वस्त्रोद्योग मंत्रालय

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची कापूस मूल्य साखळी संबंधी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे वस्त्रोद्योग सल्लागार गटाबरोबर तिसरी बैठक


उच्च उत्पन्न देणाऱ्या कापूस बियाण्यांशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान पद्धतीना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर गोयल यांनी दिला भर

Posted On: 08 NOV 2022 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 नोव्‍हेंबर 2022

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 7.11.2022 रोजी कापूस मूल्य साखळी संबंधी उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वस्त्रोद्योग  सल्लागार गटाबरोबर नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे तिसरी संवादात्मक बैठक घेतली. वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना व्ही. जरदोश, संबंधित मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी आणि कापूस मूल्य साखळीतील भागधारक बैठकीला उपस्थित होते.

नवी दिल्ली येथे यापूर्वी झालेल्या  संवादात्मक बैठकीनंतर सुरू करण्यात आलेल्या कार्यवाहीचा गोयल यांनी आढावा घेतला. आयसीएआर -केंद्रीय कापूस संशोधन संस्था - (सीआयसीआर ), नागपूर यांनी शेतकरी जनजागृती कार्यक्रम, एचडीपीएस, उच्च घनता लागवड प्रणाली आणि जागतिक सर्वोत्तम शेती पद्धतींद्वारे कापूस उत्पादकतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कापूस उत्पादकता वाढविण्याबाबत एक सर्वंकष  योजना सादर केली.

भारतीय कापसाचे ब्रँडिंग करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि ग्राहकांमध्ये  कस्तुरी ब्रँडेड उत्पादनांसाठी  निष्ठा आणि आकर्षण निर्माण करण्यावर गोयल यांनी  यांनी भर दिला . आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. गोयल यांनी कस्तुरी कॉटनची गुणवत्ता, शोध क्षमता आणि ब्रँडिंग यावर भर देण्यासाठी  उद्योग आणि त्यांच्या नामित  संस्थेने केलेल्या कामाचे कौतुक केले. उद्योग क्षेत्राच्या योगदानाएवढा  निधी देऊन सरकार उपक्रमाला पाठिंबा देईल.

कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कापूस बियाणांचा पुरवठा ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी संबंधित मंत्रालयांकडून युद्धपातळीवर काही ठोस कृती होण्याची  गरज आहे यावर गोयल यांनी भर दिला . कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी उच्च उत्पन्न देणाऱ्या कापूस बियाण्यांशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च घनता लागवड प्रणाली सारख्या नाविन्यपूर्ण कृषी शास्त्राची ओळख  करून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. एसआयएमए -सीडीआरएद्वारा विकसित हातात पकडायच्या कापूस तोडणी यंत्राच्या  वापरामुळे  शेतकरी उत्पादकांना मदत होईल , याबाबत गोयल यांनी  कापड उद्योग आणि उद्योग संघटनांनी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.  भारतीय वस्त्रोद्योग महासंघ ,कापूस महामंडळ लिमिटेडच्या वितरण सहाय्याने युद्धपातळीवर  हा प्रकल्प हाती घेईल. उद्योग संघटना आणि उद्योग नेत्यांनी मिळून हातात पकडायच्या 75,000 कापूस तोडणी यंत्रासाठी निधी देण्याचे मान्य केले. याव्यतिरिक्त, कापूस शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना सक्रियपणे सहभागी होऊ शकतात.

सल्लामसलतीच्या माध्यमातून समस्या सोडवण्याप्रति तत्पर आणि व्यावहारिक दृष्टिकोनाबद्दल उद्योग आणि वस्त्रोद्योग मूल्य साखळी भागधारकांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1874505) Visitor Counter : 186