नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गोव्यामध्ये  झालेल्या एका कार्यक्रमात ऐतिहासिक आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना अर्पण केली आदरांजली

Posted On: 10 DEC 2022 4:57PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गोव्यातील एका कार्यक्रमात ऐतिहासिक आसाम चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. आसामचे पहिले हुतात्मा खरगेश्‍वर तालुकदार यांच्या 1979 मधल्या  बलीदानाच्या स्मृती निमित्ताने शहीद दिन पाळण्यात आला. केंद्रीय मंत्री तीन दिवसांच्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पणजीम येथील फ्रान्सिस्को लुईस गोम्स गार्डन येथे आसाम सोसायटी ऑफ गोवा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आसामी समुदायाचे सदस्य, अनेक मान्यवर आणि स्थानिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी 1979-1985 या सहा वर्षांच्या आसाम चळवळीतील हुतात्म्यांच्या शौर्याची आठवण करून दिली. " आसामच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आज स्वाहिद दिनानिमित्त मी सलाम करतो. बेकायदेशीर स्थलांतरितांपासून राज्याचे रक्षण करण्यासाठी आसामच्या लोकांनी सहा वर्षे चाललेल्या चळवळीत भाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी 860 हुतात्म्यांनी बलिदान दिले. असेही सोनोवाल यावेळी म्हणाले.

शूर हुतात्म्यांचे उदात्त आदर्श जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रामाणिकपणा, समर्पण आणि दृढनिश्चयाने काम करत राहिले पाहिजे. आपली भाषा, संस्कृती, वारसा आणि परंपरा जिवंत ठेवण्याची आपली राष्ट्रीय जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जगभरातील विद्यार्थी चळवळींच्या इतिहासाचे विश्लेषण केले तर आसाम चळवळ हा त्यातील एक परमोच्च बिंदू होता, असे ते म्हणाले. आसामच्या लोकांनी तसेच देशाच्या विविध भागांतील लोकांनी या चळवळीपासून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन एक मजबूत भारत घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपल्या मातृभूमीला समर्पित सेवा द्यावी असे आवाहन सोनोवाल यांनी केले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1882405) Visitor Counter : 185