शिक्षण मंत्रालय
देशभरातील शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण मंत्रालय भव्य ‘आदिवासी गौरव दिवस’ करणार साजरा
Posted On:
06 NOV 2022 3:51PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्रालय देशभरातील शाळा, कौशल्य आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘आदिवासी गौरव दिवस’ भव्य पद्धतीने साजरा करणार आहे.
गेल्या वर्षी, शासनाने 15 नोव्हेंबर हा दिवस शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित 'आदिवासी गौरव दिवस' म्हणून जाहीर केला. 15 नोव्हेंबर हा दिवस बिरसा मुंडा यांची जयंती आहे, ज्यांना देशभरातील आदिवासी समुदाय भगवान मानतो.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी, शिक्षण मंत्रालय एआयसीटीई, विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे, इतर माध्यमिक शिक्षण संस्था, सीबीएसई, केव्हीएस, एनव्हीएस आणि कौशल्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'आदिवासी गौरव दिवस' साजरा करणार आहे. या दिनाच्या देशव्यापी उत्सवा दरम्यान देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये 'स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी वीरांचे योगदान' या विषयावर वकृत्व स्पर्धा, सामाजिक उपक्रम आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. या सोहळ्यात भगवान बिरसा मुंडा आणि इतर शूर आदिवासी नेत्यांचे योगदान याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. यावेळी उत्कृष्ट योगदानाबद्दल विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येईल.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी दिलेल्या बलिदाना विषयीची माहिती भावी पिढ्यांना होण्यासाठी , तसेच त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आदिवासी संस्कृती, कला आणि समृद्ध आदिवासी वारसा जतन करण्यासाठी असे उत्सव प्रेरणा देत राहतील.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874110)