पंतप्रधान कार्यालय
संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी राज्यसभेला संबोधित केले
पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींचे संसदेच्या वरिष्ठ सदनात स्वागत केले
सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त पंतप्रधानांनी सदनाच्या सर्व सभासदांच्या वतीने सशस्त्र दलांना अभिवादन केले
आपले उपराष्ट्रपती किसान पुत्र आहेत आणि त्यांनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले आहे, त्यामुळे जवान आणि किसान यांच्याशी त्यांचे जवळचे नाते असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
अमृत काळाच्या प्रवासात आपली लोकशाही, आपली संसद आणि आपली संसदीय प्रणाली मोलाची भूमिका बजावेल- पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास
एखादी गोष्ट केवळ साधनसंपत्तीने नव्हे, तर सराव आणि अनुभूतीने साध्य होते याचा पुरावा म्हणजे उपराष्ट्रपतींचे जीवन आहे- पंतप्रधानांचे गौरवोद्गार
पुढाकार घेणे हीच नेतृत्वाची खरी व्याख्या आहे आणि राज्यसभेच्या संदर्भात त्याचे महत्व आणखी अधोरेखित होते
सभागृहातील लोकशाही पद्धतीने गंभीर चर्चा लोकशाहीची जननी असा भारताचा गौरव आणखी बळकट करेल
Posted On:
07 DEC 2022 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला राज्यसभेला संबोधित केले आणि उपराष्ट्रपतींचे वरिष्ठ सभागृहात स्वागत केले.
भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांचे संसदेच्या सर्व सदस्यांच्या तसेच देशातील सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. देशाच्या उपराष्ट्रपतीच्या प्रतिष्ठित पदाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की हे पद लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.
राज्यसभा अध्यक्षांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी आजच्या सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त आनंद व्यक्त केला आणि सदनाच्या सर्व सदस्यांच्या वतीने सशस्त्र दलांना अभिवादन केले. उपराष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या झुंझुनूचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी देश सेवेसाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या झुंझुनू इथल्या असंख्य कुटुंबांच्या योगदानाचा उल्लेख केला. उपराष्ट्रपतींचे जवान आणि किसान यांच्याशी असलेले जवळचे संबंध त्यांनी अधोरेखित केले आणि म्हणाले, “आपले उपराष्ट्रपती किसान पुत्र आहेत आणि ते सैनिकी शाळेत शिकले आहेत, त्यामुळे त्यांचं जवान आणि किसान यांच्याशी जवळचं नातं आहे.”
भारत दोन महत्वाच्या घटनांचा साक्षीदार होत असताना संसदेचे सन्माननीय वरिष्ठ सभागृह उपराष्ट्रपतींचे स्वागत करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश केला आहे आणि जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठेची संधी देखील भारताला मिळाली आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, आगामी काळात नव्या भारतासाठी विकासाचे नवे पर्व सुरू करण्याबरोबरच जगाची दिशा ठरवण्यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावेल. “अमृत काळाच्या प्रवासात आपली लोकशाही, आपली संसद आणि आपली संसदीय प्रणाली मोलाची भूमिका बजावेल”, ते पुढे म्हणाले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राज्यसभेचे सभापती म्हणून कारकिर्दीची औपचारिक सुरूवात आज होत आहे, ही बाब अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, वरिष्ठ सभागृहाच्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या निर्धारित केल्या आहेत, त्या सामान्य माणसांना जे मुद्दे चिंताजनक वाटतात, त्यांच्याशी निगडित आहेत. भारताला आपली जबाबदारी समजते आणि तो ती चांगल्या प्रकारे पार पाडतो, असे त्यांनी पुढे म्हटले. या महत्वाच्या कालखंडात भारतातील प्रतिष्ठित आदिवासी समाज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात देशाला मार्गदर्शन करत आहे, याकडेही पंतप्रधानांनी दिशानिर्देश केला. तसेच अत्यंत उपेक्षित समाजातून वर आलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचल्याच्या बाबीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
राज्यसभेच्या सभापतींबाबत परम आदरपूर्वक बोलताना, पंतप्रधान म्हणाले की, केवळ साधनसंपत्ती भरपूर असली तर काही साध्य करता येत नाही तर सातत्यपूर्ण सराव आणि वास्तवाची अनुभूती यातूनच यश साध्य करता येते, याचा पुरावा म्हणजे तुमचे आजचे आयुष्य आहे. तीन दशकांहून अधिक काळपर्यंत वरिष्ठ वकील म्हणून उपराष्ट्रपतींच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकताना पंतप्रधान गमतीच्या सुरात म्हणाले की, त्यांना सभागृहातही न्यायालयात असल्यासारखेच वाटेल कारण राज्यसभेत असलेले बरेच लोक त्यांना सर्वोच्च न्यायालयात भेटत असत. ते पुढे म्हणाले की, तुम्ही आमदारापासून ते खासदारापर्यंत, केंद्रीय मंत्री ते राज्यपाल अशा सर्व भूमिका निभावल्या आहेत. या सर्व भूमिकांमध्ये एक समानता, एक सातत्य आहे आणि ते म्हणजे देशाचा विकास आणि लोकशाही मूल्यांच्या प्रति समर्पण भावना. उपराष्ट्रपतींपदाच्या निवडणुकीत त्यांना 75 टक्के मते मिळाली, प्रत्येकाला त्यांच्याबद्दल किती ममत्व वाटते, याचाच तो पुरावा होता, याचेही पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, कोणत्याही गोष्टीत स्वतः पुढे राहून कार्य करणे ही नेतृत्वाची खरी व्याख्या आहे आणि राज्यसभेच्या संदर्भात तर ती जास्तच महत्वाची आहे कारण लोकशाही मूल्ये जपणारे निर्णय अधिक शास्त्रशुद्ध मार्गाने पुढे नेणे ही राज्यसभेची जबाबदारी आहे.
सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळून ती आणखी वाढवण्याची जबाबदारी राज्यसभा सदस्यांवर निश्चित केली असल्याच्या रोखाने पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या उत्तुंग अशा लोकशाही वारशाचे जतन करणारे वरिष्ठ सभागृह आहे आणि तीच त्याची ताकदही राहिली आहे. अनेक माजी पंतप्रधानांनी केव्हा नं केव्हा राज्यसभा सदस्य म्हणून देशाची सेवा केली आहे, यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. पंतप्रधानांनी सदस्यांना असे आश्वासन दिले की, उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली हे सभागृह आपली परंपरा आणि प्रतिष्ठा आणखी उंचीवर घेऊन जाईल. सदनात लोकशाही मार्गाने झालेली गंभीर चर्चा लोकशाहीची जननी म्हणून असलेल्या आमच्या अभिमानाला आणखी पाठबळ देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, गेल्या सत्रात माजी उपराष्ट्रपती आणि माजी अध्यक्षांनी वापरलेले वाक्प्रचार आणि खुसखुशीत कविता या सदस्यांसाठी आनंद आणि हास्याची खसखस पिकवणाऱ्या स्त्रोत ठरल्या होत्या, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. मला खात्री आहे की तुमचीही शीघ्र विनोदबुद्धी ती उणीव राहू देणार नाही आणि तुम्हीही सभागृहाला तो आनंददायक अनुभव देत रहाल, या शब्दांत पंतप्रधानांनी समारोप केला.
* * *
R.Aghor/R.Agashe/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881366)
Visitor Counter : 237
Read this release in:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu