आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. मनसुख मांडविया यांनी आपत्कालीन वैद्यकीय पथकांसाठी राष्ट्रीय आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेला केले संबोधित


वैविध्यपूर्ण भूभाग आणि भौगोलिक स्थिती असलेला विशाल देश असल्याने, आपत्ती/आपत्कालीन प्रतिसादासाठी भारताचे स्वतःचे प्रारुप असू शकते, इतर देश त्याचे अनुकरण करू शकतात: डॉ मनसुख मांडविया

जागतिक सर्वोत्तम पद्धतीतून शिकत, मानक कार्यप्रणालीच्या पार आपले प्रारुप जाऊ शकते, जेणेकरून परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्यक्षात ते अधिक लवचिक आणि गतीशील असू शकेल

Posted On: 24 JAN 2023 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

 

"वैविध्यपूर्ण भूभाग आणि भौगोलिक स्थिती असलेला विशाल देश असल्याने, आपत्ती/आपत्कालीन प्रतिसादासाठी भारताचे स्वतःचे प्रारुप असू शकते, इतर देश त्याचे अनुकरण करू शकतात," असे  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. ते आज येथे राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय पथकांसाठी  राष्ट्रीय आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेला संबोधित करत होते.

'जागतिक सर्वोत्तम पद्धतींपासून शिकणे आणि मानक कार्यप्रणालीचे (एसओपी)  पालन करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर गेल्या काही दशकांतील आपत्कालीन आणि आपत्ती प्रतिसादाच्या राष्ट्रीय उदाहरणांमधून आपण शिकून, त्यातून बोध घेत आपले प्रारुप समृद्ध करूया असे डॉ. मांडविया म्हणाले. या आपत्कालीन प्रतिसाद आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी प्रारुपात बहु-क्षेत्रीय आणि बहुस्तरीय शिक्षण समाविष्ट करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

"भारताचे प्रारुप निर्धारित मानक कार्यप्रणालीच्या पलीकडे जाऊ शकते आणि प्रत्यक्षातील अत्यावश्यक बाबींना  प्रतिसाद देण्यासाठी अधिक लवचिक आणि गतीशील असू शकते" असे त्यांनी सांगितले. एनईएमटी उपक्रमातील सर्व भागधारकांना एकत्र आणून उपक्रमाचे धोरण, रणनीती, भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी विचारमंथन करणे आणि आपत्तीच्या काळात आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी देशाच्या गरजा एकत्रित करण्यासाठी एक रोडमॅप तयार करणे हा या दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश आहे. 

आरोग्य विषयक आणीबाणीबाबत खबरदारी, तयारी आणि प्रतिसाद हे जी20 आरोग्य क्षेत्रातील अजेंडा अंतर्गत प्राधान्यक्रमापैकी एक आहेत.  केरळच्या  तिरुवनंतपुरम (18-20 जाने 2023) येथे जी20 आरोग्य कार्यगटाची बैठक झाली, त्यानंतर ही पहिलीच बैठक आहे.

एनडीएमए, एनडीआरएफ, राज्याच्या विविध संस्था, आपत्कालीन सेवा प्रदाते, ट्रॉमा सेंटर इत्यादींसह अस्तित्वात असलेल्या अनेक घटकांच्या सहकार्याच्या महत्त्वावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी भर दिला. सध्या हे घटक मोठ्या प्रमाणावर खंडित अवस्थेत काम करत असल्याने, गतिशील, जलद आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करण्याच्या महत्त्वपूर्ण गरजेवर त्यांनी प्रकाश टाकला. 

आपत्ती आणि सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला प्रतिसाद देण्यासाठी आरोग्यसेवा मनुष्यबळा बाबतच्या पारंपारिक प्रतिसाद पद्धतीत सुधारणा करणे हा राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय पथक (एनइएमटी) उपक्रमाचा उद्देश आहे. आरोग्यसेवा व्यावसायिकांचा एक गट अशी ईएमटीची व्याख्या केली जाते. स्थानिक आरोग्य सेवा प्रणालीला पाठबळ देत, उद्रेक आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या लोकसंख्येला थेट वैद्यकीय मदत ते प्रदान करतात. कोणत्याही आपत्कालीन/आपत्तीच्या काळात, कोणत्याही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी साठीची तयारी आणि प्रभाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत क्षमता मुख्यत्वे सारखीच असते.  तैनात केलेल्या पथकांनी प्रभावी काम करण्यासाठी, औपचारिकपणे प्रशिक्षित आणि केवळ वैद्यकीय कौशल्यांच्या बाबतीतच नव्हे तर इतर भागधारकांसोबत प्रत्यक्ष जागेवरील समन्वयाच्या बाबतीतही सुसज्ज करणे आवश्यक आहे.  जागतिक स्तरावर असे दिसून आले आहे की अशा ईमटींना प्रशिक्षित, प्रमाणित आणि गुणवत्तेबाबत चोख असणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपत्ती प्रतिसादासाठी त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी पाठबळ मिळेल.

दोन दिवसांच्या कार्यशाळेत आपत्कालीन वैद्यकीय पथकांशी संबंधित चार महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा केली जाईल, ज्यात (i) प्रणाली (ii) कर्मचारी (iii) पुरवठा आणि (iv) संरचना यांचा समावेश आहे.

लव अग्रवाल, सहाय्यक सचिव , आरोग्य मंत्रालय;  हितेश कुमार एस. मकवाना, सहाय्यक सचिव, गृह मंत्रालय, कुणाल सत्यार्थी, जेएस, एनडीएमए, डॉ अतुल गोयल, आरोग्य सेवा महासंचालक;  डॉ अंजना राजकुमार, संचालक, सीजीएचएस;  आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरचे प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव, एम्स नवी दिल्ली, एम्स गुवाहाटी, एम्स पटना, एम्स जोधपूर, एम्स गोरखपूर, एम्स नागपूर, एम्स कल्याणी, एम्स भोपाळ, एम्स भुवनेश्वर आणि एम्स उत्तराखंडचे संचालक, भारतीय सशस्त्र दलाचे सदस्य, प्रतिनिधी आणि संचालक आणि राष्ट्रीय संस्था, आसीएमआर, जेएमईआरआयपी, एनआयएमएचएएनएस,पीजीआयएमईआर यांसारख्या सार्वजनिक संस्थांचे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.  भारतातील डब्लूएचओ प्रतिनिधी डॉ रॉडरिक ऑफरिन हे देखील यावेळी उपस्थित होते.

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893315) Visitor Counter : 167