आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डिजीलॉकर वापरकर्ते आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करू शकतील आणि या नोंदी आयुष्मान भारत आरोग्य खात्याबरोबर (एबीएचए) लिंक करू शकणार

Posted On: 10 NOV 2022 12:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली – दि. 10 नोव्हेंबर, 2022
 

डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कागदपत्रांची देवाणघेवाण करणारे अधिकृत व्यासपीठ आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) सह त्याचे दुस-या टप्‍प्‍यावर एकत्रीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. डिजीलॉकरचे सुरक्षित क्लाउड-आधारित स्टोअरेज प्लॅटफॉर्म आता लसीकरण रेकॉर्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, लॅबचाचण्‍यांचे अहवाल,  रूग्णालयातून घरी पाठवताना दिलेल्‍या वैद्यकीय अहवालाचा सारांश इत्यादी आरोग्य नोंदी संग्रहित करण्यासाठी आणि ही माहिती पुन्‍हा गरजेनुसार पाहता येण्‍यासाठी ‘हेल्थ लॉकर’  म्हणून वापरता येणार आहे.

डिजीलॉकरने यापूर्वी एबीडीएमसह पहिल्या टप्‍प्‍याचे एकत्रिकरण पूर्ण केले होते ज्यामुळे या मंचावर एबीएचए  किंवा आयुष्मान भारत आरोग्य खाते निर्मितीची सुविधा उपलब्‍ध झाली. त्‍यानुसार 13 कोटी वापरकर्त्यांना  जोडण्‍यात आले आहे. अद्ययावत  इंटिग्रेशन वापरकर्त्यांना डिजीलॉकरचा  आता वैयक्तिक आरोग्य नोंदी  (पीएचआर) अॅप म्हणून वापर करता येणार आहे. या व्यतिरिक्त, एबीएचए धारक त्यांच्या आरोग्य नोंदी विविध रुग्णालये आणि प्रयोगशाळांमधून एबीडीएम नोंदणीकृत आरोग्य सुविधा लिंक करू शकतात आणि ते डिजीलॉकरद्वारे हव्‍या त्‍यावेळी पाहू, वापरू शकतात. वापरकर्ते अॅपवर त्यांचे जुने आरोग्य रेकॉर्ड स्कॅन आणि अपलोड करू शकतात. पुढे, ते एबीडीएम नोंदणीकृत आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत निवडक नोंदी सामायिक करू शकतात.

या एकत्रीकरणाचा वापरकर्त्यांसाठी होणारा फायदा अधोरेखित करताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) मुख्‍य कार्यकारी अधिकारी  डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले,  “एबीडीएम अंतर्गत, आम्ही एक आंतर-कार्यक्षम आरोग्य परिसंस्था तयार करत आहोत. डिजिलॉकर हे मूळ दस्तऐवज पाहण्‍यासाठी एक विश्वसनीय आणि लोकप्रिय अॅप आहे. वापरकर्त्यांना आता ते पीएचआर अॅप म्हणून वापरता येईल आणि कागदविरहीत नोंदी ठेवण्याचे फायदे मिळतील.”

एकीकरणाबद्दल बोलताना, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे व्यवस्‍थापकीय संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग म्हणाले – “एबीडीएमचे फायदे आमच्या 130 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अभिमान वाटतो. या मंचाने आधीच 85 हजार एबीएचए क्रमांक तयार करण्यात मदत केली आहे. ‘हेल्थ लॉकर इंटिग्रेशन’ सह, आम्ही सकारात्मक आहोत कारण, अधिक लोक अगदी सहजपणाने त्यांची आरोग्यविषयक  कागदपत्रे डिजिटल पद्धतीने लिंक करू शकतील आणि सुरक्षित ठेवून आवश्‍यक तेव्हा त्‍यांचा वापर करू शकतील. डिजीलॉकरचे एबीएचए वापरकर्त्यांचे प्राधान्य लक्षात घेवून  हेल्थ लॉकर बनण्याचे उद्दिष्ट आहे.”

आरोग्य लॉकर सेवा आता डिजीलॉकरच्या सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

 

***

SonalT/SuvarnaB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1874933) Visitor Counter : 238