माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांना 53 व्या इफ्फीच्या सांगता समारंभात ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय चेहरा-2022’ चा पुरस्कार प्रदान
गोवा/मुंबई, 28 नोव्हेंबर 2022
दक्षिणात्य तेलगु चित्रपटसृष्टी-टॉलिवूडचे मेगास्टार, पद्मभूषण चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध असलेले, कोनिडेला शिव शंकरा वारा प्रसाद यांना आज गोव्यातील 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय चेहरा-2022’ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी, इफ्फी आणि भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, अशा भावना चिरंजीवी यांनी यावेळी व्यक्त केल्या. “चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असं होतं, तेलुगु चित्रपट सृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. आणि आता माझी कीर्ती, माझे नाव, करिश्मा, सर्व माझ्या चाहत्यांचे अनमोल प्रेम आणि आपुलकी हे सगळं मला तुमच्याकडून मिळालं. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणार्या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणार्या चित्रपटसृष्टीचा मी कायम आभारी असेन. या इंडस्ट्रीचा मी आयुष्यभर ऋणी आहे.” असे ते म्हणाले.
हा सन्मान स्वीकारतांना चिरंजीवी यांनी, राजकारणातून परत चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तेवढेच प्रेम देणाऱ्या आपल्या चाहत्यांचेही आभार मानले. “मला मिळालेलं प्रेम आणि आपुलकी, शब्दातीत आहे. मी या चित्रपट सृष्टीत, 45 वर्षांपासून आहे, आणि त्यापैकी एक दशक, मी राजकारणात होतो,त्यानंतर मी जेव्हा परत चित्रपटांकडे वळलो तेव्हा मला जरा शंका होती की प्रेक्षक मला कसे स्वीकरतील. मला पूर्वीसारखंच प्रेम आणि आपुलकी मिळेल का? मात्र, लोकांचं माझ्यावरचं प्रेम आणि आपुलकी जराही कमी झाली नव्हती. ती व्दिगुणित झाली होती. त्यांच्या हृदयात असलेलं माझं स्थान अढळ होतं. मी तुम्हाला वचन देतो, की माझ्या या भावना कधीही बदलणार नाहीत, मी कायम इथे तुमच्यासोबत असेन.” असे ते पुढे म्हणाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर चिरंजीवी यांनी सरकार आणि चित्रपट उद्योगाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच, आयुष्यभर शिदोरी म्हणून उपयुक्त ठरेल असा अनुभव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे . मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वांना हेच सांगेन, की चित्रपटसृष्टीत येण्याची कोणाला इच्छा असेल तर कृपया या, हा कमी भ्रष्टाचार असलेला व्यवसाय आहे, तुम्हाला इथे आल्याचा पश्चात्ताप होणार नाही, तुमच्यात प्रतिभा असेल तर तुमची कीर्ती गगनाला भिडेल', असा सल्ला त्यांनी दिला.
चार दशकांहून अधिक काळाच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत, चिरंजीवी यांनी तेलुगूमधील 150 हून अधिक चित्रपटांमध्ये तसेच हिंदी, तमिळ आणि कन्नडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879636)
Visitor Counter : 318