालय पाहायला मिळेल. खूप काही आहे. असे होऊ शकते की या सर्व स्थानांकडून तुम्हाला कोणती ना कोणती प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. ज्यामुळे तुमचे जीवन एका निर्धारित लक्ष्य घेऊन काही तरी करण्याच्या इच्छेने पुढे निघेल, पुढे पुढे जातच राहील.
माझे युवा मित्रहो.
कोणताही देश चालवण्यासाठी जी ऊर्जा सर्वात महत्त्वाची असते ती ऊर्जा आहे युवा. तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यावर आहात तिथे एक जोश असतो, एक वेड असते. तुमची अनेक स्वप्ने असतात आणि ज्यावेळी स्वप्ने संकल्प बनतात आणि संकल्पांसाठी जीवन समर्पित होते तेव्हा जीवन देखील सफल होते. आणि भारताच्या युवा वर्गासाठी हा काळ नव्या संधींचा काळ आहे. आता सर्वत्र एकच चर्चा आहे की भारताची वेळ आता आली आहे, India’s time has arrived. संपूर्ण जग भारताकडे पाहात आहे आणि यामागील सर्वात मोठे कारण तुम्ही आहात. भारताचे युवा आहेत. भारताचा युवा वर्ग किती जागरुक आहे याचे एक उदाहरण मी आज तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तुम्हाला हे माहीत आहेच की यावर्षी भारत जगातील 20 सर्वाधिक ताकदवान अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या जी20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. ज्यावेळी देशभरातील अनेक युवक-युवतींनी यासंदर्भात मला पत्रं लिहिली त्यावेळी मी चकित झालो. देशाची कामगिरी आणि प्राधान्यक्रम यामध्ये तुमच्या सारखे युवा ज्या प्रकारे रुची दाखवत आहेत ते पाहून खरोखरच अभिमान वाटतो.
मित्रहो.
ज्या देशातील युवा इतका उत्साह आणि जोश यांनी भरलेले असतील त्या देशाची प्राथमिकता नेहमीच युवा वर्गच असेल. आजचा भारत देखील आपल्या सर्व युवा सहकाऱ्यांना तो मंच देण्याचा प्रयत्न करत आहे जो तुमची स्वप्ने साकार करण्यात मदत करू शकेल. आज भारतात युवा वर्गासाठी नवनवी क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. भारताची डिजिटल क्रांती असो, भारताची स्टार्ट अप क्रांती असो, नवोन्मेष क्रांती असो या सर्वांचा सर्वाधिक लाभ तर युवा वर्गालाच होत आहे. आज भारत ज्या प्रकारे आपल्या संरक्षण क्षेत्रात सातत्याने सुधारणा करत आहे, त्याचा लाभ देखील देशाच्या युवा वर्गाला होत आहे. एक काळ होता जेव्हा आपण असॉल्ट रायफल आणि बुलेटप्रुफ जॅकेट देखील परदेशातून मागवत होतो. आज सैन्याच्या गरजेच्या अशा शेकडो वस्तू आहेत ज्या आपण भारतात बनवत आहोत. आज आपण आपल्या सीमावर्ती पायाभूत सुविधांवर वेगाने काम करत आहोत. ही सर्व अभियाने भारताच्या युवा वर्गासाठी नव्या शक्यता घेऊन आली आहेत, संधी घेऊन आली आहेत.
मित्रहो,
जेव्हा आपण युवा वर्गावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याचे काय परिणाम होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले अंतराळ क्षेत्र होय. देशाने युवा वर्गाच्या प्रतिभेसाठी अंतराळ क्षेत्राची द्वारे खुली केली आहेत. आणि बघता बघता पहिला खाजगी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
त्याचप्रमाणे अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रही प्रतिभावान युवा वर्गासाठी मोठ्या संधी उपलब्ध घेऊन आले आहे. तुम्ही एकतर स्वतः ड्रोन वापरला असेल किंवा दुसऱ्याला त्याचा वापर करताना पाहिले असेल. आता तर ड्रोनची ही व्याप्तीसुद्धा सातत्याने वाढते आहे. मनोरंजन असो, लॉजिस्टिक असो, शेती असो, प्रत्येक क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते आहे. आज देशातील युवा वर्ग सर्व प्रकारचे ड्रोन भारतात तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
मित्रहो,
तुमच्यापैकी बहुतेक युवक-युवतींना आपल्या सैन्यात, आपल्या सुरक्षा बलांमध्ये, आपल्या संस्थांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, याची जाणीव मला आहे. तुमच्यासाठी, विशेषत: आपल्या मुलींसाठी ही नक्कीच मोठी संधी आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये पोलीस आणि निमलष्करी दलातील मुलींच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. आज तुम्ही बघा, सैन्याच्या तिन्ही शाखांमध्ये आघाडीवर महिलांना तैनात करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आज महिला पहिल्यांदाच अग्निवीर म्हणून, खलाशी म्हणून भारतीय नौदलात सहभागी झाल्या आहेत.
