विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञानाने कालच्या परी-कथांचे आजच्या वास्तवात रुपांतर केले आहे, म्हणूनच पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक संशोधनाशी जास्तीत जास्त संयोग अपेक्षेपलीकडील परिणाम देऊ शकेल - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
05 NOV 2022 8:09PM by PIB Mumbai
विज्ञानाने कालच्या परी-कथांचे आजच्या वास्तवात रुपांतर केले आहे आणि म्हणूनच पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक संशोधनाबरोबरचा संयोग अपेक्षेपलीकडील परिणाम देऊ शकतो असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
डेहराडून इथल्या उत्तरांचल विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आकाश तत्त्व- “जीवनासाठी आकाश”, या विषयावरील 4-दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये बीजभाषण देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आज नवोदित देशांना नॅनोसॅटेलाइटसह उपग्रह निर्मितीमध्ये आणि क्षमता विकासात मदत करत आहे. म्हणून संपूर्ण जग भारताकडे एक प्रेरणा स्थान म्हणून पाहत आहे, ते म्हणाले. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, जागतिक राष्ट्रसंघामध्ये भारताचं स्थान उंचावत असून, अंतराळ संशोधनाच्या मदतीने ते शक्य होईल. अंतराळ क्षेत्रात आज 102 पेक्षा जास्त स्टार्टअप्स कार्यरत आहेत. त्याशिवाय, भू-स्थानिक मार्गदर्शक सूचनांनी 6 लाखापेक्षा जास्त भारतीय गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वामित्व (SVAMITVA) सारख्या योजनांना बळ दिले आहे, असे ते म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारताच्या अंतराळ क्षेत्राबाबतच्या आकांक्षा चंद्र आणि मंगळावरील मोहिमांमधून प्रतिबिंबित होत असल्या, तरी गगनयान ही देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम, भारताच्या अवकाशातील साहसी मोहिमांमधील एक महत्त्वाचा टप्पा असेल. मानवरहित गगनयान उड्डाण 2023 च्या अखेरीला होणार आहे. मानवरहित दुसरे उड्डाण 2024 च्या मध्याला होईल, तर मानवासह होणारे उड्डाण 2024 पर्यंत नियोजित आहे, असे ते म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, या तीन दिवसांच्या परिषदेत सुमारे 35 नामवंत वक्ते त्यांचे दृष्टिकोन मांडणार आहेत, म्हणून डेहराडून परिषदेमधून ते आकाश तत्वाच्या विविध आयामांवर नवीन विचारांची अपेक्षा करत आहेत. भारतातील तरुणांना आधुनिक वैज्ञानिक प्रगतीसह प्राचीन विज्ञानामधील ज्ञानाची ओळख करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873999)
Visitor Counter : 174