माहिती आणि प्रसारण मंत्रालय

#IFFI का?

Posted On: 08 NOV 2022 7:10PM by PIB Mumbai

मुंबई, 8 नोव्‍हेंबर 2022

 

इफ्फी ? हो. आमच्या सर्वांच्या मनात ज्या चित्रपट महोत्सवाची उत्सुकता लागून राहिली आहे त्याबाबत तुम्हाला नक्कीच माहिती असेल, अशी आमची आशा आहे,  तुम्हालाही तितकीच उत्सुकता असेल.  

होय, इफ्फी , भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ज्याची  स्थापना 70 हून अधिक वर्षांपूर्वी, 1952 मध्ये झाली आहे आणि दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे आयोजन केले जाते.  2004 मध्ये प्रथमच गोव्यात आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव त्यानंतर दरवर्षी नयनरम्य पर्यटन राज्य असलेल्या गोव्यात पार पडला. 2014 मध्ये, गोवा हे  इफ्फीसाठी कायमस्वरूपी स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

तुम्हाला माहित असेलच  की इफ्फीचे आयोजन अन्य कुणी नव्हे तर  सरकार करते.  हो, दरवर्षी केंद्र सरकार आणि यजमान राज्य गोवा सरकारच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जातो.

त्यामुळे, स्वाभाविकपणे, प्रश्न उद्भवतो, जसे की आम्हाला खात्री आहे की तो तुमच्या मनात आधीच निर्माण झाला आहे: #WhyIFFI?

 

#IFFI का?

हो, आम्ही इफ्फी का आयोजित करतो?  आपण कोणताही चित्रपट महोत्सव का आयोजित करतो? आणि विशेष म्हणजे सरकार स्वतः  चित्रपट महोत्सव का आयोजित करते ? आणि सरकार खासकरून  इफ्फी का आयोजित करते?

खरेतर , आम्ही जे करतो ते का करतो याच्या मुळाशी जाण्यासाठी - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या सरकारने आयोजित केलेल्या या भव्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामागील उद्देश एकत्रितपणे जाणून घेण्यासाठी, शोधण्यासाठी आणि नव्याने उलगडण्यासाठी  आम्ही हे प्रश्न विचारत आहोत.

आणि प्रश्न केवळ  इफ्फी आयोजित करण्याचा नाही. त्यामुळे,  साहजिकच यातून लोकसहभाग, सहभाग आणि योगदान यासंबंधीचे प्रश्नही उद्भवतात. इफ्फीमध्ये लोक  का सहभागी होतात ? त्यांना काय हवे असते , महोत्सवातून ते  काय अर्थबोध घेतात ?

आणि चित्रपट महोत्सवाचे, इफ्फीचे प्रेक्षक कोण आहेत? ते कोण असावेत? ते चित्रपट निर्माते, चित्रपट क्षेत्राशी संबंधित  , चित्रपट प्रेमी आणि चित्रपट रसिक आहेत का? की इतरही कुणी आहेत ? हा सर्वसामान्य माणसासाठी आहे का"? का हा केवळ एकट्या विशिष्ट प्रेक्षकांसाठी आहे?

चला, इफ्फी 1 चा प्रवास जाणून घेऊया : जिथून याची सुरुवात झाली.

आपण या विशिष्ट प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत , तर आपण नेहमीप्रमाणे, त्याच्या मुळाशी म्हणजे त्याच्या आरंभाकडे जाऊया. इफ्फीच्या पहिल्या वर्षाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सी. एम. अग्रवाल काय म्हणतात, ते आपण जाणून घेऊया.

