पंतप्रधान कार्यालय

रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 22 NOV 2022 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022

नमस्कार !

रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या माझ्या युवा सहकाऱ्यांनो,

तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला  केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे  वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

मित्रांनो,

गेल्या महिन्यात जेव्हा रोजगार मेळाव्याची सुरवात झाली, तेव्हा मी आणखी एक गोष्ट बोललो होतो. मी म्हणालो होतो की, विविध केंद्रशासित प्रदेश, रालोआ  आणि भाजपाशासित राज्य देखील याच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करत राहतील. मला आनंद आहे, की गेल्या एक महिन्यातच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील राज्य सरकारांच्या वतीने हजारो तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेश सरकारने देखील अनेक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. गेल्या एक महिन्यात जम्मू-कश्मीर, लदाख, अंदमान-निकोबार बेट, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दिव आणि चंडीगडमध्ये देखील रोजगार मेळावे आयोजित करून हजारो तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. मला सांगण्यात आलं आहे, की परवा, म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी गोवा सरकार देखील अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार आहे. 28 नोव्हेंबरला त्रिपुरा सरकार देखील रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार आहे. हाच दुहेरी इंजिनच्या सरकारचा दुहेरी फायदा आहे. देशाच्या तरुणांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे देण्याची ही मोहीम अशाच प्रकारे अविरत सुरु राहील. 

मित्रांनो,

भारतासारख्या तरुण देशात, आपले कोट्यवधी तरुण या राष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहेत. आपल्या युवकांची प्रतिभा आणि त्यांची उर्जा, राष्ट्रनिर्मितीत जास्तीतजास्त वापरली गेले पाहिजे, याला केंद्र सरकर प्राधान्य देत आहे. आज राष्ट्र निर्माणाच्या कर्तव्यपथावर येणाऱ्या आपल्या 71 हजारांहून जास्त नव्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. ज्या पदांवर आपली नियुक्ती होणार आहे, तिथे आपण अथक परिश्रमातून कठीण स्पर्धेत यश मिळवून पोहोचले आहात. म्हणून आपण आणि आपली कुटुंबे देखील अभिनंदानास पात्र आहात.

माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,

तुम्हाला ही नवीन जबाबदारी एका विशेष कालखंडात मिळत आहे. देशाने अमृतकाळात प्रवेश केला आहे. आपण देशवासियांनी मिळून, या अमृतकाळात भारताला विकसित बनविण्याचा प्रण केला आहे. हा प्रण पूर्ण करण्यासाठी आपण सर्व देशाचे सारथी बनणार आहात. आपणा सर्वांना जी जबाबदारी मिळणार आहे, त्यात तुम्ही, इतर देशवासियांच्या समोर एकप्रकारे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त होणार आहात. अशा परिस्थितीत आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपली भूमिका चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे. एक लोकसेवक म्हणून सेवा देण्यासाठी आपण आपली क्षमता वाढवणे, क्षमता निर्माण करणे यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज सरकारच्या प्रयत्नांमुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला उत्तम प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न होतो आहे. अलीकडेच जो ‘कर्मयोगी भारत’ मंच सुरु झाला आहे, त्यात अनेक प्रकरचे ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आजच, आपल्यासारख्या नव्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष अभ्यासक्रमाची देखील सुरुवात केली जात आहे. याला नाव दिले गेले आहे - कर्मयोगी प्रारंभ. आपण ‘कर्मयोगी भारत’ मंचावर उपलब्ध ऑनलाईन अभ्यासक्रमांचा जरूर लाभ घ्यालच. यामुळे आपले कौशल्य देखील अद्ययावत होतील आणि भविष्यात आपल्याल्या कारकिर्दीत देखील याचा लाभ मिळेल.

मित्रांनो,

आज आपण हे देखील बघत आहात की जागतिक महामारी आणि युद्धाच्या संकटात, संपूर्ण जगात तरुणांसमोर नव्या संधी मिळविण्याचे संकट आहे.

मोठमोठे तज्ञ, विकसित देशांत देखील मोठ्या संकटाची भीती व्यक्त कात आहेत. अशा काळात अर्थशास्त्री आणि तज्ञ म्हणत आहेत की भारताकडे आपले आर्थिक सामर्थ्य दाखविण्यासाठी आणि नव्या संधी निर्माण करण्याची एक सुवर्णसंधी आहे.

