युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
वर्ष अखेर आढावा: क्रीडा विभाग
Posted On:
20 DEC 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2022
2022 या सरत्या वर्षातील भारतीय क्रीडा क्षेत्राची लक्षवेधी प्रमुख कामगिरी
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची प्रशंसनीय कामगिरी:
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत 22 सुवर्णपदकांसह 61 पदकांची कमाई करत भारत चौथ्या स्थानावर राहिला. भारताला ज्या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदके मिळण्याची अपेक्षा होती त्या नेमबाजी आणि ग्रिको- रोमन कुस्ती या प्रकारांचा समावेश या स्पर्धेत नसतानाही भारतीय खेळाडूंनी कुस्तीत 12 आणि भारोत्तोलनात 10 पदके पटकावत राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिऱ्यांपैकी एक कामगिरी नोंदवली. भारतीय लॉन बाउल्सच्या महिला संघाने सुवर्ण तर पुरूष संघाने रौप्यपदक मिळवत बाजी मारली.
बॅडमिंटनमधील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय थॉमस चषक भारतीय पुरुष संघाने प्रथमच जिंकून इतिहास रचला. थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत 14 वेळा विश्वविजेता ठरलेल्या इंडोनेशियाचा पराभव करून भारताने जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21मे 2022 रोजी या संघाची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. उबेर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिला बॅडमिंटन संघाचाही पंतप्रधानांनी गौरव केला.
2021च्या ब्राझील येथे झालेल्या डेफलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघालाही पंतप्रधानांनी 21मे 2022 रोजी सन्मानित केले. या स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी 16 पदके (8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 7 कांस्य पदके) जिंकत देशासाठी आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.
राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार 2022:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका भव्य समारंभात राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार 2022 प्रदान केले. एकूण 44 पुरस्कारांचे वितरण झाले. दिग्गज टेबल टेनिसपटू शरथ कमल हा या वर्षी प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा एकमेव मानकरी ठरला. याप्रसंगी वितरित केलेल्या इतर पुरस्कारांमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, क्रीडा आणि खेळातील जीवनगौरव पुरस्कारासाठीचे ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद करंडक आणि तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार यांचा समावेश आहे.
भारताने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि कार्यक्रम
- फिफा अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 2022 रोजी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये झाले. 30 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कोलंबियाचा पराभव करून जेतेपद मिळवले. गेल्या पाच वर्षांत भारताने आयोजित केलेली ही दुसरी मोठी फुटबॉल स्पर्धा होती.
44व्या फिडे (आंतरराष्ट्रीय/जागतिक बुद्धिबळ महासंघ) बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे (28 जुलै, 2022 ते 10 ऑगस्ट, 2022) पंतप्रधानांनी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन केले. 188 देशांतील 2000 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. ही संख्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. 19 जून 2022 पासून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये "बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी टॉर्च रिले" सुरू झाला. ही मशाल 40 दिवसांच्या कालावधीत देशभरातील 75 आयकॉनिक ठिकाणी नेण्यात आली. बुद्धिबळ ऑलिम्पियाड होत असलेल्या तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथे आल्यावर या मशालीचा दौरा संपला.
तिसरी वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (वाडा) ॲथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट (एबीपी) परिषद-2022 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आणि इतर मान्यवरांनी परिसंवादाच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. एबीपी हे अँटी-डोपिंग आणि संबंधित संशोधनातील एक अतिशय महत्त्वाचे वैज्ञानिक साधन आहे. त्यामुळे खेळाडूंनी प्रतिबंधित असलेल्या उत्तेजक पदार्थांचे सेवन केले आहे की नाही हे शोधता तर येतेच पण क्रीडा क्षेत्रातील अशा कारवाया रोखता येतात, याविषयी माहितीपर असलेला हा परिसंवाद उल्लेखनीय ठरला.
गुजरातमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन :
12 ऑक्टोबर 2022 रोजी पंडित गुजरातमध्ये सुरतच्या दीनदयाल इनडोअर स्टेडियममध्ये 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) ने 128 पदकांसह (61 सुवर्णांसह) पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर महाराष्ट्र संघाला दुसरा तर हरियाणा संघाला तिसरा क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन 29 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबाद येथे झाले. उद्घाटन समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 15,000 हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी झाले होते आणि 36 क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत होता. त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी राष्ट्रीय स्पर्धा ठरली. क्रीडा मंत्रालयाने या खेळांच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आली.
खेलो इंडिया योजनेअंतर्गत आयोजित स्पर्धा:
- पुढील वर्षी मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स (केआयवायजी) औपचारिक घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत केली.
- कोरोनामुळे विलंबित चौथे खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणात पंचकुला येथे 4 जून 2022 ते 13 जून या कालावधीत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 4700 हून अधिक स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला. 5 स्वदेशी खेळांसह 25 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत होता.
- दुसरे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (केआययुजी) 24 एप्रिल 2022 ते 3 मे 2022 या कालावधीत कर्नाटकातील बेंगळुरूच्या जैन विद्यापीठासह 5 ठिकाणी आयोजित करण्यात आले. मल्लखांब आणि योगासन यांसारख्या देशी खेळांसह 20 विविध क्रीडा प्रकारात 200 हून अधिक विद्यापीठांतील एकूण 3894 स्पर्धकांनी त्यात भाग घेतला.
राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक 2021: नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा), नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी (एनडीटीएल) आणि इतर डोप चाचण्या सुविधांच्या कामकाजासाठी वैधानिक रचनात्मक चौकट प्रदान करणारे राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक 2021, 27 जुलै 2022 रोजी लोकसभेत आणि त्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. या नवीन कायद्यामुळे देशातील क्रीडा क्षेत्रातील डोपिंग नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय डोपिंग (उत्तेजक द्रव्य)विरोधी मंडळाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल.
S.Thakur/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885478)
Visitor Counter : 253