“जेव्हा भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव प्रथम मांडण्यात आला, तेव्हा एक प्रश्न वारंवार विचारला जात होता: अशा महोत्सवाचा उद्देश काय आहे, यामुळे कुठला उद्देश साध्य होईल? त्यावरच्या , उत्तराला दोन पैलू होते.  एक ; चित्रपट महोत्सवामुळे देशातील चित्रपट प्रेक्षकांना सर्व सहभागी देशातील चित्रपट-निर्मात्यांनी बनवलेले उत्कृष्ट चित्रपट  पहायला मिळतात आणि दुसरे म्हणजे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सहभागी देशांच्या चलचित्रपट  उद्योगात कार्यरत असलेल्यांना भेटण्याची आणि त्यांच्या सर्वांच्या समान चिंतेच्या बाबींवर चर्चा करण्याची, या कलेच्या प्रगतीची तुलना करण्याची आणि त्याच्या भविष्यातील विकासासाठी ठोस योजना आखण्याची संधी देतो.”

होय, ते बरोबर आहे, 1952 मध्ये तेव्हाच्या बॉम्बे मध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आशियामधल्या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांचे 24 जानेवारी 1952 ला स्वागत सोहळ्याच्या भाषणातले  हे शब्द आहेत. सिनेमा माध्यमाच्या, आपल्या माणूस म्हणून एकमेकांशी असलेल्या संबंधावर, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर असलेल्या विलक्षण प्रभावावर अध्यक्षांनी विचार मांडले होते.  

“या महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांपैकी काही चित्रपट, मनोरंजनाचं नवीन स्वरूप म्हणून सुरु झालेल्या चलत-चित्रपटांनी मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर किती प्रभाव पाडला आहे, याचे दर्शन घडवतात. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात त्याने नवीन दृष्टीकोन विकसित केले आहेत, ज्याचं महत्व आता प्रकर्षाने जाणवतं. सांस्कृतिक क्षेत्रात त्याने ‘आंतरराष्ट्रीय संस्कृतीचा पाया रचण्यामध्ये’ महत्वाची भूमिका बजावली आहे आणि बजावत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या क्षेत्रा इतकं मानवी संबंधांच्या कोणत्याही क्षेत्रात चलत-चित्रपटांना अधिक महत्व नाही; राष्ट्रांच्या सांस्कृतिक किंवा व्यावसायिक संबंधांच्या चांगल्या अथवा वाईटा संदर्भातील त्याचं प्राबल्य सर्वज्ञात आहे."

विविध देशांच्या लोकांमधील परस्पर सद्भावना आणि सामंजस्य वाढवण्यासाठी सिनेमाची ताकत कशी उपयोगी ठरते आणि सिनेमा “जागतिक साहित्याची सुरुवात” कशी करतो, हे  अध्यक्षांनी अधोरेखित केले.              

“माणसं आणि कल्पनांच्या देवाण-घेवाणीसह चलत-चित्रपटांची निर्मिती आणि वितरणामधील  खरं-खुरं आंतरराष्ट्रीय सहकार्य, याची परिणती परस्पर सद्भावना आणि सामंजस्यात होऊ शकते. दुसर्‍या भूप्रदेशातील लोकांनी पहावा, म्हणून परदेशी  पाठवला जाणारा प्रत्येक चित्रपट हा चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या देशाच्या लोकांनी जगभरातल्या जनतेसाठी पाठवलेला राजदूत आहे. तो सार्वत्रिक भाषा बोलतो, जी सर्वाना समजते. भाषेद्वारे विलग झालेले लोक अन्य भूप्रदेशातील त्यांच्यासारख्या माणसांबद्दल रेडियो अथवा वृत्तपत्रा द्वारे जे जाणू शकत नाहीत, ते चित्रपटाच्या पडद्यावरून जाणण्यासाठी उत्सुक असतात आणि पडद्यावरून ते जे शिकतात, ते आंतर-वंशिक अविश्वास आणि द्वेष दूर करायला मदत करतं.

