भारतीय निवडणूक आयोग
13 वा राष्ट्रीय मतदार दिन उद्या, 25 जानेवारी 2023 रोजी साजरा होणार
Posted On:
24 JAN 2023 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
भारतीय निवडणूक आयोगातर्फे उद्या 25 जानेवारी 2023 रोजी 13 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली येथे उद्या आयोजित केलेल्या राष्ट्रीय समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू उपस्थित राहणार आहेत.
‘मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान करणार’ही या वर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना मतदारांना समर्पित असून त्यातून मतदानामुळे मिळालेल्या सामर्थ्याच्या माध्यमातून, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याविषयी प्रत्येकाची भावना आणि आकांक्षा प्रतीत होते. निवडणूक प्रक्रियेचा उत्सव तसेच समावेशकता दर्शविण्याच्या उद्देशाने या दिनासाठी बोधचिन्ह तयार केले आहे. त्यामध्ये पार्श्वभूमीवरील अशोक चक्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाही यंत्रणेचे प्रतिनिधित्व करत असून शाई लावलेल्या बोटाची प्रतिमा देशातील प्रत्येक मतदाराचा सहभाग दर्शविते. बोधचिन्हातील ‘बरोबर’ची खूण मतदारांच्या माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची निदर्शक आहे.
नवी दिल्ली येथे उद्या होणार असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2022 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण केले जाईल. तसेच यावेळी वर्ष 2022 पूर्वीच्या निवडणुकीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य आणि जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना उत्तम पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दलचे राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात येतील.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893302)
Visitor Counter : 1472