पंतप्रधान कार्यालय

व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत नेते सत्र समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक भाषण

Posted On: 13 JAN 2023 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जानेवारी 2023

 

महामहीम,

नमस्कार !

व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत मी तुमचे स्वागत करतो.

गेल्या 2-दिवसांमध्ये  या शिखर परिषदेत 120 हून अधिक विकसनशील देश सहभागी झाले , हे ग्लोबल साउथचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आभासी संमेलन होते

या समारोपाच्या सत्रात तुमचा विशेष सहभाग  लाभला.

महामहिम,

विशेषत: आपल्यासारख्या  विकसनशील राष्ट्रांसाठी गेली 3 वर्षे कठीण गेली .

कोविड महामारीची आव्हाने, इंधन, खते आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे आपल्या  विकास प्रयत्नांवर परिणाम झाला आहे.

मात्र, नवीन वर्षाची सुरुवात ही नवीन आशेची वेळ आहे. म्हणून मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आनंदी, निरोगी, शांततामय , सुरक्षित आणि यशस्वी 2023 वर्षासाठी शुभेच्छा देतो.

महामहिम,

आपण सर्वजण जागतिकीकरणाच्या तत्त्वाचे महत्व जाणतो.  भारताच्या तत्त्वज्ञानाने जगाकडे नेहमीच एक कुटुंब म्हणून पाहिले आहे.

मात्र , विकसनशील देशांना असे  जागतिकीकरण हवे  आहे ज्यामुळे हवामान संकट किंवा कर्ज संकट उद्भवणार  नाही.

आपल्याला असे जागतिकीकरण हवे आहे ज्यामुळे लसींचे असमान वितरण होणार नाही किंवा जागतिक पुरवठा साखळी अतिकेंद्रित होणार नाही.

संपूर्ण मानवतेसाठी  समृद्धी आणि कल्याण घेऊन येणारे  जागतिकीकरण आपल्याला  हवे आहे. थोडक्यात, आपल्याला ‘मानवकेंद्रित जागतिकीकरण’ हवे आहे.

महामहिम,

आपण  विकसनशील देश देखील  विखंडीत आंतरराष्ट्रीय परिदृश्याबद्दल चिंतित आहोत.

हे भू-राजकीय तणाव  आपल्या विकासाच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यापासून  आपल्याला विचलित करतात

ते अन्न, इंधन, खते आणि इतर वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये तीव्र चढ-उतार  घडवून आणतात.

या भू-राजकीय विखंडनावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ब्रेटन वुड्स संस्थांसह प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तातडीने मूलभूत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

या सुधारणांनी विकसनशील जगाच्या चिंतेला आवाज देण्यावर लक्ष केंद्रित करायला  पाहिजे आणि 21 व्या शतकातील वास्तव प्रतिबिंबित केले पाहिजे.

भारताचे G20 अध्यक्षपद  या महत्त्वाच्या मुद्द्यांवर  ग्लोबल साउथची मते  मांडण्याचा प्रयत्न करेल

महोदय,

विकासात्मक भागीदारीमध्ये भारताचा दृष्टीकोन उपदेशात्मक, परिणामाभिमुख , मागणीनुसार असणारा, लोककेंद्री आणि भागीदार देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणारा असा आहे.  

जगातील ग्लोबल साउथ देशांना एकमेकांच्या विकासविषयक अनुभवांतून शिकण्यासारखे खूप काही आहे यावर माझा दृढ विश्वास आहे.

भारत “ग्लोबल साउथ देशांचे उत्कृष्टता केंद्र” स्थापन करणार आहे अशी घोषणा करताना मला फार आनंद होतो आहे.
ही संस्था आपल्यापैकी कोणत्याही देशातील विकासात्मक उपाययोजना किंवा सर्वोत्तम पद्धतींबाबत संशोधन करेल, ज्याचा वापर करून ग्लोबल साउथ इतर सदस्य देशांना आपापल्या देशात ते राबवता येतील.

उदाहरण म्हणून आपण भारतात लोक हितासाठी इलेक्ट्रॉनिक भरणा, आरोग्य,शिक्षण किंवा ई-गव्हर्नंस इत्यादी क्षेत्रांत विकसित करण्यात आलेल्या डिजिटल सुधारणांचा विचार करू. या सुधारणा इतर अनेक विकसनशील देशांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

भारताने अवकाश तंत्रज्ञान आणि अणु उर्जा या विषयांत देखील मोठी झेप घेतली आहे. इतर विकसनशील देशांशी आपले अनुभव सामायिक करण्यासाठी  आपण ‘ग्लोबल साउथ देशांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम’ सुरु करु.
कोविड महामारीच्या काळात भारताच्या ‘व्हॅक्सीन मैत्री’उपक्रमाद्वारे जगातील 100 हून अधिक देशांना भारतात निर्मित लसीचा पुरवठा करण्यात आला.

मला आता ‘आरोग्य मैत्री’ या नव्या प्रकल्पाची घोषणा करायची आहे. या प्रकल्पाअंतर्गत, नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटाने प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारतातर्फे अत्यावश्यक औषधांचा पुरवठा केला जाईल.

महोदय,

आपल्या राजनैतिक मुद्द्यांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने आपल्या परराष्ट्र मंत्रालयांच्या तरुण अधिकाऱ्यांना परस्परांशी जोडून घेण्यासाठी, मी ‘ग्लोबल साउथ  युवा मुत्सद्यांचा मंच’ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करतो.

उच्च शिक्षण घेण्यासाठी विकसनशील देशांतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत ‘ग्लोबल साउथ  शिष्यवृत्ती’ देखील सुरु करणार आहे.

माननीय सदस्यांनो,

आजच्या सत्राची मध्यवर्ती कल्पना भारताच्या प्राचीन विद्वत्तेपासून प्रेरित आहे.

मनुष्याला माहिती असलेल्या सर्वात प्राचीन लिखाणातून म्हणजेच ऋग्वेदामधून घेतलेली एक ऋचा सांगते:

संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्

याचा अर्थ आहे: चला, आपण सर्वजण एकत्र येऊया, एका सुरात बोलूया आणि आपली मने एकमेकांशी सुसंवादी असू द्या.

किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे तर, ‘आवाजातील एकता, उद्देशातील एकता.’

याच भावनेतून, मी तुमचे विचार आणि सूचना जाणून घेण्यास उत्सुक आहे.

धन्यवाद!
 

* * *

N.Chitale/Sushma/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1891145) Visitor Counter : 235