भारत आज सेवा निर्यातींच्या बाबतीत जगातील एक मोठी शक्ती बनला आहे. भारत जगाचे उत्पादन केंद्र देखील होणार आहे असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत. यामध्ये आपल्या  पीएलआय अर्थात उत्पादनाशी संलग्न अनुदान योजनेसारख्या योजनांची भूमिका मोठी असेल. पण याचा मुख्य पाया कुशल मनुष्यबळ, भारतातील कुशल युवावर्गच असेल. तुम्हीच कल्पना करून पहा,फक्त पीएलआय योजनेतून देशात 60 लाख नवे रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. मेक इन इंडिया अभियान असो,व्होकल फॉर लोकल असो, लोकल उत्पादनांना  ग्लोबल पातळीवर घेऊन जाणे असो, या सर्व योजना देशात रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहेत. याचा अर्थ असा की सरकारी आणि बिगर सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची शक्यता सतत वाढत आते. आणि यात सर्वात महत्वाची बाब ही आहे की युवकांना या नव्या संधी त्यांच्याच शहरात, त्यांच्याच गावांमध्ये मिळू लागल्या आहेत. त्यामुळे युवकांना आता आपले गाव किंवा शहर सोडून जावे लागणार नाही  आणि ते  आता त्यांच्याच क्षेत्रातील विकासकार्यात संपूर्ण सहकार्य देऊ शकत आहेत . स्टार्ट अप पासून स्वयंरोजगारापर्यंत , अवकाश क्षेत्रापासून ड्रोन निर्मितीपर्यंत देशात चोहीकडे आज नव्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारतातील 80 हजारांहून अधिक स्टार्ट अप उद्योग युवकांना विविध क्षेत्रांमध्ये  त्यांचे सामर्थ्य प्रदर्शित करण्याची संधी देत आहेत. औषधांचा पुरवठा असो  किंवा कीटकनाशक फवारणी, स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन द्वारे मॅपिंग किंवा संरक्षण क्षेत्रातील वापर असो, देशभरात ड्रोन्सचा वापर सतत वाढत आहे. आणि ड्रोन्सचा हा वाढता वापर युवकांना नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे. आपल्या सरकारने अवकाश क्षेत्र खुले करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा देखील युवकांना मोठा फायदा होत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारतातील खासगी क्षेत्राने यशस्वीपणे त्यांच्या पहिल्या अग्निबाणाचे प्रक्षेपण केले. देशात ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना मुद्रा योजनेतून दिले जाणारे कर्ज अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आतापर्यंत देशात 35 कोटींहून अधिक मुद्रा कर्जे देण्यात आली आहेत. देशात नवोन्मेषाला प्रोत्साहन दिल्यामुळे, संशोधनाला प्रेरणा दिल्यामुळे देखील रोजगाराच्या संधी वाढत आहेत. देशातील युवकांनी या नव्या संधींचा पुरेपूर लाभ करून घ्यावा असे आवाहन मी त्यांना करतो. आजच्या कार्यक्रमात ज्या 71 हजारांहून अधिक युवकांना नेमणुकीचे पत्र मिळाले आहे, त्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही तुमची क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही असा विश्वास मला वाटतो आहे. आज जे नेमणूक पत्र तुम्हाला मिळाले आहे तो केवळ एक प्रवेश बिंदू आहे. त्याचा अर्थ असा आहे की प्रगतीचे एक नवे जग तुमच्यासमोर खुले झाले आहे. आता स्वतःला अधिकाधिक प्रमाणात योग्य  बनवून दाखवा, काम करता करता तुमची योग्यता देखील वाढवा, ज्ञान संपादन करत अधिक योग्यता प्राप्त करा. तुमच्या वरिष्ठांमध्ये जे चांगले ज्ञान आहे ते अवगत करून स्वतःची योग्यता वाढवा. 

मित्रांनो,

मी देखील तुमच्या प्रमाणेच सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्यातील विद्यार्थ्याला मी शांत बसू देत नाही. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकतो, अगदी लहानशी गोष्ट देखील शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे, मला एकाच वेळी अनेक कामे करण्यात संकोच वाटत नाही, मनात चलबिचल होत नाही, मी ती सर्व कामे सहजतेने करू शकतो. आणि हे तुम्हीही करू शकता.म्हणूनच मित्रांनो, मला असे वाटते की कर्मयोगी आरंभाचे हे जे कार्य सुरु झाले आहे त्याच्यात सहभागी व्हा.एका महिन्याच्या कालावधीनंतर या ऑनलाईन प्रशिक्षणाचा अनुभव तुम्ही मला सांगा, या ऑनलाईन प्रशिक्षणात काही कमतरता राहून गेली असेल किंवा या उपक्रमाला आणखी चांगले स्वरूप देण्यासाठी काही करता येण्यासारखे असेल तर आम्हाला कळवा.या कर्मयोगी प्रशिक्षण कार्यक्रमाचा दर्जा अधिक सुधारण्याबाबतच्या सूचना तुम्ही स्वतः देखील देऊ शकता. तुमच्या प्रतिसादाची मी प्रतीक्षा करीन.हे  पहाआपण सर्वजण साथीदार आहोत, सहकारी आहोत, सह-प्रवासी आहोत. भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडविण्याच्या मार्गावर आपण वाटचाल सुरु केली आहे. या, अनेकानेक शुभेच्छांसह आपण या मार्गावर पुढे जात राहण्याचा संकल्प  करूया.

अनेक-अनेक  धन्‍यवाद!   

 

S.Kane/Radhika/Sanjana/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1877982) Visitor Counter : 227