माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इफ्फी 53 मध्ये दाखवण्यात आला जयदीप मुखर्जी यांचा माहितीपट 'अदर रे: द आर्ट ऑफ सत्यजित रे'


'रे पोस्टर मेकिंग' स्पर्धेसाठीच्या प्रवेशिकांचे इफ्फी 53 मध्ये प्रदर्शन

इफ्फी 53 मध्ये सत्यजित रे यांच्यावरील विशेष विभाग

Posted On: 25 NOV 2022 3:50PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2022

 

मी सत्यजित रे यांच्या सौंदर्यात्मक सर्जनशीलतेबाबत  माझी स्वतःची धारणा सादर करण्याचा प्रयत्न केला: जयदीप मुखर्जी

“अदर  रे: द आर्ट ऑफ सत्यजित रे'  हा माहितीपट रे यांच्या  सर्जनशील प्रतिभेची मुळे शोधणारा : जयदीप मुखर्जी

इफ्फी 53 मध्ये  सत्यजित रे यांच्यावरील विशेष विभागाचा एक भाग म्हणून, जयदीप मुखर्जी यांचा 34 मिनिटांचा माहितीपट “अदर रे: द आर्ट ऑफ सत्यजित रे”,  24 नोव्हेंबर 2022 रोजी इंडियन पॅनोरमा विभागात दाखवण्यात  आला. पत्र सूचना कार्यालयाने  इफ्फी टेबल टॉक अंतर्गत  प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांसोबत आयोजित केलेल्या चर्चेत  दिग्दर्शक जयदीप मुखर्जी यांनी संवाद साधला.  हा  एक चरित्रात्मक माहितीपट आहे ज्यामध्ये रे यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेबाबत  आपली स्वतःची धारणा मांडली असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. 

रे यांच्या  प्रतिभेच्या विविध छटांचा  – चित्रकार, सुलेखनकार, संगीतकार, दिग्दर्शक – या माहितीपटात समग्र वेध घेण्यात आला आहे, असे मुखर्जी यांनी सांगितले.  रे यांना सर्जनशीलतेचा वारसा  आजोबा उपेंद्रकिशोर रे चौधरी आणि वडील सुकुमार सेन यांच्याकडून लाभला होताच  परंतु शांतीनिकेतनमध्ये नंदलाल बोस आणि इतरांसारख्या दिग्गजांच्या हाताखाली रे यांनी  घेतलेले प्रशिक्षण त्यांच्या कलाकृतीत  स्पष्टपणे प्रतिबिंबित होते, असे त्यांनी सांगितले. 

मुखर्जी म्हणाले,  हा माहितीपट रे यांच्या पात्रांच्या विकासावर पडलेले इतर प्रभाव देखील दर्शवतो, जसे की त्यांनी जाहिरात  फर्म डी.जे.कीमारमध्ये ज्युनियर व्हिज्युअलायझर म्हणून घालवलेली वर्षे किंवा प्रोफेसर अ‍ॅलेक्स अ‍ॅरोन्सन यांच्याकडून घेतलेले  पाश्चात्य संगीताचे धडे  – जे त्यांच्या  चित्रपटांमधील अनेक रचना आणि  साउंडट्रॅकसाठी वाद्यवृंद  प्रक्रियेचा एक भाग होता.

या माहितीपटाच्या  संकल्पनेला  प्रत्यक्ष आकार देताना अनेक दशके कराव्या लागलेल्या संघर्षच्या आठवणींना मुखर्जी यांनी उजाळा दिला.  “सर रिचर्ड अ‍ॅटनबरो आणि रे यांच्या लंडनमधील इतर मित्रांकडून मिळालेल्या माहितीसोबत मला 2007 मध्ये कोलकाता येथे झालेल्या प्रदर्शनात रे यांच्या चित्रांची आणि इतर कलाकृतींची छायाचित्रे घ्यावी लागली,” असे त्यांनी सांगितले. 

येत्या  2-3 वर्षात ऋत्विक घटक आणि मृणाल सेन यांच्या शताब्दीनिमित्त अशाच प्रकारचे माहितीपट बनवण्याचा मानस दिग्दर्शकाने व्यक्त केला. 

महोत्सवात  "द वन अँड ओन्ली रे" हा विभाग देखील आहे. या अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत  देशभरातील चित्रपट रसिकांनी पुन्हा रेखलेली  रे यांच्या चित्रपटांची पोस्टर्स मांडण्यात आली  आहेत. इफ्फी 2022 मध्ये सत्यजित रे यांचे,  1977 मधील 'शतरंज के खिलाडी' आणि 1989 मधील 'गणशत्रू.' हे दोन अभिजात चित्रपटदेखील दाखवले जात आहेत. 

टेबल टॉक अंतर्गत दिग्दर्शक जयदीप मुखर्जी यांच्यासोबतची संपूर्ण चर्चा पहा  :

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1878835) Visitor Counter : 55