पंतप्रधान कार्यालय

रोजगारमेळा अंतर्गत, पंतप्रधान उद्या 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करणार


पंतप्रधानांच्या हस्ते सर्व नवनियुक्तांसाठी कर्मयोगी प्रारंभ मोड्यूल-ऑनलाईन अभिमुखता अभ्यासक्रमाचे उद्‌घाटन

Posted On: 21 NOV 2022 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022

रोजगार मेळा अंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्या सकाळी 10:30 वाजता नव्याने नियुक्त झालेल्या 71,000 जणांना नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नवनियुक्तांना संबोधितही करणार आहेत.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने रोजगार मेळा हे एक पाऊल आहे. रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, रोजगार मेळा अंतर्गत 75,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली होती.

देशात 45 ठिकाणी (गुजरात आणि हिमाचलप्रदेश वगळून) नवीन नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्रांच्या लेखी प्रती सुपूर्द करण्यात येणार आहेत. यापूर्वी ज्या पदांकरता भरती झाली आहे, त्याशिवाय शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर्स (क्ष किरण तज्ञ) आणि इतर तांत्रिक तसेच निमवैद्यकीय शाखांमधील पदेही भरण्यात येत आहेत. केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातर्फे विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्येही महत्वपूर्ण संख्येने पदे भरली जात आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कर्मयोगी प्रारंभ मोड्युलची सुरूवातही होणार आहे. हे मोड्यूल म्हणजे विविध सरकारी विभागांतील नवनियुक्तांसाठी ऑनलाईन अभिमुखता (दिशानि्र्देश) अभ्य़ासक्रम आहे. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे नियम, कामाच्या ठिकाणी पाळावयाची तत्वे आणि एकात्मिकता, मनुष्यबळ विकास विषयक धोरण आणि इतर लाभ तसेच भत्ते यांचा समावेश असेल जे नवनियुक्तांना नव्या वातावरणाशी आणि धोरणाशी जुळवून घेण्यास  तसेच नव्या भूमिकेत स्वतःला सामावून घेण्यास सहाय्यभूत ठरतील. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना igotkarmayogi.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अन्य अभ्यासक्रम घेण्याची संधीही मिळेल आणि त्याद्वारे ते आपले ज्ञान, कौशल्य आणि स्पर्धात्मकता वाढवू शकतील.

 

 

 

 

S.Tupe/U.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877693) Visitor Counter : 191