सशस्त्र दलातही महिलांनी लढाऊ भूमिकेत प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. एनडीए पुणे येथे महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. आपल्या सरकारनेही मुलींना लष्करी शाळांमध्ये प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. आज सुमारे 1500 विद्यार्थिनी सैनिक शाळांमध्ये शिकू लागल्या आहेत, याचा मला मनापासून आनंद वाटतो आहे. अगदी एनसीसीमध्येही आपण बदल बघतो आहोत. मागच्या दशकभरात एनसीसीमध्ये मुलींचा सहभागही सातत्याने वाढतो आहे. मी पाहत होतो की इथे जे संचलन झाले, त्याचे नेतृत्वही एका मुलीने केले होते. सीमा आणि किनारी भागात एनसीसीचा विस्तार करण्याच्या मोहिमेत मोठ्या संख्येने युवा वर्ग सहभागी होतो आहे. आतापर्यंत सीमा आणि किनारी भागातून सुमारे एक लाख कॅडेट्सची नोंदणी झाली आहे. जेव्हा युवाशक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्र उभारणीत हातभार लावेल, देशाच्या विकासासाठी कार्यरत होईल, तेव्हा
मित्रहो,
मी मोठ्या विश्वासाने सांगतो की कोणतेही ध्येय अशक्य राहणार नाही. एक संघटना म्हणून तसेच वैयक्तिकरित्या तुम्ही सर्वजण देशाचे संकल्प साध्य करण्यात तुमची भूमिका विस्तारत न्याल, असा विश्वास मला वाटतो. भारत मातेच्या स्वातंत्र्य युद्धात अनेकांनी देशासाठी मरण पत्करण्याचा मार्ग निवडला होता. पण स्वतंत्र भारतात प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याचा मार्गत देशाला जगात नव्या उंचीवर घेऊन जातो. आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी 'एक भारत श्रेष्ठ भारत'च्या आदर्शांवरून देशाचे विभाजन करण्यासाठी अनेक सबबी शोधल्या जातात. वेगवेगळ्या गोष्टी उकरून काढून भारत मातेच्या मुलांमध्ये, दुधामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लाख प्रयत्न करा, आईच्या दुधाला कधीच तडा जाऊ शकणार नाही. आणि यासाठी एकतेचा मंत्र हे एक मोठे औषध आहे, खूप मोठे सामर्थ्य आहे. भारताच्या भविष्यासाठी एकतेचा मंत्र हा संकल्प सुद्धा आहे, भारताचे सामर्थ्यही आहे आणि भारताला वैभव प्राप्त करून देण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आपल्याला त्या मार्गाचा अंगिकार करायचा आहे, त्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांशी दोन हात करायचे आहेत. आणि देशासाठी जगून समृद्ध भारत आपल्या डोळ्यांसमोर पाहायचा आहे. या डोळ्यांनी भव्य भारत पाहणे यापेक्षा छोटा संकल्प असूच शकत नाही. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी तुम्हा सर्वांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. 75 वर्षांचा हा प्रवास, येणारी 25 वर्षे, जो भारताचा अमृत काळ आहे, जो तुमचाही अमृत काळ आहे. 2047 साली जेव्हा देश स्वातंत्र्य प्राप्तीची 100 वर्षे साजरी करेल, जेव्हा तो विकसित देश असेल, तेव्हा तुम्ही त्या उंचीवर बसलेले असाल.
कल्पना करा मित्रहो,25 वर्षांनंतर तुम्ही किती उंचीवर असाल. आणि म्हणूनच एकही क्षण गमावायचा नाही, एकही संधी गमावायची नाही. भारत मातेला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करून चालत राहायचे आहे, पुढे जात राहायचे आहे, नवनवीन सिद्धी प्राप्त करायच्या आहेत, विजयश्रीचा संकल्प घेऊन चालायचे आहे. याच माझ्या तुम्हां सर्वांना शुभेच्छा आहेत. पूर्ण शक्तीनीशी माझ्यासोबत बोला - भारत माता की जय, भारत माता की जय! भारत माता की जय।
वंदे-मातरम, वंदे-मातरम!
वंदे-मातरम, वंदे-मातरम!
वंदे-मातरम, वंदे-मातरम!
वंदे-मातरम, वंदे-मातरम!
अनेकानेक आभार!
***
M.Jaybhaye/S.Patil/M.Pange/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894459)
Visitor Counter : 232
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam