पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे तंत्रज्ञान शिखरपरिषदेला केले मार्गदर्शन


"बेंगळुरू हे सर्वसमावेशक आणि नवोन्मेषी कल्पनांचे शहर; तसेच तंत्रज्ञान आणि विचारांच्या नेतृत्वाचे माहेरघर आहे"

" कल्पक युवापिढी आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे भारताचे भविष्य खूप उज्ज्वल असेल"

"भारतात समानता आणि सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञान ही ताकद आहे "

"एकात्मतेला नावीन्याची जोड दिली तर ती एक शक्ती बनते"

“भारत आता लालफितीचा कारभाराला स्‍थान नाही; तर गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी देणारे राष्ट्र बनले आहे ”

Posted On: 16 NOV 2022 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

भारतातील नवोन्मेषी- कल्पक तरुणांमुळे तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यांचे जागतिकीकरण होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. ते बेंगळुरू तंत्रज्ञान शिखरपरिषदेला दूरदृष्य प्रणालीद्वारे माग्रदर्शन करताना बोलत होते. 

भारतात समानता आणि सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञान ही शक्ती आहे, असेही त्यांनी सांगितले. बेंगळुरू हे तंत्रज्ञान आणि विचार यांच्या नेतृत्वाचे माहेरघर असून ते एक सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण शहर आहे, असे पंतप्रधान म्हटले. अनेक वर्षांपासून बेंगळुरू भारताच्या नवकल्पनांच्या निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, असेही ते पुढे म्हणाले.

भारताच्या तंत्रज्ञानाने आणि नवकल्पनांनी जगाला प्रभावित केले आहे. भारतातील कल्पक युवक आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशाचे भविष्य वर्तमानापेक्षा खूप उज्ज्वल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  भारतीय तरुणांनी तंत्रज्ञानाचे आणि गुणवत्तेचे जागतिकीकरण केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील प्रतिभा आपण जागतिक हितासाठी वापरत आहोत, असेही ते म्हणाले.

जागतिक नविनता निर्देशांकात (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये) भारताने या वर्षी 40 व्या क्रमांकावर झेप घेतली. 2015 मध्ये आपण या निर्देशांकानुसार 81 व्या क्रमांकावर होतो, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. 2021 पासून भारतातील युनिकॉर्न स्टार्ट-अप्सची संख्या दुप्पट झाली आहे, कारण भारत 81000 मान्यताप्राप्त स्टार्ट अप्ससह तिसरा सर्वात मोठा देश म्हणून उदयास आला आहे. भारतीय ‘टॅलेंट पूल’ने शेकडो आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात त्यांची संशोधन आणि विकास केंद्रे सुरू करण्यासाठी  प्रोत्साहन दिले आहे.

भारतीय तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपलब्धतेबद्दल पंतप्रधानांनी विचार मांडले.  देशात होत असलेल्या मोबाईल आणि माहितीच्या क्रांतीबद्दलही त्यांनी सांगितले. गेल्या 8 वर्षांत, ब्रॉडबँड कनेक्शनची संख्या 60 दशलक्ष वरून 810 दशलक्ष इतकी वाढली. स्मार्टफोन वापरकर्ते 150 दशलक्षावरून 750 दशलक्ष झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटची वाढ वेगाने होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. माहितीच्या ‘सुपर-हायवे’शी लोकसंख्येचा एक नवीन भाग जोडला जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणावरही त्यांनी प्रकाश टाकला. तंत्रज्ञानाला मानवतेचा स्पर्श कसा द्यायचाहेही भारताने दाखवून दिले आहे असेही ते म्हणाले. भारतात तंत्रज्ञान ही समानता आणि सक्षमीकरणाची शक्ती आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना, आयुष्मान भारत या योजनेचे उदाहरण दिले.  या योजनेचा लाभ सुमारे 200 दशलक्ष कुटुंबे म्हणजे 600 दशलक्ष लोकांना होत आहे असे त्यांनी सांगितले. आपली राष्ट्रीय कोविड प्रतिबंधक  लसीकरण मोहीम तंत्रज्ञानावर चालणारी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, असल्याचे ते म्हणाले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील उदाहरणे देखील दिली. मुक्‍त अभ्‍यासक्रमांचे सर्वात मोठे ऑनलाइन जाळे आपल्याकडे आहे. त्याद्वारे 10 दशलक्षाहून अधिक ऑनलाइन आणि विनामूल्य प्रमाणपत्रे दिली आहेतअसे त्यांनी सांगितले. सर्वात कमी ‘डेटा टेरिफ’मुळे गरीब विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराच्या काळात ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहण्यास मदत झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, गरीबीविरुद्धच्या लढ्यात भारत तंत्रज्ञानाचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. गरीबांसाठी अनुकूल ठरणा-या उपाययोजनांची  विस्तृत माहिती देताना त्यांनी स्वमित्व योजनेसाठी  ड्रोनचा वापर आणि जन धन आधार मोबाइल (जेएएम) त्रिसूत्रीचा वापर, यांची उदाहरणे दिली. स्वामित्व योजनेने मालमत्तेच्या नोंदीमध्ये सत्यता आणली आणि गरीबांना कर्ज उपलब्ध करून दिले.जन धन आधार मोबाइल (जेएएम) या त्रिसूत्री ने थेट लाभ हस्तांतरण सुनिश्चित केले आणि अनेक कल्याणकारी योजनांची ही त्रिसूत्री कणा बनली, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने यशस्वीपणे सुरु केलेल्या जेम (जीईएम) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’ चाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. जीईएमने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,तंत्रज्ञानाने लहान व्यवसायांना मोठा ग्राहक शोधण्यात मदत झाली आहे. त्याचबरोबर यामुळे भ्रष्टाचाराला कमी वाव राहिला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये तंत्रज्ञानाची मदत झाली आहे. यामुळे प्रकल्पांना गती मिळाली आणि पारदर्शकता वाढली. तसेच गेल्या वर्षी एक लाख कोटी रुपयांचे खरेदी मूल्यही गाठता आले आहे.

आपल्या मधले गैरसमज दूर करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, नवीनता महत्त्वाची आहे. पण जेव्हा एकात्मतेने त्याचे समर्थन केले जाते तेव्हा ती एक ताकद बनते. तंत्रज्ञानाचा वापर गैरसमज दूर करण्यासाठी, समन्वय सक्षम करण्यासाठी आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी केला जात आहे. सामायिक प्लॅटफॉर्मवर, कोणतेही गैरसमज (सायलोस) नाहीत. पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय आराखड्याचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की, भारत पुढील काही वर्षांत पायाभूत सुविधांमध्ये 100 ट्रिलियन रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहे. गति शक्ती सामायिक व्यासपीठामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि विविध विभाग समन्वय साधू शकतात. प्रकल्प, वापरली जाणारी जमीन आणि संस्थांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे, प्रत्येक भागधारक समान डेटा पाहतो. यामुळे समन्वयात सुधारणा येते आणि समस्या येण्यापूर्वीच समस्यांचा निपटारा केला जातो. यामुळे कामांना मंजुरी देणे आणि त्यांचा निपटारा करण्‍यास गती मिळते, असे ते म्हणाले.

भारत आता लालफितीसाठी ओळखले जात नाही ते गुंतवणूकदारांसाठी लाल गालिचे घालणारे आणि त्यांना उत्त्तम संधी देणारे राष्‍ट्र म्ह्णून   ओळखले  जाते, असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, एफडीआय सुधारणा असोत, किंवा ड्रोन नियमांचे उदारीकरण असो, सेमी-कंडक्टर क्षेत्रातील पावले असोत, विविध क्षेत्रातील उत्पादन प्रोत्साहन योजना असोत किंवा व्यवसाय करण्याच्या सुलभतेचा उदय असो, भारतात आता अनेक उत्कृष्ट घटक एकत्र येत आहेत, ते म्हणाले. ते म्हणाले, तुमची गुंतवणूक आणि आमचा नवोन्मेष चमत्कार करू शकतो. तुमचा विश्वास आणि आमची तांत्रिक प्रतिभा या गोष्टी घडवून आणू शकतात. मी तुम्हा सर्वांना आमच्यासोबत काम करण्यासाठी आमंत्रित करतो कारण जगाच्या समस्या सोडवण्यात आम्ही जगाचे नेतृत्व करत आहोत.पंतप्रधानांनी असे आवाहन करून आपल्या भाषणाचा समारोप केला.  

 

S.Bedekar/Prajna/Vikas/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1876421) Visitor Counter : 321