युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला, कर्नाटकात हुबळी इथे यंदाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार: अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
10 JAN 2023 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, यंदाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे येत्या 12 जानेवारीला कर्नाटकच्या हुबळी इथे उद्घाटन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात 12 जानेवारी हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव, 12 ते 16 जानेवारी, 2023 दरम्यान, हुबळी-धारवाड, कर्नाटक इथे होणार असून केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालय तसेच कर्नाटक सरकारतर्फे संयुक्त रित्या हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
आज आपला देश, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्याचे औचित्य साधून अमृत काळात युवकांची देशबांधणीतील भूमिका अधिक व्यापक करण्याचा या महोत्सवाचा उद्देश असेल, असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी दिलेले पंच-प्रण म्हणजे संकल्प पूर्ण करण्याचा संदेश देशाच्या युवा वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून केला जाईल, असेही ते म्हणाले. सध्या भारताकडे जी-20 चे अध्यक्षपद असून प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यानिमित्त, देशभरात जी-20 चा भाग म्हणून होत असलेल्या वाय-20 च्या निमित्ताने ‘वाय टॉक्स’, ही चर्चासत्रे आयोजित करत आहे. या वाय-20 अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या, कार्यक्रमांना राष्ट्रीय युवा महोत्सवामुळे गती मिळेल, वाय-20 च्या संकल्पनांविषयी युवकांना माहिती मिळेल. आणि हे युवक वाय-20 ची संकल्पना आणि संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातील, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
हा युवा महोत्सव हा केवळ जैवविघटनशील साहित्य वापरून हरित महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. पंतप्रधानांचे मिशन लाईफ आणि हरित ऊर्जा यावरही या महोत्सवात लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
युवा व्यवहार विभागाच्या सचिव श्रीमती मीता लोचन यांनी या महोत्सवाविषयी माहिती देताना सांगितले की, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, कर्नाटक सरकारच्या सहकार्याने 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन हुबळी-धारवाड, कर्नाटक येथे करत आहे. 30,000 हून अधिक युवक उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यावेळी पंतप्रधान युवकांसमोर त्यांची भूमिका मांडतील. या पाच दिवसीय कार्यक्रमादरम्यान, संपूर्ण भारतातील 7500 हून अधिक युवा प्रतिनिधी, मान्यताप्राप्त संस्था आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर, नेते या महोत्सवात ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी एकत्र येतात. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना, ‘विकसित युवा, विकसित भारत’ अशी आहे.
या महोत्सवात विविध उपक्रमांचा समावेश आहे. उदाहरणार्थ (1) विद्यार्थी केंद्रित प्रशासन आणि डिजिटल इंडिया यांसारख्या संबंधित विषयांवर चर्चा. विद्यार्थी-केंद्रित प्रशासन कसे सुलभ करावे याबद्दल प्रादेशिक नेते आणि इतर तज्ञ, निवडून आलेल्या प्रतिनिधींशी थेट चर्चा करतील. (2) स्कुबा डायव्हिंगसारख्या साहसी खेळांचा समावेश आहे. (3) कलारीपायटटू (केरळ), सिलंबम (तामिळनाडू), गटका (पंजाब), मल्लखांब (महाराष्ट्र) या पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले जात आहे. (4) लोकनृत्य आणि लोकगीत यांसारखे स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील मंडळी सहभागी होत आहेत. स्पर्धात्मक नसलेल्या मनोरंजक कार्यक्रमांमध्ये सामाजिक विकास मेळा ‘युवा कृती’ समाविष्ट आहे. ‘साहसी महोत्सव’, ‘सुविचार’, ‘युवा कलाकार कॅम्प’ यासह इतर कार्यक्रमांचाही समावेश आहे.
युवा परिषदेत खालील विषयांवर दोन्ही बाजूने चर्चा केली जाईल: i) काम, उद्योग, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये याचे भविष्य, ii) हवामान बदल आणि आपत्तीची जोखीम कमी करणे, iii) शांतता प्रस्थापित करणे आणि सामंजस्य, iv) लोकशाही आणि शासनामध्ये भविष्यातील तरुणांना सामायिक करणे, v) आरोग्य आणि कल्याण
महोत्सवातील अनेक कार्यक्रम देशभरात थेट प्रक्षेपित केले जातील जेणेकरुन कोट्यवधी तरुणांनाही संपूर्ण महोत्सवात सहभागी करून घेता येईल.
यंदाचा महोत्सव, हरित युवा महोत्सवाच्या रुपात साजरा केला जात आहे. यात फक्त पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तू, नॅपकिन्स इत्यादींचा वापर केला जात आहे. सर्व स्मृतिचिन्ह, पदके, कागदपत्रे पुन्हा वापरता येण्याजोग्या सामग्रीची आहेत. टाकाऊ वस्तूंचा वापर कमी करण्यासाठी वॉटर रिफिलिंग स्टेशन्स अर्थात पाणी भरून घेता येईल अशा केंद्रांची स्थापना केली आहे.
कर्नाटकातील 31 जिल्ह्यांमधून 5 लाख लोकांना एकत्र करून 15 जानेवारी रोजी, सकाळी 6 ते 8 दरम्यान योगाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरात महोत्सव काळात तरुणांच्या सहभागासह मोठ्या प्रमाणात उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
* * *
S.Patil/R.Aghor/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890108)
Visitor Counter : 230