माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2023 वर्षासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे केले अनावरण
‘नया वर्ष, नये संकल्प’ अशी संकल्पना असलेली दिनदर्शिका सरकारची कामगिरी आणि भविष्यातील वचनबद्धता यांचे दर्शन घडवेल
दिनदर्शिकेच्या 11 लाख प्रती छापल्या जाणार असून प्रादेशिक भाषांमध्ये 2.5 लाख प्रती छापल्या जाणार
13 भाषांमध्ये छापलेली ही दिनदर्शिका देशभरातील सर्व सरकारी कार्यालये आणि पंचायतींना वितरित केली जाईल
Posted On:
28 DEC 2022 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2022
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज 2023 या वर्षासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचे अनावरण केले . यावेळी बोलताना ते म्हणाले की, ही दिनदर्शिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासचे प्रतिबिंब आहे. वेगाने वाढणाऱ्या भारताचे चित्रण करणाऱ्या 12 प्रतिमांचा ही दिनदर्शिका एक प्रभावी संग्रह असल्याचे सांगून त्यांनी त्याची प्रशंसा केली. 12 महिन्यांच्या 12 संकल्पना जनतेच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या कठोर प्रयत्नांची एक झलक आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
दोन वर्षांपूर्वी केवळ डिजिटल स्वरूपात उपलब्ध असलेली दिनदर्शिका आता प्रत्यक्ष प्रत स्वरूपात छापली जात आहे असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सर्वोत्कृष्ट निर्मितींपैकी ही एक असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले की, या वर्षी डिजिटल आणि छापील अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असलेली ही दिनदर्शिका सरकारचे उपक्रम आणि कल्याणकारी योजनांची माहिती प्रसारित करणारे माध्यम असेल. देशातील सर्व पंचायतींना दिनदर्शिका वितरित करून हा संदेश तळागाळापर्यंत नेणे हे उद्दिष्ट आहे.
मंत्रालयाने विविध अंगांनी केलेल्या कामगिरीचाही ठाकूर यांनी पुनरुच्चार केला.प्रसार भारतीने टप्प्याटप्प्याने त्यांचे सर्व अॅनालॉग टेरेस्ट्रियल ट्रान्समीटर बंद केले आहेत आणि मोक्याच्या ठिकाणी 50 ट्रान्समीटर अपेक्षित आहेत.2022 च्या सुरुवातीपर्यंत डीडी फ्री डिश 43 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचले आहे, तर प्रसार भारती अंतर्गत असलेल्या विविध वाहिन्यांनी एकत्रितपणे 2 कोटींहून अधिक ग्राहकांची संख्या गाठली आहे, असे त्यांनी सांगितले. या वर्षी देशात 75 सामुदायिक रेडिओ केंद्रांची भर पडली असून देशातील एकूण रेडिओ केंद्रांची संख्या 397 वर गेली आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय संचार ब्युरोची स्वयंचलनाची प्रक्रिया पूर्ण झाली असताना, भारतातील वृत्तपत्रांच्या निबंधकांसाठीही हीच प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयाने गेल्या 5 वर्षांत पत्रकार कल्याण योजनेंतर्गत 290 पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांना 13.12 कोटी रुपयांचे वितरण केले आहे, अशी माहिती त्याने उपस्थितांना दिली.
‘नवे वर्ष, नवे संकल्प’ या दिनदर्शिकेची संकल्पना ही ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन, पुढाकार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले भारत सरकारचे विविध कार्यक्रम आणि धोरणे दर्शवते. ही दिनदर्शिका संपूर्ण भारतातील केंद्र सरकारच्या कार्यालयांना वितरित केली जाईल, अशी माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे महासंचालक मनीष देसाई यांनी दिली. यासोबतच, क्षमता बांधणी आयोगाच्या (सीबीसी ) मास मेलिंग कक्षाने भारतातील 2.5 लाख पंचायतींना प्रादेशिक भाषांमध्ये दिनदर्शिका वितरित करण्यासाठी इंडिया पोस्ट सहाय्य करणार आहे ,असे देसाई यांनी सांगितले.
दिनदर्शिकेबद्दल
दिनदर्शिका 2023 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन , पुढाकार आणि नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास घडवून आणण्याची भारत सरकारचे संकल्प दर्शवते. ज्यांनी सशक्त भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती निवडक शासन तत्त्वे आणि धोरणे प्रत्येक महिना अधोरेखित करतो.
जानेवारी
भारताने अमृत काळामध्ये प्रवेश करताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 22 मध्ये राजपथाचे कर्तव्य पथ म्हणून पुनर्नामकरण केले. ही कृती वसाहतवादी मानसिकतेच्या बेड्या तोडून आपल्या राष्ट्राप्रती कर्तव्याच्या मार्गावर वाटचाल करण्याचे प्रतीक आहे.
फेब्रुवारी
फेब्रुवारी महिना "किसान कल्याण" किंवा शेतकरी कल्याण कार्यक्रमांना समर्पित आहे.शेतकरी हा आपल्या देशाचा अभिमान आहे आणि सरकारने समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने अनेक धोरणे अंमलात आणली आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्यरित्या सांगितले आहे.