सार्वत्रिक भाषा बोलत असल्यामुळे चलत-चित्रपट जगभरातल्या साहित्याच्या अभिव्यक्तीचा  मार्ग खुला करतात. असं साहित्य, जे मानवी जीवनातल्या सर्व, जवळजवळ सर्वच घडामोडींची सतत नोंद घेत असतं. आपल्या मनोरंजनासाठी आणि आपल्याला माहिती देण्यासाठी ते भूतकाळ पुन्हा उभा  करतात, वर्तमानकाळ जीवंत करतात, आणि उद्याच्या संदर्भात, आपल्याला “भविष्याचा वेध घ्यायला, मानवी दृष्टी जेवढं दूरवर पाहू शकेल, तिथलं जग, आणि तिथं असू शकतील अशी  सर्व आश्चर्य पाहण्यासाठी सक्षम करतात”.   

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या सत्रात देशोदेशीच्या प्रतिनिधींचं स्वागत करताना आयोजकांनी म्हटल आहे की आंतरराष्ट्रीय वैचारिक आदान-प्रदानांच्या योजना विकसित करण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा एखादा देश आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर आपले चित्रपट पाठवतो तेव्हा त्यातून नागरिकरणावर घाला घालणाऱ्या समस्यांकडे बघण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनाचा विपर्यास होता कामा नये. 

भारतासारख्या महान राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रेरणा देणाऱ्या भव्य उद्दिष्टाकडे आपण पुन्हा येऊया अशा शब्दात अध्यक्षांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.

"शेवटी मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की सध्याचा महोत्सव भारतातलाच नव्हे तर आशियातला अशा प्रकारचा पहिलाच महोत्सव हा स्पर्धात्मक नसून प्रातिनिधीक स्वरूपाचा आहे.आपण शत्रुत्वाच्या भावनेने नव्हे तर परस्परांची कला, कौशल्य आणि विकास पाहण्यासाठी आणि त्याचं कौतुक करण्यासाठी, एकमेकांना तसंच एकमेकांच्या समस्या समजून घेत एकमेकांचा जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत शिकून घेण्यासाठी तसंच जगातल्या लोकांपर्यंत समृद्ध संस्कृती पोहोचवण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी भेटत असतो."

आठवणींचा धांडोळा घेत  महोत्सवाच्या प्रेरणेचा सखोल  अनुभव घेत असताना आपल्याला कसं वाटतं हे आम्हाला कळू द्या. यामुळे पुन्हा एकदा आपल्या हृदयाच्या तारा झंकारल्या जातात का, आणि आपण पुन्हा एकदा इफ्फीच्या तसेच  चित्रपटांच्या आणि आयुष्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडता का ? नाही ? आपण इफ्फी आणखी चांगल्या प्रकारे असा साजरा करू शकतो हे आमच्यापर्यंत पोहोचवा.

आणि अर्थातच #WhyIFFI? हे देखील आम्हाला कळवा. आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत iffi-pib[at]nic[dot]in वर पाठवू शकता. याहून चांगल्या प्रकारे म्हणजे आपण ट्वीटच्या माध्यमातून या जगभर सामायिक करू शकतो. (#WhyIFFI हा हॅशटॅग वापरायला विसरू नका ज्यामुळे आपलं उत्तर आमच्यापर्यंत अचूक पोहोचेल)

आणि तसंही, 53 व्या इफ्फीशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती आपल्याला महोत्सवाची वेबसाईट www.iffigoa.org, पीआयबीची वेबसाईट (pib.gov.in), इफ्फीची ट्विटर वरील सर्व समाज माध्यम खाती, फेसबुक, इंस्टाग्राम आणि पीआयबी गोवाच्या समाज माध्यम खात्यावर अर्थात सोशल मिडिया हँडलवरही मिळू शकतील. ऐकत आणि पहात रहा, चित्रपटांच्या या उत्सवाचा मुबलक प्रमाणात आस्वाद घेऊया आणि यातला आनंदही सामायिक करूया. 


* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/R.Agashe/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1874539) Visitor Counter : 268