मार्च
मार्च हा भारतीय महिलांचा गौरव करण्याचा - नारीशक्तीचा सन्मान करणारा महिना आहे. प्रत्येक घरातील महिलांचे आभार मानत आम्ही 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार आहोत. ज्या महिलांनी सुरक्षित घर असतानाही आपल्या कार्यासाठी घराबाहेर पडून स्वत:चा ठसा उमटवला आहे आणि इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे, अशा सर्व महिलांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याचा हा महिना आहे. भारत सरकार दरवर्षी ‘नारी शक्ती पुरस्कार’ देऊन यशस्वी महिलांना सन्मानित करते.
एप्रिल
शैक्षणिक सुधारणांवर भर देणे, सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक आहे. हे ध्येय पंतप्रधानांच्या "पढे भारत, बढे भारत" या घोषणेचे सार आहे. त्यामुळे एप्रिलची संकल्पना 'शिक्षित भारत' अशी आहे. भारतीय शिक्षणप्रणालीमध्ये दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आता कायाकल्प केला जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणासारख्या सुधारणांमुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणात तळाच्या स्तरावर बदल सुरू झाले आहेत.
मे
मे हा ‘कुशल भारत’ कार्यक्रमासाठी समर्पित महिना आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनअंतर्गत भारतातील 30 कोटी जणांना सुव्यवस्थित संस्थात्मक दृष्टिकोनातून व्यापक- विस्तृत कौशल्यांसह प्रशिक्षित करण्याचा मानस आहे. कौशल्यामुळे देशातील कोणताही तरुण त्याच्यामध्ये असलेल्या खऱ्या क्षमता सिद्ध करण्यामध्ये कमी पडणार नाही, हे सुनिश्चित होईल.
जून
21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व वयोगटातील लोकांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली. ‘’फिट इंडिया, हिट इंडिया,’’ अशी या महिन्याची संकल्पना भारतातील प्रत्येक घरात फिटनेसचा मंत्र घेऊन जाईल.
जुलै
पर्यावरणाचे आरोग्य या संदर्भाशिवाय आरोग्यावरील कोणतीही चर्चा पूर्ण होत नाही. हवामानाला अनुकूल असे आरोग्यदायी पर्याय निवडण्यात भारत आघाडीवर आहे. मिशन ‘एलआयएफई’ – लाईफनुसार 'रिड्यूस, रियूज आणि रिसायकल' या जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी कार्यक्रम विकसित करण्यात आले आहेत.
ऑगस्ट
केवळ ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल खेळांमध्येच नाही तर दिव्यांग लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय खेळांमध्येही भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली, याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. ‘खेलो इंडिया’ ही ऑगस्टची संकल्पना आहे. तळागाळातील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यापासून ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंत, ‘खेलो इंडिया’ च्या माध्यमातून सर्व क्रीडा प्रकारांमध्ये भारताला जेते बनवून त्या उंचीवरील व्यासपीठापर्यंत खेळाडूंना नेण्यासाठी वचनबद्ध आहे.
सप्टेंबर
वसुधैव कुटुंबकम म्हणजेच “संपूर्ण विश्व म्हणजे एक कुटुंब आहे” ही सप्टेंबर महिन्याची संकल्पना आहे. “एक पृथ्वी,एक कुटुंब,एक भविष्य” या संकल्पनेवर आधारित भारताचे जी-20 समूहाचे अध्यक्षपद याच प्राचीन भारतीय भावनेला वैश्विक पातळीवर नेत आहे. ही संकल्पना सांगते की, रुची आणि चिंता सर्व लोकांवर समान परिणाम करतात आणि आपण सर्वांनी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी एकमेकांना सहयोग द्यायला हवा.
ऑक्टोबर
अवकाशातील ताऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना आपण आपल्या देशाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर देखील बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकारने सर्व भारतीयांना अन्न मिळण्याचा हक्क बहाल केला आहे. म्हणूनच, अन्न सुरक्षा ही ऑक्टोबर महिन्याची संकल्पना आहे.
नोव्हेंबर
भारताला आत्मनिर्भर करण्याच्या आपल्या पंतप्रधानांच्या ध्यासापासून प्रेरणा घेत नोव्हेंबर महिन्यासाठी स्वावलंबी भारत अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. आणि 2 सप्टेंबर 2022 रोजी आयएनएस विक्रांत ही नौका देशाच्या सेवेत दाखल झाल्यामुळे हे स्वप्न उत्तम पद्धतीने सत्यात उतरले आहे. या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी भारतात, कोचीन गोदीमध्ये करण्यात आली आहे.
डिसेंबर
ईशान्य भागातील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यावर लक्ष केंद्रित करत आणि तेथील अव्यक्त प्रतिभा आणि नैसर्गिक खजिने यांचा उत्सव साजरा करत, पंतप्रधानांनी ईशान्य भारतातील आठ राज्यांना ‘अष्ट लक्ष्मी’ असे संबोधले आहे. या नावातून, भारताच्या समृद्धतेच्या दृष्टीने या आठ राज्यांतील व्यापार,वाणिज्य,नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यांचे महत्त्व लक्षात येते आणि समावेशक भारत घडविण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून या सगळ्याकडे पाहता येते.
* * *
S.Patil/S.Kane/S.Chavan/S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887139)
Visitor Counter : 256